मुंबई: गुरुवार, दि. २ जून रोजी नागपूर येथे तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप प्रसंगी ज्ञानवापी प्रकरणावर बोलताना रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, “ज्ञानवापीशी हिंदूंच्या भावना जोडलेल्या आहेत. त्यावर न्यायालय देईल, तो निर्णय आपण प्रत्येकाने मान्य करायला हवा. मात्र, याचा अर्थ प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नये! आम्ही म्हणू तेच खरे आहे, असा अहंकार कुणीही बाळगू नये. ही भारतभूमी सर्वांना सामावून घेणारी आहे. कुणालाही न बदलविणारी, प्रत्येकाच्या पूजापद्धतीचा सन्मान राखणारी आपली परंपरा आहे. या परंपरेला अनुरूप असेच हिंदूंनी स्वतःचे आचरण ठेवावे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले होते. डॉ. मोहनजींच्या या भूमिकेचे हिंदू समाजाबरोबरच मुस्लीम समाजानेही स्वागत केले असून मोहनजींनी मांडलेली भूमिका ही अतिशय योग्य असल्याचे मतप्रदर्शन केले आहे. त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय वर्तुळातूनही याविषयीच्या सकारात्मक प्रतिक्रिया शुक्रवारी पाहायला मिळाल्या.
मोहनजींनी मांडलेली भूमिका समर्थनीय : रामदास आठवले
“रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मंदिर-मशीद प्रकरणात जी भूमिका मांडली आहे, ती समर्थनीय आणि अतिशय योग्य आहे,” असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. पुणे येथे शुक्रवारी बोलताना त्यांनी सांगितले की, ’‘बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील भारत निर्माण करायचा असेल, तर प्रत्येक गोष्टीत वाद निर्माण करणे योग्य नाही. ज्ञानवापीच्या निमित्ताने डॉ. मोहनजी भागवत यांनी जी भूमिका मांडली ती योग्य आहे.”
“प्रत्येक मशिदीमध्ये शिवलिंग आहे, हा इतिहास खरा आहे. तथापि, मुस्लीम बंधूदेखील आपलेच आहेत,” म्हणून भागवत यांची भूमिका योग्य असल्याचे आठवले यावेळी म्हणाले.
तसेच याविषयी बोलताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले की, “मशिदींखाली शिवलिंग शोधण्याविषयी मोहनजी भागवत जे बोलले, ते अगदी बरोबर बोलले. मी त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो.”
सरसंघचालकांनी मांडलेली भूमिका स्वागतार्ह
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे वक्तव्य स्वागतार्ह आहे. देशात आजपर्यंत जे काही झाले, त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याची गरज आहे. आगामी काळात दोन्ही समाजांनी परस्परांसोबत उभे राहिले पाहिजे. आपल्या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ देश बनविण्यासाठी काम केले पाहिजे. सध्या देशात मंदिर आणि मशिदीविषयी अस्वस्थता आहे. त्या पार्श्वभूमीवर भागवत यांचे वक्तव्य कौतुकास्पद आहे.
मुफ्ती असद कासमी, उलेमा, देवबंद, सहारनपूर
आपण मुस्लिमांच्या नाही, तर आक्रमणकर्त्यांच्या विरोधात आहोत!
सरसंघचालकांनी केलेले भाष्य व्यक्तिशः मला मान्य नाही. कारण, साधारण ३० हजार ठिकाणी अशी आक्रमणे झाली आहेत. देशाचे मानबिंदू असलेले अयोध्या, काशी, मथुरा हे तीन प्रश्न सुटण्याकडे सध्या प्राधान्य आहे. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर अपमानाच्या खुणा आपण मिटवल्या पाहिजेत. योगी आदित्यनाथ यांनी अनेक शहरांची, रस्त्यांची नावे बदलली. त्यावेळी कोणी ‘१९९१’चा कायदा आड आणला नाही. त्यामुळे आक्रमणे पुसून टाकणे, हे देशातल्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपण मुस्लिमांच्या नाही, तर आक्रमणकर्त्यांच्या विरोधात आहोत. अशी भूमिका ही कुठल्या एका धर्माची नाही, तर ती राष्ट्राची भूमिका असते. त्यामुळे नक्कीच सरसंघचालकांनी मांडलेली भूमिका ही सर्वसामान्य हिंदूंना कदाचित पटणारी नसावी.
मोहन सालेकर, सहमंत्री, विश्व हिंदू परिषद, कोकण प्रांत
आपण हिंदू असो वा मुस्लीम,
येथील प्रत्येक नागरिक हा भारतीय!
सरसंघचालकांनी मांडलेली भूमिका ही योग्यच आहे. भारतात आलेल्या प्रत्येक आक्रमणकर्त्यांनी पूर्वीपासून भारतावर हुकमत गाजवण्याचाच प्रयत्न केला. परंतु, आज आपण मुस्लीम असो वा हिंदू, आपण भारतीय नागरिक असल्याने आपल्या प्रत्येकाचे पूर्वज हे हिंदूच होते. आपल्या सर्वांचा ‘डीएनए’ हा एक आहे. भारत हे एकमेव असे राष्ट्र आहे, जिथे सर्व समुदायाची लोकं संविधानाचे पालन करत शांततेच्या मार्गाने जगत आली. आजच्या काळात देशात केवळ एकाच धर्माचे पालन केले जाते, असे मानणे चुकीचे ठरेल. आपण हिंदू असो वा मुस्लीम इथला प्रत्येक नागरिक हा भारतीय आहे. भारतीय म्हणून जगणे, भारतीय म्हणून राहणे हा प्रत्येकाचा धर्म आणि आपल्या राष्ट्राला प्रगतिपथावर नेणे, हेच प्रत्येकाचे धर्मकार्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने याचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
शालिनी अली, समाजसेविका, नवी दिल्ली
दोन्ही समाजांनी एकत्र येऊन तोडगा काढावा
“आता कोणत्याही मशिदीविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू समाज आंदोलन करणार नाही,” असे रा. स्व. संघ प्रमुख डॉ. मोहनजी भागवत यांनी सांगितले आहे. मात्र, चर्चेद्वारे हे मुद्दे सोडविण्याविषयी भागवत यांच्या विधानाविषयी शंका आहे. यापूर्वी बाबरी मशिदीविषयीही असेल बोलले गेले होते. देशात शांतता राहावी, यासाठी मुस्लीम समाजाने नाईलाजाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मानला होता. त्यामुळे दोन्ही समाजांनी एकत्र येऊन तोडगा काढावा.
मौलाना शाहबुद्दीन रझवी, राष्ट्रीय महासचिव, तंजीम उलेमा-ए-इस्लाम, बरेली