वृक्षांचेही स्थलांतर आणि वृक्षसंवर्धन...

    29-Jun-2022
Total Views |
Trees1
 
 
 
 
 
दि.2 जून रोजी आमच्या सांदीपनी प्रभात शाखेचा ‘हिंदू साम्राज्य दिना’चा उत्सव सकाळी देवीच्या मंदिरात घेण्याचे ठरले. मी आमच्या शाखा कार्यवाह/मुख्यशिक्षकांना सुचवले की, आपला उत्सव संपला की, लगेचच आपण जयप्रकाश नगरात वृक्षारोपण करुया. रा. स्व. संघाने 2019 पासून गतिविधीमध्ये पर्यावरण हा विषय अंतर्भूत केला. त्यासंदर्भातले काही...
 
 
 
आमच्या ‘जयस सोसायटी’चा पुनर्विकास पुढील चार महिन्यांत सुरू होईल, असा अंदाज. आवारातील शक्य असतील तेवढी सर्व झाडे जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु, काही झाडे काढणे अपरिहार्य आहे. त्यामुळे मी मनात विचार केला की, नवीन झाडे विकत घेण्यापेक्षा सोसायटीतील काही झाडांची पुनर्लावणी करावी. जयप्रकाश नारायण उद्यानात झाडे लावावी, असे वाटले. सार्वजनिक उद्यानात झाडे लावताना बर्‍याचदा असा विचार होतो की, शोभेची झाडे लावू, फुला-फळांची नको अन्यथा लोक काढून नेतील. पण मी विचार केला, फुला-फळांनी भरलेली बाग बघितली की, मग प्रसन्न होते. एकदा झाड जगले की, मग चिंता नाही. ते देतच राहणार.
 
 
 
 
 
या कार्यक्रमाला गोरेगावातील वृक्षप्रेमींना जोडावे म्हणून मी संदीप आठलेला निरोप दिला. आठले वहिनींनी मला एक खुरूपे (रान काढण्याची कोयती) दिले. आमच्या शाळेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरही या कार्यक्रमाला येण्याचे आवाहन केले. समीर करमरकरकडून कुदळ/फावडे/घमेले आणले. आमच्या सोसायटीतील पहारही मिळवली. थोडक्यात लागणारी सर्व अवजारे जमवली. सोसायटीतील झाडे काढण्यासाठी दि. 11 जून, 4 वाजता) ही वेळ नक्की केली. आमच्या सोसायटीतील सुहास बापट अणि त्यांच्या पत्नी मनीषा यांनी बेल/पानफुटी (किडनी स्टोनसाठी जालीम औषध)/कढीपत्ता अशी अनेक झाडे जीवापाड मेहनत घेऊन जगवली आहेत आणि ती पुनर्विकासात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्यांदा तीच झाडे स्थलांतरित करावी ठरवले. फावडी / कुदळ / पहार आणि खुरपी गाडीच्या ‘डिक्की’तून बाहेर काढले आणि सुहास बापटला हाक मारली. सुहासने सुचवले की, झाडे काढण्याआधी तेथे थोडे पाणी घालूया. त्यामुळे तो पाईप जोडणी करायला गेला. मी त्याला म्हटले, मी थोडी सुरुवात करतो. पाऊस कालच पडून गेला असल्यामुळे माती तशी ओली वाटते. पहिले बेलाचे पुरुषभर उंचीचे झाड निवडले. त्या झाडाच्या खाली पान (मघई) वेल आणि पानफुटी यांनी वेढाच दिला होता. प्रथम पानवेल काढण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून खुरपे हातात घेतले आणि हळूहळू गोलाकार पद्धतीने बेणायला सुरुवात केली. काढलेले वेल आणि पानफुटी वेगळ्या बाजूला ठेवायला सुरुवात केली. कारण, तीही स्थलांतरित करायची होती. दहा मिनिटांनी बेलाचे मूळ दिसू लागले आणि जरा हायसे वाटले.
 
 
 
मुळाच्या बाजूला उकरता उकरता लक्षात आले याचे एक मूळ जमिनीला समांतर पसरले आहे. आणि मग मी खुरूपे उभ्याऐवजी आडवे चालवायला सुरुवात केली. बघता बघता चार ते पाच फूट लांबीचे मूळ! मग पुन्हा गोलाकार उकरायला सुरुवात केली. त्या झाडाचे आदिमूळ खूप खोल होते. त्यामुळे ते पूर्ण मिळणे शक्य नव्हते, पण निदान सोटमूळ पूर्ण मिळाले होते. त्यामुळे आदिमूळ फूटभर उंचीवर झाटले. बाकीची सोटमुळे बर्‍यापैकी उकरली होती. हळूहळू जोर लावून झाड थोडे पिरगळले आणि अहो आश्चर्य, चक्क पूर्ण झाड मुळासकट हातात आले. काय आनंद झाला म्हणून सांगू. मी मनीषा/बंडू (सुहास) ला जोरात हाक मारली आणि त्यांना ते झाड हातात घेऊन दाखवले ‘मिशन बेल’ फत्ते! बेलाचे एवढे मोठे झाड साध्या खुरुप्याने मुळासकट निघाल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला.
 
