नवी दिल्ली : सध्या भारतात पावसाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. त्याचवेळी जागतिक स्तरावर वाढलेल्या महागाईने होरपळलेल्या सामान्य लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जागतिक स्तरावर तेल उत्पादन घेणाऱ्या देशांच्या ओपेक संघटनेने तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जागतिक बाजारातील तेलाच्या वाढलेल्या किंमती कमी होण्यास मदत होईल. यामुळे संपूर्ण जगालाच दिलासा मिळण्याची शक्यता तयार झाली आहे.
जगातील सर्व मोठ्या तेल उत्पादक देशांची ओपेक ही संघटना आहे. येत्या जुलै - ऑगस्ट महिन्यांपासून ओपेक संघटनेने कच्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात कमी केलेले कच्य्या तेलाचे उत्पादन टप्प्याटप्प्याने वाढविण्याचा निर्णय या संघटनेने घेतला आहे. सध्या ४ लाख ३२ हजार बॅरल्स इतके उत्पादन होत आहे. त्यात आता भर पडून ६ लाख ४८ हजार बॅरल्स इतके उत्पादन घेतले जाणार आहे.
या उत्पादनवाढीच्या निर्णयामुळे भारतासारख्या इंधन गरज भागवण्यासाठी कच्च्या तेलाच्या आयातीवरच अवलंबून असलेल्या देशांना यामुळे निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे. याधीच केंद्र सरकारने इंधनांवरील कर कमी करून सामान्य जनतेला दिलासा दिलेला आहेच पण या नव्या सुखद वार्तेने सामान्यांच्या आनंदात अजून भरच पडणार आहे हे निश्चित.