सरसंघचालकांचे संघशिक्षा वर्गासमोरचे भाषण ऐतिहासिक होते. संवादाचे कितीतरी मार्ग यातून खुले झाले आहेत. एका वेगळ्या पर्वाची नांदी ठरू शकेल, असे हे भाषण होते.
नागपूर येथे संघशिक्षा वर्गाच्या तृतीय वर्षाच्या समारोपाच्या आपल्या भाषणात सरसंघचालकांनी जी विधाने केली, त्याने एका वेगळ्या चर्चेला तोंड फोडले आहे. संघशिक्षा वर्ग ही काही सहज विधान करण्याची जागा नाही. त्यात पुन्हा हा तृतीय वर्षाचा वर्ग, ज्यातून वर्ग पूर्ण केलेले कार्यकर्ते एक तर प्रचारक निघतात किंवा संघाच्या रचनेत महत्त्वाची जबाबदारी घेऊन कामात हरवून जातात. अशा महत्त्वाच्या कार्यकर्त्यांसमोर मार्गदर्शन करताना सरसंघचालकांनी वरील भूमिका मांडली आहे. प्रत्येक मशिदीच्या खाली शिवलिंग तपासून पाहाण्याची गरज नाही, असे त्यांचे विधान आहे. ते अत्यंत स्पष्ट आहे. त्यात कोणतीही संदिग्धता नाही व त्यांनी आपल्या विधानापासून फारकतही घेतलेली नाही.
सूक्ष्मात जाऊन विचार केला तर सरसंघचालकांच्या या विधानात काहीच सनसनाटी नाही. मात्र, आता संघालाही एक महत्त्वाची शक्ती मानू लागलेल्या माध्यमांना यात काहीतरी सनसनाटी वाटते. संघाचे सरसंघचालकपद भूषविलेल्या कुठल्याही सरसंघचालकांनी जशी सम्यक भूमिका मांडली असती, तशीच भूमिका त्यांनी मांडली आहे. संघ हे हिंदूंचे काम करणारे संघटन; मात्र ती अतिरेकी विचारांची हिंदू संघटना नाही. संघाचा मार्ग नियत आहे आणि त्या दिशेने त्याचे कामही सुरू आहे. जिथे हिंदू समाजासाठी संघर्ष करावा लागतो, तिथे संघ तो पूर्ण ताकदीनिशी करतो.
रामजन्मभूमीचा लढाही एका विपरित परिस्थितीत करावा लागला, असेही सरसंघचालकांनी स्पष्ट केले. ज्ञानवापीचा लढा सर्वेक्षणासाठी आणण्यापर्यंत जितका कमी वेळ याचिकाकर्त्यांना लागला, त्याच्या कितीतरी पट वेळ अयोध्येसाठी लागला होता. हिंदूंच्या भावनांची कदर करणारे सरकार आज केंद्रात विराजमान आहे आणि हिंदूंच्या न्याय व हक्कांची त्यांना पूर्ण जाणीव आहे. मात्र, सरकार आल्याने हिंदूंचे व हिंदुत्वासमोरचे सगळे प्रश्न संपतात, असे मुळीच नाही. हा चिरकालीन चालणारा संघर्ष आहे. हिंदूंना त्यात महत्त्वाची भूमिकाही असेल. मात्र, ती संयत मार्गानेच पार पाडावी लागेल. न्यायालय हा त्यातला सर्वोत्तम मार्ग आहे. न्यायालयाने दिलेला निवाडा मान्य करण्याचे सांमजस्यही हिंदूंना दाखवावे लागेल, असेही सरसंघचालक यावेळी बोलताना म्हणाले.
खरे तर हिंदुत्व ही काही संघाची मक्तेदारी नाही. संघाच्या स्थापनेपूर्वी व संघाच्या समकालीनही अनेक हिंदू संघटना अस्तित्वात होत्या व आजही आहेत. राजकीय पक्षही होते व आजही आहेत. मात्र, संघाच्या विस्ताराचे व वर्धिष्णू स्थायीभावाचे उत्तर संघाच्या कार्यशैलीतच दडलेले आहे. हिंदूंच्या मूळ मुद्द्याशी संघाने कधीच फारकत घेतलेली नाही. मात्र, नवउत्साही मंडळींना वाटते तसे संघाचे काम प्रतिक्रियावादीही नाही. समाज निराळा व संघ निराळा. मात्र, हिंदू समाजाने हिंदूंचे सगळ्यात मोठे संघटन असण्याचा बहुमान संघालाच का दिला, याचाही तपशीलात जाऊन विचार करावा लागेल. डॉक्टर हेडगेवारांनी जी संघकामाची पद्धत विकसित केली, ती सर्वसमावेशक असली तरी भोंगळ नव्हती. ही कार्यपद्धती निश्चित होती. सर्वसमावेशकता हाच या कामाचा गाभा होता व आहे.