 
 
आता कढीपत्याचे झाड. ‘टेक्निक’ कळले होते, फक्त बराच वेळ खाली वाकून बसावे लागत असल्यामुळे आणि अंगमेहनीतीची सवय नसल्यामुळे दमायला व्हायचे. थोडे थांबत थांबत का होईना, कढीपत्ता निघाला. दोन झाडे काढण्यात बरीच दमछाक झाली. मी थोड थांबून त्याचा व्हिडिओही केला आणि काही ग्रुप्सवर पुन्हा आवाहन केले, कुणीतरी या रे !. थोडी विश्रांती घेतल्यावर सदाफुली आणि काही कढीपत्त्याची छोटी झाडे पटापट काढली आणि एक एक प्रकारची झाडे रांगेत लावायला सुरुवात केली. एवढे होते तो मनीषा खाली आली व म्हणाली, “अरे दोन लिंबाची झाडे आहेत, ती पण घेऊन जा.” मी लगेचच लिंबाकडे वळलो.
चार वर्षांपूर्वी मी मोठ्या प्रमाणावर छत बाग करत होतो, पण नंतरनंतर कंटाळा येऊ लागला. गच्चीत नळ नसल्यामुळे खालून पाण्याची बादली न्यावी लागे. मी पाणी न घातल्यास झाडांना पाणी घालणारी माझी खास मैत्रीण (आपटे काकू) यांचं अचानक देवाघरी जाणं, गच्चीचे वॉटर प्रुफिंग, उंदरांचा त्रास अशा अनेक कारणांनी मी ही छतबाग खाली आणली होती.
 
 
 
छतबागेतील पारिजातक, गोकर्ण, सदाफुली, वड अशी सर्व झाडे खाली होतीच आणि नंदिनी भावेने लावलेली कडुनिंब, डाळींब अशी झाडे होती. हळूहळू ती झाडे मोकळी करण्याचे काम सुरू केले आणि शाळेत जशी मुले बसवतात, तसे मी सर्व काढलेल्या झाडांना रांगेत बसवले. जवळपास संधीप्रकाशही संपत येत होता आणि माझ्या लक्षात आले पाण्याच्या टाकीच्या शेजारची अबोली आणि केळीची झाडे काढायची बाकी आहेत. थोडा कंटाळल्यामुळे केळ बुंध्यात तुटली, मग आणखी एक केळ मुळासकट काढली आणि दोन्ही सोपे बांधून ठेवले. हातोहात जास्वंद व अनंताच्या फांद्या कटरने तोडल्या आणि दोरीने एकत्र बांधून ठेवल्या.
सर्व झाडे बांधून झाल्यावर विचार केला,आता ही उद्या सकाळपर्यंत अशीच ठेवली तर वाळतील. मुळांना जास्त मातीही नव्हती. त्यामुळे घरातून एक गुलाबी बेडशीट घेतली. बेडशीट पाण्यात भिजवून सर्व झाडांवर पांघरली, आणखी वर पाणी मारले 10 वाजले होते. माझ्या डोक्यात मात्र सर्व झाडे व्यवस्थित कशी लागतील, याचीच चिंता होत
 
 
 
 
Trees
 
 
 
 
 
दि. 12 जून शिवराज्याभिषेक दिन सकाळी आटोपून दुर्गा देवीच्या देवळात उत्सवाला 8.30 ला पोहोचलो. शरीराने मी देवळात होतो, पण मनाने उद्यानात. 9.30 ला उत्सव संपताच आम्ही संदीप आठलेच्या नर्सरीमध्ये गेलो. त्याने तुळशीची दहा रोप काढून ठेवली होती. त्याच्याकडून फावडे व एक आणखी खुरूपे घेतले. त्याने दोन जास्वंदाची रोपे भेट म्हणून दिली. आम्ही उद्यानात पोहोचतो, तोपर्यंत अरविंदजींनी झाडे सोसायटीमधून उद्यानात आणून ठेवली होती. सांदीपनी शाखेतून गौरव जोशी (मुख्यशिक्षक), श्रीधर जोशी, अरविंद जोशी, संदीप दिवेकर आणि शिवराज होते, तर ‘शंखनाद ग्रुप’मधून अरविंद सुतार, गुरुजी (आनंद टोपले), विजय मेस्त्री होते. झाडे पाहून शिल्पाताई आम्हाला ‘जॉईन’ झाल्या. कार्यक्रमाची सुरुवात विजय मेस्त्री आणि गुरुजी यांनी शंखनादाने केली. मग आम्ही दोन गट केले आणि कामाला सुरुवात केली. एका गटाने तुळशी लावायला घेतल्या व दुसर्‍या गटाने कढीपत्ता. त्यावेळी माझ्या लक्षात आले की, अधिक मनुष्यबळाची गरज आहे आणि मी जोशी याचा एक फोटो पोस्ट करून शाळेच्या, सोसायटीच्या आणि जयप्रकाश नगरच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मित्रांना येण्याचे आवाहन केले. की मनुष्यबळाची आवश्यकता आहे. कढीपत्ता आणि तुळशी लावून झाल्यावर आम्ही प्राजक्त आणि पानफुटीची झाडे लावायला घेतली.
 
