काश्मीर खोर्यात हिंदूंच्या ठरवून ज्या हत्या होत आहेत, त्याबद्दल देशभरात संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोर्यातील हिंदूंच्या सुरक्षिततेबाबत सर्व त्या उपाययोजना करण्यात याव्यात, असे आदेश गृहमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जे शासकीय कर्मचारी अन्यत्र नोकरी करीत आहेत, त्यांची जिल्हास्थानी बदली करण्याचे आणि त्यांना सर्व ती सुरक्षा पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे ‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन्ही प्रदेश वेगळे केले. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन्ही भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी केंद्राकडून अनेक उपाययोजनाही राबविण्यात आल्या. पण, काश्मीर खोर्यामध्ये जी फुटीरतावादी तत्वे आहेत, त्यांच्या अजूनही व्यवस्था पचनी पडलेली नसल्याचे दिसून येत आहे. शेजारच्या पाकिस्तानच्या छुप्या पाठबळावर काश्मीरमध्ये दहशतवादी अद्याप सक्रिय असून त्यांच्या माध्यमातून काश्मीर खोर्यामध्ये वास्तव्य केलेल्या काश्मिरी हिंदूंच्या मनात भीती निर्माण होईल, असे वातावरण निर्माण केले जात आहे. १९९०च्या दरम्यान काश्मीर खोर्यामध्ये राहणार्या हिंदू समाजावर अन्याय, अत्याचार करून, त्यांची संपत्ती लुटून हजारो हिंदूंना तेथून पळवून लावण्यात आले होते. अशा विस्थापित हिंदूंचे संपूर्ण पुनर्वसन होणे बाकी असताना, काश्मीर खोर्यामध्ये जे हिंदू नोकरीच्या, व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत, त्यांना दहशतवाद्यांकडून ठरवून लक्ष्य केले जात आहे. अशा प्रकारे जे ‘टार्गेटेड किलिंग’ केले जात आहे, त्यामध्ये काश्मीरमध्ये देशाच्या अन्य भागातून रोजगारासाठी आलेल्यानाही लक्ष्य केले जात आहे.
दहशतवाद्यांनी काश्मिरी हिंदूंवर ठरवून हल्ले करण्याचे जे सत्र आरंभिले आहे, त्यामुळे तेथील हिंदू समाज काश्मीर खोर्यातून जम्मूकडे स्थलांतर करू लागला आहे. फुटीरतावादी शक्ती आणि शेजारच्या पाकिस्तानच्या पाठबळावर त्या प्रदेशात दहशतवादी सक्रिय होत असल्याचे दिसत असले तरी सुरक्षा दलांनी जी कठोर पावले उचलली आहेत, त्यामुळे खचलेल्या दहशतवाद्यांकडून ‘टार्गेटेड किलिंग’सारखा मार्ग निवडला जात आहे.
काश्मीर खोर्यामध्ये अलीकडील काळात हिंदूंच्या हत्या होण्याचे प्रकार बरेच घडले. १२ मे रोजी शासकीय सेवेत असलेल्या राहुल भट नावाच्या कर्मचार्यास त्याच्या कार्यालयात घुसून गोळ्या घालण्यात आल्या, तर २ जून रोजी मूळच्या राजस्थानमधील असलेल्या विजय कुमार याची मोहनपोरा येथे हत्या झाली. ३१ मे रोजी शिक्षिका रजनीबाला हिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. रजनीबाला सांबा येथील रहिवासी होती. रजनीबाला गोपालपोरा येथील माध्यमिक शाळेत शिक्षिका होती. ती हिंदू होती हाच तिचा अपराध होता! त्यामुळे दहशतवाद्यांनी तिची हत्या केली.
काश्मीर खोर्यात हिंदूंच्या ठरवून ज्या हत्या होत आहेत, त्याबद्दल केवळ काश्मीरमध्येच नव्हे ,तर देशभरात संतापाची लाट उसळली आहे, असे प्रकार रोखण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. काश्मीर खोर्यातील हिंदूंच्या सुरक्षिततेबाबत सर्व त्या उपाययोजना करण्यात याव्यात, असे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जे शासकीय कर्मचारी अन्यत्र नोकरी करीत आहेत, त्यांची जिल्हास्थानी बदली करण्याचे आणि त्यांना सर्व ती सुरक्षा पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अलीकडेच काश्मीर खोर्यातील १७७ काश्मिरी हिंदूंच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. पण, जे आदेश जारी करण्यात आले होते ते गुप्त राहिले नाहीत. या सर्व १७७ जणांची नावनिशीवार माहिती दहशतवाद्यांच्या कथित हस्तकांनी प्राप्त केली आणि ती समाजमाध्यमांवर प्रस्तुत केली. केंद्र सरकार काश्मीर खोर्यामधील फुटीर शक्तींचा पुरता बीमोड करण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच काश्मीर खोर्यातील फुटीर तत्वांच्या कारवाया सुरूच असल्याचे अशा घटनांवरून दिसून येत आहे.
