बौद्धवाडीत समाजमंदिरामध्ये बुद्धप्रतिमा असावी, असे सगळ्यांचेच म्हणणे. याबाबत या दोघांनी चिपळूणमधील स्वयंसेवकांसोबत चर्चा केली. विश्व हिंदू परिषदेने अत्यानंदाने ठरवले की, समाजमंदिरामध्ये बुद्धमूर्ती विश्व हिंदू परिषदेने भेट म्हणून द्यायची. कारण, विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते की, “राममंदिर जन्मभूमीसाठी समाजबांधवांकडून वर्गणी गोळा करताना अनेक अनुभव आले. या बुद्धवाडीमध्येही लोकांनी श्रद्धेने वर्गणी दिली. प्रभू श्री रामचंद्राच्या जन्मभूमीसाठी समाज एकत्रितरित्या स्नेहाने पुढे आला. आता वाडीतल्या समाजमंदिरामध्ये तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीसाठीही समाजाने एकत्र येणे गरजेचे आहेे. कारण, प्रभू श्री रामचंद्रही आपलेच आणि तथागत गौतम बुद्धही आपलेच! हिंदू आणि बौद्ध नावात वेगळेपण आहे.
पण, आम्ही आहोत तर एकच!” विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी सांगत होते. त्यांच्या बोलण्यातला स्नेह निर्व्याज आणि सत्य होता. उगीच बळेबळे ओढूनताणून आणलेली समता त्यात नव्हती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेल्या `तुम्ही-आम्ही सकल हिंदू बंधू बंधू` हा मंत्र आणि ‘न हिंदू पतीत भवो` या गोळवलकर गुरूजींनी दिलेल्या मार्गाची प्रत्यक्ष समरसता त्यांच्या बोलण्यात, वागण्यात आणि एकंदरीत विचारांमध्ये होती. (हे मी आता ठाम लिहिले आहे. कारण, पुढच्या प्रवासात मला याचा प्रत्यय आला.) तर चिपळूणहून पेडांबे गावी निघाले. सोबत कृष्णा बांदेकर, विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत सहमंत्री, विवेक वैद्य, विभाग मंत्री, उदय चितळे, जिल्हा मंत्री, मालाड-मालवणीच्या भिमकन्या महिला मंडळाच्या शुभांगी जाधव आणि रूपाली जाधव (मालवणीमध्ये 2015 ते 2021 असा प्रदीर्घ लढा देत मशिदींवरचे भोंगे उतरवायला लावणाऱ्या भगिनी), मानखुर्दच्या अण्णाभाऊ साठे नगरच्या ‘दिशा ज्योत फाऊंडेशन`च्या ज्योती साठे, विक्रोळीच्या वैष्णवी महिला मंडळाच्या मंजू यादव आणि मिता सावंत होत्या. पेडांबे गावी बौद्धवाडीच्या समाजमंदिरामध्ये पोहोचलो. समाजमंदिर स्थानिकांनी फुलून गेलेले. पांढऱ्या शुभ्र सुंदर नक्षीकाम केलेल्या साड्या घालून त्यावर मस्त मोगरा आणि अबोलीचे गजरे लावून महिला आणि छोट्या मुलीही नटलेल्या. उत्साह, आनंद अभिमान अशा संमिश्र छटा या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. आम्ही जेव्हा तिथे गेलो, तेव्हा समाजमंदिरामध्ये स्थानिक राजकारण्यांची भाषणं सुरू होती. ते सांगत होते, “मी आताच गुगलवर पाहिले. महाराष्ट्रातल्या साडेतीन हजार इंडस्ट्रीज बंद पडल्या. या मोदी- शाहला महाराष्ट्रातले, कोकणातले, आपल्या मुंबईचे उद्योगधंदे बंद करून तिकडे गुजरातला न्यायचे आहेत. मुंबईला आपल्या कोकणाला उद्ध्वस्त करण्याचा डाव केंद्र सरकारचा आहे. मोदी-शाहला गुजरातला नंबर-1 बनवायचे आहे. समजलं का? माझ्या गावकऱ्यांनो, तुम्हाला गाऱ्हाणं घालतो मत द्यायला झालं, तर समजून उमजून द्या. त्यांना देऊच नका.”
सकाळचे 11.30 वाजून गेले होते. या मंगलसमयी काही बोलण्यापेक्षा भन्तेजींची मंगल बुद्धवंदना आणि मंगलकामनायुक्त आशीर्वादपर मार्गदर्शन एकावे, असे विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे. मात्र, मला वाटले की, विश्व हिंदू परिषदेतर्फे कुणीतरी आपले मनोगत मांडावे. यावर सगळ्यांनी सूचविले की, राजकीय नेत्याच्या भाषणानंतर मी पाच मिनिटे बोलावे.
