राष्ट्रीय शिक्षण संस्थाचा दि. 3 जुलै रोजी शताब्दी सोहळा साजरा करत आहे. 100 वर्षांपूर्वी मनमाडसारख्या कामगार वस्तीच्या गावात शाळा सुरू करणे, हे एक आव्हानच होते आणि विपरित परिस्थितीतदेखील हे आव्हान रावसाहेब यांनी लीलया पेलले व शाळेची मुहूर्तमेढ रोवली. विंदा करंदीकरांसारखे सारस्वत विद्यालयात काही काळ शिक्षक म्हणून कार्यरत होते. ज्ञानदानाची सदावर्ते घालणार्या या संस्थेने पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडले सुसंस्कृत समाज घडविण्याचे काम नि:स्वार्थपणे केले आहे, त्याविषयी...
रावसाहेब डी. एस. सप्रे यांचा जन्म कोकणातील प्रिंदावण या गावी झाला. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत दहा किलोमीटर पायी चालत जाऊन त्यांनी राजापूर येथे माध्यमिक शिक्षण घेतले. उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये दाखल झाले. रेल्वेत अधिकारी पदी रुजू झाले. स्वतः खडतर परिस्थितीत शिक्षण घेतले असल्याने शिक्षणाचे महत्त्व त्यांना कळले होते. रावसाहेब हे ‘टिळकभक्त’ होते. टिळकांवर त्यांची निस्सिम श्रद्धा होती. या श्रद्धेतून त्यांनी शहरात राष्ट्रीय शिक्षण संस्थेची स्थापना केली. लोकमान्य टिळकांनी सांगितलेल्या चतु:सूत्रीतील स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, परकीय मालावर बहिष्कार, यातील राष्ट्रीय शिक्षण हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी शाळेची मूर्तमेढ रोवली. यासाठी त्यांना तत्कालीन रेल्वे प्रशासनाने सहकार्य केले व कार्यकर्ता इमारत जागा आणि काही जुने फर्निचर उपलब्ध करून दिले.
रावसाहेबांना समाजातील तळागाळातील वंचित वर्गाला शिक्षण मिळावे, ही तळमळ होती. त्यासाठी संस्थेची स्थापना केली. संस्थेत दाखल झालेला पहिला विद्यार्थी हा बहुजन समाजातील होता. शिक्षणापासून अनेक वर्षे वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी रावसाहेबांनी स्वतः लक्ष दिले, मदत केली. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते प्राशन केल्याखेरीज मनुष्य जातीचा उद्धार होणार नाही, यावर त्यांची ठाम श्रद्धा होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजींशी रावसाहेबांचा निकटचा संबंध होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशीदेखील रावसाहेबांचा निकटचा स्नेह होता. या स्नेहामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शाळेच्या वाटचालीत निर्माण झालेले अडथळे दूर करण्यास त्याकाळी मदत केली होती. ब्रिटिश अमदानीत तत्कालीन इंग्रज सरकारच्या प्रतिनिधीने शाळेच्या गुणवत्तेची पाहणी केल्यानंतर मी पाहिलेली भारतातील एकमेव ‘उत्कृष्ट नेटिव्ह शाळा’ असा लेखी पाहणी अहवाल आजही संस्थेच्या दप्तरी आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात शाळेत सेवेत असलेल्या शिक्षकांनी, अनेक तत्कालीन माजी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गोवामुक्ती, हैदराबाद मुक्ती आदी आंदोलनात शाळेचा निकटचा संबंध होता. 1975 ला लादलेल्या आणीबाणीत शाळेतील तत्कालीन शिक्षक, संस्थाचालक तुरुंगात होते. मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यातदेखील शाळेच्या शिक्षकांचा सहभाग होता. याशिवाय शहरातील सांस्कृतिक सामाजिक चळवळींचे केंद्रबिंदू शाळा ठरली आहे. महाराष्ट्रातील एकही असा साहित्यिक, विचारवंत नाही की, ज्याचे पाय लोकमान्य सभागृहास लागले नाहीत. केवळ आणि केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा विद्यार्थ्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी गेल्या 100 वर्षांत संस्थेने प्रचंड मोठी मेहनत घेतली आहे. विंदा करंदीकर विद्यालयात काही काळ अध्यापक म्हणून कार्यरत होते. द. वि. केतकर यांसारखे उत्तम प्रशासक, हाडाचे शिक्षक, नावाजलेले इतिहासकार, लेखक हे अनेक वर्षे विद्यालयात प्राचार्य म्हणून काम बघत होते.

शाळेतील अनेक शिक्षकांचे काव्यसंग्रह, कथासंग्रह, पुस्तके, प्रसिद्ध झाली आहेत. मराठीतील नामवंत कवी अशोक नायगावकर हे विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. यांसह अनेक विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी परीक्षेत गुणवत्ता यादीत विद्यालयाचे नाव झळकविले आहे. जीवनाची विविध क्षेत्रे संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी पादाक्रांत केली आहेत. सुरुवातीस मराठी माध्यमाची पाचवी ते दहावी असणार्या शाळेने आपला विस्तार करून उच्च माध्यमिक शास्त्र विभाग इंग्रजी माध्यम विभाग प्राथमिक विभाग असे अनेक विभाग सुरू केला. शिष्यवृत्ती परीक्षेत एकाच वेळी गुणवत्ता यादीत संस्थेच्या दहा विद्यार्थ्यांचा समावेश झाला होता. विज्ञान प्रदर्शनात राज्य राष्ट्रीय पातळीवर विद्यालयाने आपला झेंडा फडकविला आहे. क्रीडा क्षेत्रात अनेक नावाजलेले क्रीडापटू विद्यालयाने दिले आहेत.
‘ऋतंच् सत्यंच्’ हे बोधवाक्य घेऊन संस्था काम करते. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुसज्ज प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष यांसह आवश्यक असणार्या सर्व सोईसुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेस वाव देण्यासाठी विद्यालयातर्फे हस्तलिखिते तयार केली जातात. विद्यालयाचा स्वतःचा लेझीम समूह आहे. तसेच अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना व प्रेम, बंधुभाव जागृत व्हावा म्हणून शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी, त्यांनी नवीन कौशल्ये आत्मसात करावी, यासाठी संस्थाचालक शिक्षकांना सातत्याने प्रोत्साहित करत असतात. राज्यभरातील विविध शिक्षण संस्थांच्या भेटीचे उपक्रम शिक्षकांसाठी राबविले जातात व त्या माध्यमातून त्या संस्थांतील नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन शिक्षक आपली कौशल्ये विकसित करू शकतात. शाळेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून माजी विद्यार्थ्यांचे मेळावे, त्यांचे विद्यार्थी दशेतील अनुभवकथन, संस्थेचे संकेतस्थळ तयार करणे, स्मरणिका प्रकाशित करणे आणि सर्वात म्हणजे 100 वर्षांतील कर्तृत्ववान विद्यार्थ्यांची माहिती देणारी विद्यालयाच्या सुवर्णमुद्रा नावाने लेखमाला प्रसिद्ध केली जात आहे. संस्थेच्या संचालक मंडळात शहरातील नावाजलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असून संस्थाचालक विविध क्षेत्रांतील नामवंत आहेत. आपल्या अनुभवाचा, ज्ञानाचा फायदा ते सातत्याने विद्यालयाला करून देत असतात.