ठाणे : राजकीय नेत्यांचा उदो उदो करण्याचे दक्षिणेतील पेव ठाण्यातही आले असून एकनाथ शिंदे यांना बाहुबलीचे रूप देण्यात आले आहे. शिवसेना दक्षिण भारतीय विभागानं एकनाथ शिंदे यांची प्रतिमा बाहुबलीच्या रूपात उभारली आहे. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोरच एकनाथ शिंदे यांचा बाहुबली रूपातील भव्य फलक लावण्यात आला आहे.
या फलकावर बाहुबलीची प्रतिमा असून त्यावर एकनाथ शिंदे यांचं छायाचित्र लावण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या हृदयात आनंद दिघे तर एका बाजूला विधानसभा आणि दुस-या बाजूला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे छायाचित्र दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे गेली अडीच वर्ष भक्कम असलेल्या आघाडी सरकारला मोठा झटका बसला आहे.
या फलकातून एकप्रकारे शिंदे हे बाहुबली असल्याचेच दर्शवण्यात आले आहे. या फलकावर 'विजयी भव' असा संदेश असून शिवसेना दक्षिण भारतीय विभागाने हा फलक लावला आहे.