काश्मीरमधील या ‘टार्गेटेड किलिंग’च्या निषेधार्थ अलीकडेच नवी दिल्लीमध्ये जंतरमंतर येथे धरणे धरण्यात आले. सरकारने हिंदूंच्या सुरक्षेची योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, काश्मिरी हिंदूंनी काश्मीर खोरे सोडून जाऊ नये, असे आवाहन भारतीय जनता पार्टीने केले आहे. काश्मिरी हिंदूंनी आहे तेथेच राहावे आणि पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावावेत, असे भाजपने म्हटले आहे. काश्मीर खोर्यातील अल्पसंख्य असलेल्या हिंदूंना आणि राष्ट्रभक्त मुस्लिमांना तेथून हुसकावून लावण्यासाठी पाकिस्तानने जे षड्यंत्र रचले आहे, त्यास बळी पडू नका. आपण सर्व एकत्र राहून पाकिस्तानचा हा कुटील डाव उधळून लावू, असे आवाहन भाजपने केले आहे.
पाकिस्तान पुरस्कृत छुप्या युद्धाचा आपण गेली ३२ वर्षे सामना करीत आहोत. आपले लष्कर, पोलीस, निमलष्करी दले दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देत आहेत. आतापर्यंत हजारो अतिरेक्यांना या दलांनी ठार मारले आहे. सर्व राष्ट्रवादी शक्तींनी, काश्मिरी पंडित, डोग्रा यांनी आहे तेथेच खंबीरपणे राहावे, असे आवाहनही भाजपने केले आहे.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारखे नेते सरकारच्या मागे उभे राहण्याऐवजी केंद्र सरकारवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. काश्मीर प्रश्न हाताळण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार सक्षम नसल्याची टीका त्यांनी या निमित्ताने केली आहे. देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवर विरोधी सूर लावण्याचे उद्योग केजरीवाल यांच्यासारखे राजकारणी कधी थांबविणार हा मोठा प्रश्न आहे.
इस्लामी संघटनेचे निवेदन भारताने फेटाळले!
‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को - ऑपरेशन (ओआयसी) या ५७ मुस्लीम देश सदस्य असलेल्या संघटनेच्या सचिवालयाने भारतामध्ये अल्पसंख्य समाजाचा पद्धतशीर छळ होत असल्याचा जो आरोप आपल्या निवेदनामध्ये केला आहे, तो भारत सरकारने पूर्णपणे फेटाळून लावला आहे. ‘ओआयसी’ या संघटनेने जे निवेदन प्रसिद्ध केले ते अप्रस्तुत आणि संकुचित मनोभूमिकेचे असल्याचे भारताच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे. तसेच, भारताने कतार आणि कुवेत या देशांना, अल्पसंख्याक समाजाबद्दल जी वादग्रस्त शेरेबाजी करण्यात आली, त्याबद्दल सरकारने कठोर कारवाई केली असल्याचे कळविले आहे. भारत सरकार सर्वच धर्मांचा अत्यंत आदर राखते. जी आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आली, त्याद्वारे भारत सरकारचा दृष्टिकोन प्रतिबिंबित होत नाही. ज्यांनी अशी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत, त्यांच्याविरुद्ध संबंधित संस्थांनी कठोर कारवाई केली आहे, असेही संबंधित देशाना कळविण्यात आले आहे, असे सर्व करूनदेखील ‘ओआयसी’ या संघटनेने खोडसाळ आणि गैसमज पसरविणार्या प्रतिक्रिया देण्याचा मार्ग निवडला आहे. हा प्रकार खेदजनक आहे. ‘ओआयसी’ संघटनेने आपला जातीयवादी दृष्टिकोन सोडून द्यावा आणि सर्व धर्म व श्रद्धा यांच्याबद्दल योग्य तो आदर बाळगावा, असेही परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.
ज्या कतारने प्रेषितांबद्दल केलेल्या प्रतिक्रियेबद्दल एवढा संताप व्यक्त केला, त्याच कतारने हिंदू देवदेवतांची विटंबना करणार्या चित्रकार एम. एफ. हुसेन यांना आपल्या देशाचे नागरिकत्व बहाल केले होते! आपण अशी कृती करून हिंदूधर्मीयांचा अवमान करीत आहोत, हे त्यावेळी कतारच्या लक्षात आले नाही वाटते? हुसेन यांना नागरिकत्व देऊन चूक केली म्हणून कतार भारताची माफी मागेल का? हिंदूधर्मीयांना कसेही वागविले तरी चालते, हे कतारला त्यावेळी जगाला दाखवून द्यायचे नव्हते ना! मुस्लीमधर्मीयांसंदर्भातील घटनेबद्दल पाकिस्तानने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेसही भारताने सडेतोड उत्तर दिले आहे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समाजाच्या अधिकारांची मोठ्या प्रमाणात पायमल्ली होते, हे भारतीय परराष्ट्र खात्याने निदर्शनास आणून दिले आहे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्य हिंदू, शीख, ख्रिश्चन, अहमदिया यांचा कसा छळ होतो, याचा जग अनुभव घेत आहे. पाकिस्तानने अपप्रचार करण्याऐवजी आपल्या देशातील अल्पसंख्याक समाजाची सुरक्षा, त्यांचे कल्याण याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला भारताने दिला आहे. भारताविरुद्ध मुस्लीम जगतामध्ये कटुता निर्माण व्हावी, असा एक गंभीर प्रयत्न वादग्रस्त वक्तव्याच्या निमित्ताने करण्यात आला. पण भारताने वेळीच योग्य पावले टाकल्याने हा विषय फारसा चिघळला नाही, असे म्हणता येईल.