नेत्याने यथासांग मोदी-शाह, नोटबंदी, गुजरात, ‘ईडी` वगैरेवर भाषण करून शेवटी ‘जय महाराष्ट्र` करत भाषण संपवले. भाषण संपल्यानंतर ते तडक समाजमंदिराबाहेर आले. त्यांचे भाषण संपल्यावर काहीजण कुजबुजत होतेच- ‘साहेब जयभीम बोलला नायच.`
असो. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकऱ्यांना सन्मानित करण्यासाठी समाजमंदिरामध्ये बोलावण्यात आले. आम्ही सगळे आत गेलो. पाहुण्यांसाठी खुर्च्यांची व्यवस्था केली होती. आम्ही खुर्च्यांवर बसणार इतक्यात भन्तेजींनी आयोजकांना सांगितले, ”तुम्हाला धम्माचे ज्ञान नाही का? आधी सगळ्या खुर्च्या-टेबल काढा. माझ्यासाठी फक्त एकच खुर्ची ठेवा. बाकीचे सगळे खाली बसतील.” (हे भन्ते खास बुद्धमूर्ती पूजास्थापनेसाठी अहमदनगरहून आले होते) तर, ग्रामस्थ तर आधीच खाली बसले होते. ‘बाकीचे` म्हणजे विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि आम्ही. भन्तेजींच्या आदेशाचे उल्लंघन कसे करणार? आमचे ठीक होते. पण, आमच्यासोबत वयाने ज्येष्ठ असलेले विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारीही हेोते. वयोमानामुळे त्यांना जमिनीवर बसायला त्रास होत होता. धम्मगुरूचा शब्द खाली पडू द्यायचा नाही, म्हणून तेही प्रयत्नाची पराकाष्ठा करत जमिनीवर बसले. तोपर्यंत 12 वाजून गेले. आता भन्तेजी बुद्धवंदना म्हणतील, मूर्तीची पूजास्थापना करतील आणि कार्यक्रम संपेल, असे वाटत असतानाच ते कडक शब्दांत म्हणाले, ”नीट ताठ बसा. तो टोपी घातलेला कोण आहे, पोक काढून बसलेला? टोपी घातली म्हणून काय बुद्ध होत नाहीस! ताठ बसा!!” ते प्रार्थना सोडून हे कुणाला म्हणाले म्हणून सगळ्यांच्या नजरा वळल्या. तर पाठीमागे एक आजोबा ज्यांना आधीच थोडे पोक असावे त्यांना ते म्हटले गेले होते. ते काका ग्रामस्थच होते. भन्ते म्हणाले ”मी आता पहिल्यांदा ध्यान शिकवणार, मग धम्माचे प्रवचन सांगणार. थोडक्यात आटपतो वेळ कमी दिला म्हणून.
दोन तासच प्रवचन घेईन. मग बुद्धाच्या मूर्तीचे पूजन होईल.” माझ्या वैयक्तिककारणांमुळे मला सलग तीन तास बसणे शक्य नव्हतेच. माझ्या सोबतचे विश्व हिंदू परिषदेचे ते वयाने ज्येष्ठ पदाधिकारी दोन-तीन तास मांडी घालून कसे बसतील? ग्रामस्थांमधले वयोवृद्ध आजी-आजोबा कसे बसतील? इतक्यात भन्ते म्हणाले ”तुम्हाला इथे कुणीतरी काही तरी दान केले. त्यामुळे त्यांना डोक्यावर घेण्याची गरज नाही. तुम्हाला दान देणाऱ्यांच्या पुढे पुढे करावे लागते. पण, लक्षात ठेवा तुम्ही अल्पसंख्याक आहात, अल्पसंख्याक!” भन्तेंनी डोळे बंद करायला सांगितले होते तरीही मी सगळ्यांकडे पाहिले तर सगळ्यांचेच डोळे उघडे. गावची वेसही न ओलांडलेल्या आजी-आजोबा, लहान मुलं, स्वयंपाकघर परसदारात काम करणाऱ्या आयाबाया आणि पुरूषमंडळी सगळ्यांच्याच डोळ्यात प्रश्नचिन्ह. हे आणखी काय बोलतायेत, असा चेहऱ्यावर भाव. त्यामुळे समाजमंदिरात बसलेले गावकरी उठून बाहेर ठेवलेल्या खुर्चीवर बसायला जाऊ लागले. गावकऱ्यांना काय समजले? काय वाटते हे समजून घेण्यासाठी मीही उठून बाहेर पडणार इतक्यात त्यांचा कठोर स्वर आला, ”जे कुणी माझे प्रवचन सोडून निघून जाईल ते जळके लाकूड. आता फक्त अर्धे ज्ञानच दिले आहे. अजून अर्धे ज्ञान मी दिले नाही. हे असे अर्धवट ज्ञान घेऊन बाहेर पडाल, तर त्याचा फायदा नाही.
