नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी ज्ञानवापी, शिवलिंग, देशातील मुस्लीम आणि मंदिर आंदोलन या सर्वच प्रकरणांवर परखड मत व्यक्त केले. गुरुवार, दि. २ जून रोजी नागपूरात सुरू असलेल्या संघाच्या तृतीय वर्षाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. "देवस्थळांवर जिथे हिंदूंची श्रद्धा जोडलेली आहे. त्यावर आपापसात सहमतीने निकाल लागावा. तसे न झाल्यास प्रकरणे न्यायालयात जातात. मग त्यानंतर जो काही निकाल येईल तो सर्व पक्षांनी मान्य करायला हवा", असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले, “नुकतेच एक प्रकरण निघाले आहे. ज्ञानवापीचा मुद्दा चर्चेत आहे. आता इतिहास आपण बदलू शकत नाहीत. तो इतिहास आपण तयार केलेला नाही. आज स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्यांनी तो लिहीलेला नाही. तसेच आजच्या मुस्लीमांनीही तो लिहीलेला नाही. तो यापूर्वीच घडाला होता. इस्लाम बाहेरून आला. त्यावेळी भारतात राहणाऱ्यांच्या स्वातंत्र्याचे हनन करण्यासाठी आणि त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी देवस्थाने उध्वस्त करण्यात आली. त्याची संख्या हजारोंत आहे. हिंदू समाजाचे लक्ष्य विशेष अशा ठिकाणी आहे, जिथे त्यांची श्रद्धा जो़डलेली आहे."
हिंदू मुस्लीमांविरोधात कधी विचार करत नाही
"हिंदू मुस्लीमांविरोधात कधी विचार करत नाही. आजच्या मुस्लीमांचे तेव्हाचे पूर्वजही हिंदूच होते. तेव्हाच्या आक्रमणकाऱ्यांनी स्वातंत्र्याचे हनन केले. त्यांचे मनोधैर्य दाबले. त्यामुळे हिंदूंना असे वाटते की त्या धर्मस्थळांचा जीर्णोध्दार व्हावा. आम्ही या प्रकरणांबद्दल काही बोलत नाही. आम्ही ९ नोव्हेंबर रोजीच स्पष्ट केले होते की, एक राम मंदिर आंदोलन होते. ज्यात आम्ही प्रवाहाविरुद्ध एका ऐतिहासिक कारणास्तव त्या परिस्थितीत सहभागी झालो होतो आणि ते कार्य पूर्णत्वास आलं आहे. आता आम्हाला कोणतेही आंदोलन करायचे नाही.", असेही ते पुढे म्हणाले.
न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले पाहिजे
"एखाद्या विषयासंदर्भात एकत्र बसून काहीतरी तोडगा काढणं, ही चांगली गोष्ट आहे. परंतु, दरवेळी असे घडू शकत नाही. म्हणून लोकं न्यायालयात जातात. अशा परिस्थितीत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन केले पाहिजे. न्यायालयांच्या निर्णयांवर शंका घेऊ नये.", असे सरसंघचालक म्हणाले.
ज्ञानवापीबद्दल काय म्हणाले सरसंघचालक
"काही प्रतिकात्मक स्थळांबद्दल आपल्याला विशेष आदर आहे. पण रोज नवे प्रकरण काढायची गरज नाही. परंपरेने चालत आलेल्या ज्ञानवापीबद्दल आपल्या काही समजुती आहेत, ते बरोबर आहे. पण प्रत्येक मशिदीत शिवलिंग का पहावे? तीही एक पूजाच आहे. परंतु, ज्यांनी मुस्लिमांना आत्मसात केली आहे ते बाहेरचे नाहीत. त्यांनीही हे समजून घेतले पाहिजे. पूजा त्यांच्या बाजूने असली तरी त्यांना त्यात राहायचे आहे, ही चांगली गोष्ट आहे. आमचा इथल्या कोणत्याही पूजेला विरोध नाही. प्रत्येकाची ओळख आणि सर्वांच्या प्रतिकांप्रती पवित्रतेची भावना तिच असते."
रशिया-युक्रेन युद्धामुळे राष्ट्रासमोर सुरक्षा आणि आर्थिक आव्हाने
सरसंघचालकांनी आपल्या भाषणात युक्रेन युद्धाचाही उल्लेख केला. भारत सत्य बोलत असून संतुलित धोरण स्वीकारत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. भारत हा सध्या शक्तिशाली होत आहे. परंतु चीन हे युद्ध का थांबवत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 'युद्धामुळे सुरक्षा आणि आर्थिक आव्हाने निर्माण झाली आहेत.', अशी चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.