आषाढस्य प्रथम दिवसे...

    30-Jun-2022   
Total Views |
 kalidas
 
 

 
 
आज आषाढ शुद्ध प्रतिपदा अर्थात आषाढस्य प्रथम दिवसे! संपूर्ण साहित्यजगतात केवळ कालिदास हा असा एकमेव कवी आहे की, ज्याच्या काव्यातील एका रचनेमुळे तो दिवस त्या कवीच्या नावे ओळखला जाऊ लागला. कालिदासाच्या उत्तमोत्तम काव्यरत्नातील ‘मेघदूत’ हे एक रत्न. आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघदूताचा थोडक्यात आस्वाद या लेखातून घेऊया... 

 
 
काव्य म्हणजे काय तर ‘वाक्यं रसात्मकं काव्यम्’ अशी काव्याची साधी सरळ व्याख्या संस्कृत साहित्यात केली आहे, तर वर्डस्वर्थच्या मते, ‘थांबवता न येणारा भावनांचा खळाळता प्रवाह’ म्हणजे काव्य. ‘मेघदूत’ या खंडकाव्यात भावनांचा आवेग, रसपूर्णता आणि अभ्यास यांचा सुरेख संगम दिसतो. ‘मेघदूत’ हे विरहरसात बुडालेल्या यक्षाच्या मनात मेघाला पाहून उचंबळून आलेल्या भावनांचं काव्य आहे. खरंतर यक्ष हे पात्र आहे, या भावनांचा कल्लोळ कालिदासाचा आहे. विरहात तळमळणारा यक्ष आकाशात मेघाला पाहतो आणि व्याकूळ झालेला तो यक्ष त्या चेतनाहीन मेघाला आपला दूत बनवून पाठवण्याचं निश्चित करतो. मेघदूत हा केवळ मेघाला आपल्या घरी जाण्यासाठी सांगितलेला मार्ग आहे. यक्षाच्या घराचा पत्ता आहे आणि ओघाने आलेली प्रादेशिक वर्णनं आहेत. सर्वसाधरणत: चित्रपटात काही कथानक नसेल, तर आपली चित्रपटाविषयी वाईट प्रतिक्रिया होते. पण, कालिदासासारख्या सिद्धहस्त लेखकाचा स्पर्श होतो, तेव्हा केवळ पत्ता सांगण्याच्या निमित्ताने एक सुंदर काव्य निर्माण होतं. तर हे आहे मेघदूत...
 
 
 
 
संस्कृत साहित्यात नायकाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. नायकाचे अनेक गुण नाट्यशास्त्रात आलेले आहेत. पण, ‘मेघदूता’च्या नायकाचे साधे नावसुद्धा काव्यात आलेले नाही. कारण, कालिदासाच्या नायकाने प्रमाद केला आहे. नायक हे समाजाचे आदर्श असले पाहिजेत आणि तोच चुकत असेल, तर त्याचं नाव कशाला द्या? कालिदास काव्याची सुरुवात करताना म्हणतो, ‘कश्चित्कान्ताविरहगुरुणा...’ आपल्या प्रिय पत्नीचा भयंकर विरह सहन करणारा कोणीतरी एक पुरुष! बरं हा विरह काही पत्नी माहेरी गेल्यामुळे चार दिवसांचा नाही, तर साक्षात् यक्षपती कुबेराचा शाप आहे. या शापामुळे आलेल्या विरहाचं कारण काय तेही देण्याची तसदी कालिदास घेत नाही आणि मग विद्वानांनाच त्याचं कारण शोधावंसं वाटतं.
 
