नवी दिल्ली : काश्मीर मध्ये दहशतवाद्यांकडून सातत्याने हिंदूंना लक्ष्य केले जात असल्याच्या घटनांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गंभीर दखल घेतली आहे. या वाढत्या हल्ल्यांना योग्य उत्तर देण्यासाठी अमित शाह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची शुक्रवार दि. ३ मे रोजी बैठक बोलावली आहे. या बैठकीत जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृहमंत्रालायचे वरिष्ठ अधिकारी हे सर्व उपस्थित राहणार आहेत.
काश्मीर मध्ये हिंदूंना लक्ष्य करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच एका हिंदू बँक मॅनेजरची बँकेत घुसून हत्या करण्यात आली.त्यानंतर अवघ्या १२ तासांत बिहार मधून आलेल्या दिलखुश कुमार या युवकाची हत्या करण्यात आली आहे. याआधी सोमवारी एका काश्मिरी पंडित शिक्षिकेची हत्या करण्यात आली होती. या सर्व घटनांमधून काश्मिरी पंडितांना पुन्हा एकदा काश्मीर बाहेर हुसकावून लावण्याचे षड्यंत्र सुरू झाले आहे.
काश्मीर खोऱ्यात घडणाऱ्या या सर्व घटनांमुळे काश्मिरी पंडितांमध्ये घबराट उडाली आहे. केंद्र सरकारने याविरोधात ठोस पावले उचलावीत अशी मागणी काश्मिरी पंडितांकडून होत आहे.