हिंदुत्वाचा विचार राजकीय पटलाच्या केंद्रस्थानी येतो, असे म्हटल्यावर आता हिंदुत्ववादी होणार्यांचीही भाऊगर्दी झाली आहे. हिंदूंच्या अस्मितांचे मुद्दे आता अनेकांना त्यांच्या अस्तित्वाचे वाटतात. संघाला याच्याशी काही देणेघेणे नाही. काही वाटत असेल, तर अशा बदलांचे संघ स्वागतच करेल. कारण, या सगळ्याच्या पलीकडे संघाचे काम आहे. सरसंघचालक आपल्या भाषणात म्हणाले तसे, हे राष्ट्र ही आपली प्राथमिकता आहे. फाळणी झाल्यानंतर हा देश सोडून जे तिकडे गेले नाहीत, मात्र इथेच राहिले, त्यांचा विचार आपण कशाप्रकारे करणार आहोत, असा प्रश्नच एका अर्थाने सरसंघचालकांनी निर्माण केला आहे. हा प्रश्न खर्या अर्थाने संघ मानणार्यांनाच केला आहे.
निर्लेप नेतृत्व आणि अनुयायांचा अनुनय न करता, त्यांना दिशा दाखविण्याचा हा पवित्रा ऐतिहासिक मानावा लागेल. बाळासाहेब देवरसांनी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत अस्पृश्यतेविषयी जी विधाने केली होती, त्याची आठवण यावी, असा हा क्षण आहे. त्या विधानाचा अर्थ संघ त्यापूर्वी अस्पृश्यतेचा समर्थक होता, असे मुळीच नाही. मात्र, बाळासाहेबांनी या विषयात रोखठोक भूमिका घेतल्याने स्वयंसेवकांच्या मनातील किंतु-परंतुही दूर झाले. संघ कसा आहे, त्याचे वर्णन अनेक वेळा समाजातील अनेक मान्यवर व माध्यमे करीत असतात. संघ तसाच आहे, असे अनेकदा स्वयंसेवकांनाही वाटू लागते. हिंदुत्वाच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणार्या मंडळींचे जसे हिंदूंना आकर्षण वाटते, तसे ते स्वयंसेवकांनाही वाटते. सरसंघचालकांनी कालच्या भाषणात इंग्रजीत ज्याला ‘रिकॅलिब्रेट’ करतात तसे काहीसे केले.
हिंदूंचा स्थायीभाव मात्र कुठलीही तडजोड न करता त्यांनी मांडला. या भाषणाचे निरनिराळे अर्थ लावले जातील. गरज पडेल तिथे संघर्ष अन्यथा समन्वय, असा मार्ग सरसंघचालकांनी दाखविला. या भाषणाचा संदेश दोन गटांसाठी आहे. पहिला गट अर्थात हिंदूंसाठी काही करू इच्छिणार्या हिंदूंचा आहे, तर दुसरा भारतीय मुस्लिमांचा. त्यांनी अत्यंत संयतपणे मुस्लिमांना संघाच्या मनात त्यांचे काय स्थान आहे, ते दाखवून दिले. अन्य कुणीतरी किंवा मुल्ला-मौलवींच्या सांगण्यावरून ही मंडळी संघाचे मूल्यमापन करीत असतात. सरसंघचालकांनी आपल्या भाषणातून चर्चेचे एक वेगळे व्यासपीठच त्यांना उपलब्ध करून दिले आहे. आपल्या नादान नेत्यांच्या नादी लागून हिंदूंबरोबर संबंध खराब करायचे की मोठ्या मनाने हिंदूंची मानबिंदू असलेली स्थाने त्यांना सन्मानाने देऊन टाकयची, याचा निर्णय भारतीय मुस्लिमांना घ्यावा लागेल. पहिल्या मार्गात कटूताच वाढेल, मात्र दुसर्या मार्गात हिंदूंसोबत विश्वासाचे नाते निर्माण करण्याची संधी दडलेली आहे.