 
 
यक्षाच्या या शापाविषयी एक कथा रचली गेली, यक्ष हे कुबेराचे सेवक. हिमालय हा त्यांचा निवास. अशाच एका यक्षाला कुबेराने पूजेसाठी सूर्योदयापूर्वीहजार कमळं आणून देण्याची जबाबदारी दिलेली. आधीच हिमालय, त्यात पहाटेची वेळ आणि त्यात या यक्षाचं नवीन लग्न झालेलं. स्वाभाविकपणे नूतन परिणित यक्षाला आपल्या कान्तेला पहाटे पहाटे सोडून फुले आणण्याची कल्पनाच सहन होत नाही. मग त्या रसिक यक्षाला निसर्गाचं भान येतं. त्याच्या लक्षात येतं, अरे, आपण तर फुलं पहाटे काढतो, ती कुठे उमललेली असतात. मग रात्रीच कळ्या काढल्या म्हणून कुठे बिघडलं? हीच ती कल्पना जिथे त्याचं नशीब आडवं येतं. सकाळी कुबेर पूजेला बसतो आणि शेवटचं कमळ अर्पण करायला आणि ते उमलायला एक गाठ पडते. त्या कमळातून एक भुंगा बाहेर पडतो. इथे पुन्हा कविकल्पना. हा भुंगा संध्याकाळच्या वेळी कमळातील मकरंद खायला बसतो आणि तिथेच रममाण होतो. संध्याकाळी कमळाची एक एक पाकळी मिटत जाते आणि भुंगा आत अडकतो. ते कमळ पोखरून बाहेर येण्याची कल्पना त्याला सहन होत नाही. भुंगा आणि कमळाचे पुन्हा सख्य! सकाळ होईल आणि मग पुन्हा कमळ उमललं की आपण बाहेर पडू असा विचार करून तो शांतपणे तिथेच बसून राहतो. पण, नेमका हा सख्यभावच यक्षाचं दुर्दैव ठरतो. यक्षाची लबाडी कुबेराच्या लक्षात येते. तो संतापतो आणि सरळ एक वर्ष प्रियपत्नीचा विरह सोसावा लागेल, असा शाप देऊन मोकळा होतो.
म्हणूनच काव्याचा आरंभ होतो तो,

 
कश्चित्कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारप्रमत्त:
शापेनास्तंगमितमहिमा वर्षभोग्येण भर्तु:।
यक्षश्चठे जनकतनयास्नानपुण्योदकेषु
स्निग्धच्छायातरुषु वसति रामगिर्याश्रमेषु॥



 
कोणी एक यक्ष आपल्या अधिकारात म्हणजे कर्तव्यात प्रमत्त होतो, चूक करतो. संस्कृतमध्ये ‘अधिकार’ हा शब्द मराठीप्रमाणे नसून ‘कर्तव्य’ अशा अर्थी येतो. ‘कर्मणि एव अधिकार: ते’ हे भगवद्गीतेतील वचन आपल्या सर्वांना ज्ञात आहे. स्वत:च्या कर्तव्यात चूक केल्यामुळे आपल्या स्वामीकडून मिळालेल्या शापाने प्रिय पत्नीपासून एक वर्ष दूर राहण्याचं दुर्दैव त्याच्या वाट्याला येतं. हा यक्ष अलकानगरीपासून खूप दूर असलेल्या रामगिरीवर येऊन राहतो. कालिदासाच्या साहित्यात पावित्र्याला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे मेघदूताचा नायक यक्ष थेट येऊन राहिला तो तर कोणी एकेकाळी सीतेसारख्या पतिव्रतेने स्नान केल्यामुळे, जिथले पाणी पवित्र झाले आहे, अशा रामगिरीवरील आश्रमात. नेमक्या शब्दांचा अगदी नेमकेपणाने वापर करण्यात कालिदास तत्पर, शब्दांचा उगीच पसारा नाही. यक्षाची विरहवेदना दाखवण्यासाठी तो ‘आश्रमेषु’ असं आश्रम शब्दाचं अनेक वचन वापरतो. खरंतर येथे ‘स्निग्ध’ म्हणजे घनदाट छाया देणारे वृक्ष आहेत. पण, विरहात तळमळणार्‍या यक्षाला अशा पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाणीसुद्धा स्वस्थता नाही आणि म्हणूनच तो कोणत्या एका आश्रमात न राहता सतत एका आश्रमातून दुसर्‍या आश्रमात फिरत राहतो. विरहाने या यक्षाची काय अवस्था केली आहे, तर
 
तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्त:
सकामी नीत्वा मासान्कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठ:
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श॥
 
त्या पर्वतावर ‘कतिचित’ म्हणजे ‘काही महिने’ असा विरहात राहिल्याचा परिणाम आता दिसायला लागला आहे. संस्कृत साहित्यात कामदेवाचे अरविंद, अशोक, चूतमजिरी म्हणजे आंब्याचा मोहोर, नवमल्लिका, नीलोत्पल म्हणजे नीलकमल असे पाच पुष्पबाण मानले आहेत. पण, प्रेमाचा परिणाम दाखवणारे उन्माद, ताप, शोषण म्हणजे बारीक होणं, स्तंभन आणि संमोहन असे आणखीही पाच बाण मानले आहेत. यातला शोषण हा परिणाम यक्षावर दिसू लागला आहे. अतिशय बारीक झाल्याने त्याच्या हातातील ‘कनकवलय’ गळून पडले आहे. त्याचे मनगट रिकामे दिसत आहे. पण, पत्नी जवळ नसल्याने त्याचेही भान यक्षाला नाही. हीच कल्पना कालिदासाच्या अभिज्ञानशाकुंतलातही दिसते. तिथेही प्रेमविरहाने बारीक झालेला दुष्यंत पुढे येणारं कनकवलय सतत मागे सारत आहे. यानंतर ‘कालिदास दिन’ आपण ज्या ओळींवरून साजरा करतो ती ओळ येते,
 
आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाष्टिसानु।
 
आषाढाच्या पहिल्या दिवशी पर्वत शिखरांवर जमलेले एखाद्या हत्तीप्रमाणे क्रीडा करणारे विशाल मेघ यक्ष बघतो. पण, तो मेघ पाहून यक्षाची अवस्था अधिकच बिकट होते. कारण,
 
मेघालोके भवति सुखिनोप्यन्यथावृत्ति चेत:
कण्ठोषप्रणयिनि जने किं पुनर्दुरसंस्थे।
 
सुखात असलेल्या माणसालासुद्धा मेघाला पाहून हुरहुर वाटते, तर आपल्या प्रिय व्यक्तीला बाहुपाशात घेण्याची इच्छा करणारा दूर असेल तर त्याची काय अवस्था होणार? आपली जर ही अशी अवस्था तर आपल्या प्रियेचं काय झालं असेल. आपल्या विरहात, आपलं काही बरंवाईट झालं नाही ना, अशा कल्पनेने कदाचित तिचे प्राणही तिला सोडून जातील. असं होऊन अजिबात चालणार नाही. आपण आपलं कुशल तिला कळवणं गरजेचं आहे. अशा विचाराने यक्ष त्या जलाने पूर्ण पण अचेतन अशा मेघाला आपला दूत म्हणून पाठवण्याचं निश्चित करतो. कालिदास म्हणतो, धूम, तेज, पाणी आणि वायू यांनी युक्त निर्जीव मेघ कुठे आणि संभाषणात चतुर असलेला दूत कुठे? खरंच, ‘कामार्ता हि प्रकृतिकृपणाश्चेतनाचेतनेषु.’ कामार्त लोकांना चेतन-अचेतनातील फरकसुद्धा कळत नाही. कालिदास जाता जाता जसे प्रेमीजनांविषयीचे सत्य सांगून जातोच, तसेच हवामानशास्त्रातील एक वैज्ञानिक सत्य केवळ एका ओळीत सांगतो. ‘धूमज्योति:सलिलमरुतां संनिपात: क्वमेघ:।’ अशा शब्दात मेघनिर्मितीचे जे तथ्य कालिदासाने सांगितले आहे, ते नव्याने आपल्या साहित्याचा विचार करणार्‍या हवामानशास्त्रज्ञांना अचंबित करते .
 