तुम्हालाच त्रास होईल.” त्यांचे शब्द ऐकून मग शुभांगी जाधवही बाहेर पडली. आम्ही बाहेर बसलो आणि शुभांगी आणि बाहेर बसलेल्या समाजबांधवांची चुळबुळ सुरू झाली. काय झाले? विचारल्यावर शुभांगी म्हणाली, ”ताई, धम्म असा नाही. आमचा धम्म करूणा, मैत्री सांगतो, जगणं सांगतो. हे भन्तेजी वेगळे वाटतात. पण, असेच आणि या पद्धतीने धम्म प्रचार-प्रसार करणारे भन्ते खेडोपाडी जात असतील, तर धम्मबांधवाचे काय होणार?” शुभांगीची धम्मनिष्ठा माहिती असल्याने ती मनापासूनच बोलत होती, हे माहिती होते. मुंबईहून आलेल्या या ब्राह्मण आणि मराठेतर समाजातील महिला तसेच बौद्धवाडीतील रहिवाशी यांची चर्चा सुरू होती. यातले सार असे की, ”आपले काही बौद्ध लोक ख्रिश्चन का होतात माहितेय? तिथे येणाऱ्या प्रत्येकाशी तिकडचे फादर आणि कोणकोण लोक ठरवून गोड गोड बोलतात. आपलेपणा दाखवतात. मग लोकांना तिकडे जावेसे वाटते. आपल्याकडे विहारात आपलीच माणसं येणार. त्यातपण त्यांच्याशी आपलेपणाने गोड वागलं नाही, तर ते का येतील?” इतक्यात यावर शुभांगी आणि रूपाली म्हणाल्या, ”आम्ही लहाणपणापासून धम्माच्या अनेक कार्यक्रमात गेलो. भन्तेजी नम्र आणि मधूरच बोलतात. आता आता काही ठिकाणी हे कठेार आणि धम्मप्रवचन सोडून आपण अल्पसंख्याक असून आपल्यावर अत्याचार होतो, असे सांगणारे भन्तेजीपण दिसतात. पण, ते चुकून धम्माच्या कामात आले असावेत.” चर्चा सुरू होत्या आणि तिकडे समाजकेंद्रातून लोकं बाहेर पडत होते. विश्व हिंदू परिषदेचे ते ज्येेष्ठ कार्यकर्ते मात्र भिड बाळगून तिथेच बसले होते.
त्यांना बुद्धप्रतिमेची एकत्रितपणे पूजा करायची होती. आम्हालाही त्यांच्यासोबत बुद्धप्रतिमेचे दर्शन घ्यायचे होते. खरंतर 1 वाजताच सगळे आटपून आम्हाला परतीच्या प्रवासाला निघायचे होते. आठवण म्हणून बुद्धप्रतिमेसमोर एकत्रित फोटो तरी काढू शकतो का? असे मनात आले. कारण, बुद्धप्रतिमा आतमध्ये होती आणि प्रवचन बाहेर होते. आयोजकांनी भन्तेजींना परवानगी विचारली. ते म्हणाले, “दहा मिनिटांत संपवतो.” पण, वेळ वाढतच होती. शेवटी आवाज न करता पाठच्या दाराने बुद्धमूर्तीकडे जाऊ आणि दर्शन घेऊ, असे म्हंटले. सगळ्यांनी ऐकले. आवाज न करता तिथे गेलो आणि पूजा केली.
भन्तेजींनी मग आटोपते घेतले. बौद्धवाडीतले प्रमुख आयोजक म्हणाले, ”विश्व हिंदू परिषदेने बुद्धप्रतिमा दिली खरेच खूप खूप धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचा सत्कार करायचा आहे.” मला म्हणाले, “ताई, मगाशी तुमचे मनोगत राहून गेले. आता बोलाल का?” वेळ टळून गेली होती. पण, ग्रामस्थांच्या डोळ्यांतला ‘अल्पसंख्याक अत्याचार` वगैरे प्रश्नचिन्ह माझ्या मनात उतरले होते. क्षणाचाही विलंब न लावता, तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मनोगताला सुरुवात केली. ग्रामस्थांना, आयाबायांना विचारले ”गावात तुम्हाला कमी लेखले जाते का? बौद्ध म्हणून कधी कुणी तुम्हाला त्रास दिला का? वेगळेपणाची वागणूक दिली का?” यावर सगळे एका सुरात म्हणाले, “नाही नाही.” त्यांना विचारले, ”आपल्याला इतर गावकऱ्यांसारखेच अधिकार आहेत का? संधी आहे का?” यावर सगळेजण म्हणाले “हो.” मी म्हणाले, ”बाबासाहेब म्हणाले होते, ‘मी पहिल्यांदा भारतीय आणि अंतिमही भारतीय आहे.` आपण कुणी अल्पसंख्याकबिंक्याक नाही, तर सगळे भारातीय आहोत. आहोत की नाही?” यावर सगळ्यांनी म्हंटले ”हो तेच ते आम्ही नाय अल्पसंख्याक, आम्ही भारतीय!” माझे मनोगत ऐकणारे भन्ते पटकन उठले आणि निघून गेले. आता समाजविहाराचा ताबा माझ्यासोबतच्या सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी घेतला होता. शुभांगी, रूपाली, ज्योती, मंजू, मिता.. या सगळ्याजणी ग्रामस्थांना आपापले अनुभव सांगत होत्या. त्या सगळ्याजणींच्या मनोगतामधले सार होते- ”स्वतंत्र भारतात आपण सगळे एक आहोत आणि समरस आहोत. प्रभू श्रीरामचंद्रही आमचेच आणि तथागत गौतमबुद्धही आमचेच. बोला भवतु सब्ब मंगलम!!