 
तत्पश्चात शिल्पाताई व अरविंद जोशी यांनी रजा घेतली. हळूहळू संख्या घटत जाणार हे लक्षात घेऊन आम्ही मोठी झाडे आधी लावण्याचा विचार केला. बेलाचे झाड कुठे लावावे, हा प्रश्नच होता. कारण, झाड मोठेही होते आणि सूर्यप्रकाश आणि पुरेशी मोकळी जागा हवी होती. खेळण्यांच्या अलीकडील गोल आमच्या सगळ्यांच्या पसंतीस पडला आणि आम्ही मोठा खड्डा खणून तेथे बेलाची झाडे लावली. तशी पावसाची मेहरबानी होती, पण त्यामुळे ऊन खूप जाणवत होते. तोपर्यंत आम्ही पुन्हा थोडे खड्डे खणायला सुरुवात केली. दोन केळी, अननस व वड लावला. मी, गौरव आणि संदीपला सोनटक्क्याची झाडे लावायला सांगितले आणि मी, अरविंदजी व गुरुजी चाफा लावण्यासाठी खड्डा खणू लागलो. आम्ही चाफ्याचे झाड लावले आणि त्यावर उरलेली माती लोटून दिली.
 
 
अरविंदजी पहारेने पटापट खड्डे खणत होते. अबोली लावून झाल्यावर अरविंदजी व गुरुजी निघाले. आता उरलो मी, संदीप दिवेकर आणि गौरव. काही मोजकीच झाडे शिल्लक होती. मी गौरवला एक खुरूपे दिले आणि एक मी घेतले आणि पटापट खडे खोदायला घेतले. लिंब / जास्वंदीच्या खांद्या/अनंताच्या खांद्या, सदाफुली, लिली अशाक्रमाने झाडे लावायला सुरुवात केली. संख्या कमी झाल्यामुळे जरा आटोपतेच घेत होतो. संदीपला म्हटले, “तू माझा खरा मित्र, सगळे गेले पण तू मात्र थांबलास.” लिली, लिंबू आणि सदाफुली लावायला घेतली. त्यानंतर माझ्या असे लक्षात आले की, जाण्याच्या घाईत काही जणांनी अनंत आणि जास्वंदाच्या अनेक फांद्या एकाच खड्ड्यात खोचल्या होत्या. मी पुन्हा त्या सर्व फांद्या वेगळ्या केल्या आणि नवीन खड्डे करून एक एक फांदी रोवली. जवळपास पाऊणे तीन झाले होते. मी संदीपला म्हटले, आता एवढे केले तर झाडांना एकदा पाणीही घालू. न बोलता त्यांनी मला डब्यातून पाणी आणून देण्यास सुरुवात केली आणि मी पटापट जिथे जिथे झाडे लावली तिथे तिथे पाणी घालायला सुरुवात केली. संध्याकाळी पुन्हा गाडी काढली आणि समीर आणि संदीप यांच्याकडून घेतलेली हत्यारे त्यांना पुन्हा परत करून आलो.
 
 
 
मला आमच्या संघचालक दादा वैद्यांचे वाक्य आठवले - ज्याचे त्याने, जिथल्या तिथे आणि जेव्हाच्या तेव्हा केले की, काम चोख. वृक्षलागवड तर पूर्ण झाली, पण आता महत्त्वाचे आहे ते त्यांचे संवर्धन आणि ही जबाबदारी आहे, आपल्या सर्व जयप्रकाश नगरवासीयांची! प्रामुख्याने जे दैनंदिन या उद्यानात येतात. जयसमधील झाडांना जसे उद्यानात नवीन मित्र मिळाले तसे यानिमित्ताने मलाही दोन नवीन मित्र मिळाले, यशवंत नाईक काका आणि डॉ. संतोष पोतनीस. वृक्षांचे स्थलांतर करून वृक्षांचे संवर्धन करणे ही सुद्धा एक कला आहे. ती कला आम्हाला साध्य झाली हे नक्की!
 
-अजित वर्तक