 
कालिदासाला किंवा सर्वच संस्कृत कवींना मनुष्यस्वभावाची चांगली जाणीव आहे. उद्धटपणाने कोणाला काम सांगितलं आणि सांगणारी व्यक्ती अधिकारावर असेल, तर सेवक काम करेलही, पण ते केवळ उरकण्याच्या हेतूनेच. तेच गोड बोलून एखादं काम सांगितलं, त्याच कौतुक केलं, तर तो जीव तोडून ते काम करेल, हा मनुष्यस्वभाव असतो. एखाद्याला आपलं काम सांगायचं म्हणजे त्याच्याशी उद्धटपणे बोलून चालणार नाही. त्याच्याशी गोड बोलून, त्याला लाडीगोडी लावली तर तो आपल्या कार्याला तयार होईल, याचं भान यक्षालाही आहे. तो जवळ असलेली कुटजकुसुमांची ओंजळ मेघाला अर्पण करतो आणि त्याचे गोड शब्दांत स्वागत करतो, ‘जगात विख्यात असणार्‍या अशा पुष्कलावर्त वंशात तुझा जन्म झाला आहे. तू इच्छारूपधारी असा प्रत्यक्ष इंद्राचा प्रमुख अधिकारी आहेस. तुझा हा बंधू केवळ दुर्दैवामुळे त्याच्या पत्नीपासून दूर गेला आहे. ‘संतप्तानां त्वमसि शरणम्’ अरे तापलेल्यांचा तूच तर आधार आहेस. अर्थात, हे ‘तापणं’ दोन प्रकारे आहे. उन्हाने तप्त झालेल्या पृथ्वीला आणि लोकांना जसं तू शांत करतोस, तसं तुझ्या आगमनाने दूरवर गेलेले वीर, प्रवासी परत येतात आणि आपली प्रेमाची तुझ्याकडे मी याचना करतोय. कारण, नीच लोकांकडून कार्य पूर्ण होण्यापेक्षा ज्येष्ठ लोकांनी आपल्या कार्याला नाकारणे अधिक चांगले नाही का?
 
 
त्याच्या या बोलण्यावर मेघ अचेतन असल्याने काही उत्तर देत नाही, पण कदाचित तीच त्याची मूकसंमती समजून यक्ष मेघाला त्याच गन्तव्य, जाण्याचं ठिकाण सांगतो. मेघाचं गन्तव्य आहे, यक्षेश्वर कुबेराची नगरी अलका. तिथे जाऊन मेघाने आपला संदेश आपल्या पत्नीला द्यावा, अशी यक्षाची इच्छा आहे. अलकानगरीच्या बाहेरील उद्यानात शिवाचा निवास (पान 4 वरुन) आहे. त्याच्या मस्तकावरील चंद्रामुळे या अलकेतील उंच सौंध केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीसुद्धा चंद्रधवल असतात. पण, त्यामुळेच मेघाला अलकेत जाण्याचा आणखी एक फायदा यक्षाला दिसतो. कोणीही झालं तरी एखादं काम का करतं तर त्यातून मला काय मिळेल या जाणिवेतून. जर तू माझा संदेश घेऊ न अलकेला गेलास तर अनायास तुला योगेश्वर शिवाचं दर्शन होईल. शिवदर्शन हे प्रत्यक्ष अलकेत गेल्यावरचं फळ. पण, वाटेतही अनेक फळं मेघाला मिळणार आहेत.
 
 
जेव्हा हा मेघ पवनमार्गावर आरूढ होऊन पुढे पुढे जाईल तेव्हा तुझ्या आगमनाबरोबर त्यांचे दूर देशी गेलेले पती परत येतील, याची खात्री झालेल्या स्त्रिया तुझ्याकडे दुर्लक्ष करतील, हे कसं शक्य आहे? वाटेतील या स्त्रिया आपल्या कुरळ्या केसांच्या बटा हाताने धरून तुझ्याकडे मोठ्या कौतुकाने पाहतील. एखाद्या पुरुषाकडे स्त्रियांनी कौतुकाने पाहणं, हे फार मोठं फळ झालं नाही? तुझा मार्ग आनंददायी करण्याकरिता वारासुद्धा मंद मंद वाहील. तुझ्या डाव्या बाजूने चातक पक्षी मधुर कूजन करत तुला साथ देतील. तू जाताना जात असताना आकाशात बलाका जणू काही तुला त्यांची माला अर्पण केली आहे, अशा रूपात सेवा करतील. सुंदर स्त्रियांचं तुझ्याकडे पाहाणं हे तुझ्या नेत्रांना आनंददायी, मंद वारे हे स्पर्शाला आल्हाददायक आणि चातकांचं मधुर कुजन हे कर्णेद्रियांना उल्लसित करेल.
 
 
 
थोडक्यात, तुझ्या ज्ञानेंद्रियांना आनंदित करणार्‍या अशा कितीतरी गोष्टी तुला वाटेत मिळतील. पण, अशा अनेक फळांचा उपभोग घेत हा आपला दूत रमतगमत गेला, तर भलतीच पंचाईत व्हायची. म्हणून यक्ष त्याला स्पष्टच सांगतो, “बाबा रे, एखाद्या फुलासारखा नाजूक असला तरी आशेचा बंध हा स्त्रियांना जीवनधारणेला उपयोगी ठरतो. हाच बंध तुटला तर दु:खाने अल्पावधीतच त्यांचे प्राणोत्क्रमण होण्याचा धोका असतो. म्हणून एक एक दिवस मोजत असलेल्या तुझ्या या दुर्दैवी बंधूच्या पत्नीला पाहायला तू वेगाने जा.”
 
 
कालिदासाने शरद ऋतूतील मेघाची निवड केली असती, तर तो रिकामा मेघ अलकेपर्यंत पोहोचूच शकला नसता. त्याने ज्या मेघाला दूत म्हणून निवडलं आहे, तो आषाढातला मेघ आहे. थोडक्यात पाण्याने भरलेला आहे. म्हणूनच तो दूपर्यंत जाऊ शकेल.
शिकवलेल्या पक्ष्यांचा उपयोग त्या काळी संदेशवहनासाठी होत असे. परंतु, बाष्पयुक्त धूसर असलेल्या निर्जीव मेघाला ‘दूत’ बनवण्याची अद्वितीय कल्पना कवी कालिदासाला स्फुरली. मग त्या मेघाशी त्याचं हितगुज सुरू झालं. रामगिरी ते अलकानगरी व्हाया उज्जयिनी असा प्रवास तो मेघ कसा करील, त्याला वाटेत काय काय दिसेल, विरहव्याकूळ पत्नी किती दुःखाश्रूढाळत असेल, हे सर्व कालिदासाचा यक्ष मेघाला उत्कट आणि भावमधूरपणे सांगतो. भावनांचा आविष्कार असणारे, प्रेमव्याकुळच नव्हे, तर सर्वांना मोहित करणारे ‘मेघदूत!’ आषाढाच्या प्रथम दिनी याचे स्मरण अपरिहार्यच आहे...! 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

वसुमती करंदीकर

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात संस्कृतमध्ये पीएच.डी करत आहे. प्राच्यविद्या शास्त्र, संस्कृत वृत्तपत्रविद्या यामध्ये पदविका: ब्राह्मी, मोडी, हस्तलिखितशास्त्र, मायथॉलॉजी यांचे सर्टिफिकेट कोर्स विशेष श्रेणीसह पूर्ण केले आहेत. मुंबई विद्यापीठाचे विद्यापीठ स्तरावरचे बुद्धिबळाचे सुवर्ण तर कथा लेखनाचे रौप्य पदक प्राप्त. आतापर्यंत ८ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.