शाहूंचा पुरोगामी विचारवारसा आणि कृतिशीलता

Total Views |
 
shahu maharaj
 
 
 
शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून मिरवणार्‍या महाराष्ट्रात आज दुर्देवाने शाहू महाराजांच्या विचारांच्या कृतिशीलतेचा मात्र प्रकर्षाने अभाव दिसून येतो. त्यातच ‘पुरोगामी’ या शब्दाच्या आणि एकूणच वर्तमानातील या विचारांच्या अवमूल्यनाच्या पार्श्वभूमीवर, शाहू महाराजांच्या नुकत्याच संपन्न झालेल्या जयंतीनिमित्त त्यांचा विचारवारसा आणि कृतिशीलतेची गरज अधोरेखित करणारा हा लेख...
 
 
पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणत महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेष आंबेडकर या तीन महामानवांचे मोठे योगदान आहे. यातही मला व्यक्तीश: छत्रपती शाहू महाराजांचे खास कौतुक वाटते. ज्याकाळी देशातील इतर काही संस्थानिक ऐषोरामाचे जीवन जगत होते, शिकार करत होते, त्याकाळी शाहू महाराज कोल्हापूर संस्थानात आधुनिक विचारांचा पाया असलेल्या राष्ट्राची उभारणी करत होते. गेल्या रविवारी म्हणजे दि. २६ जून रोजी शाहू महाराजांची १४८वी जयंती महाराष्ट्रात ठिकठिकाणी उत्साहात साजरी झाली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात दरवर्षी २६ जून हा दिवस ’सामाजिक न्याय दिन’ म्हणूनही साजरा केला जातो.
 
 
शाहू महाराजांनी १८७४ ते १९२२ या त्यांच्या जीवनकाळात अशी काही भरीव कामगिरी करून दाखवली की, त्याला तोड नाही. दि. २ एप्रिल, १८९४ रोजी महाराजांचा राज्यारोहण समारंभ पार पडला. तेव्हा त्यांचे वय अवघे २० वर्षे होते. त्यांना दि. ६ मे, १९२२ रोजी मुंबईत मृत्यूने त्यांना गाठले. याचा अर्थ असा की, त्यांची कारकिर्द उण्यापुर्‍या २८ वर्षांची होती. त्यांनी दि. ६ जुलै, १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात आरक्षण सुरू केले आणि मागासवर्गीय समाजाला ५० टक्के आरक्षण लागू केले. प्रजासत्ताक भारतात सुरू झालेल्या आरक्षणाचे जनक म्हणून शाहू महाराज ओळखले जातात. शाहू महाराजांचे सामाजिक कार्य बहुआयामी होते. या छोटेखानी लेखांत त्यांच्या लोकोत्तर कार्याला अभिवादन करण्याचा नम्र प्रयत्न केला आहे.
 
आजच्या काळातील विविधांगी विषमता नष्ट करायची असेल, तर बहुजन समाजाने शिक्षणाची कास धरली पाहिजे, याची शाहू महाराजांना पुरेपूर जाणीव होती. म्हणून त्यांनी शिक्षणावर भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. हा निर्णय भारत सरकारने २००२ साली घेतला. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत, त्या पालकांना प्रतिमहिना एक रुपया दंड आकारण्याची तरतूदसुद्धा केली. महाराजांच्या आरक्षणाच्या निर्णयाला अनेक पुढार्‍यांनी अपेक्षित विरोध केला. त्याकाळी अस्पृश्य मानल्या गेलेल्या अनेक जातींच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद केली आणि अस्पृश्यांना सरकारी नोकर्‍या मिळवून दिल्या. अशा सरकारी आदेशाच्या जोडीने महाराजांनी शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक बागबगीचे इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांना समानतेने वागवावे असेही आदेश जारी केले. या शिक्षणाच्या गंगेत महिलांना जागा असावी म्हणून सरकारी हुकूम जारी केली. शिक्षणाच्या प्रसाराप्रमाणेच महाराजांनी अस्पृश्यता नष्ट व्हावी, यासाठी सक्रिय प्रयत्न केले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्रात लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्यात ’आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी सामाजिक सुधारणा हा वाद रंगला होता. सुधारकांत दोन प्रकारचे सुधारक होते. एक कर्ते सुधारक तर दुसरे फक्त बडबड करणारे सुधारक. महाराज पहिल्या गटात मोडणारे होते. त्यांनी १९१६ साली गंगाराम कांबळे या मागासवर्गीय समाजातील व्यक्तीला कोल्हापुरात चहाचे हॉटेल सुरू करण्यास सर्व प्रकारची मदत केली. कांबळे यांच्या सत्य सुधारक हॉटेलात महाराज स्वतः चहा पिण्यासाठी जात असत.
 
 
‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले’ या वैचारिक बांधिलकीचा नंतरचा टप्पा म्हणजे महाराजांनी १९१९ मध्ये सवर्ण आणि अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद संपवण्यासाठी त्यांनी कोल्हापूर संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. एवढ्यावर महाराज थांबले नाही, तर त्यांनी स्वतःच्या चुलत बहिणीचे लग्न धनगर समाजातील इंदूरच्या यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. याचप्रमाणे महाराजांनी संस्थानात सुमारे १०० मराठा-धनगर विवाह घडवून आणले. नंतर महाराजांनी पुनर्विवाहाचा कायदासुद्धा केला. यामुळे कोल्हापूर संस्थानात विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली. त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुलं पाहण्याची पद्धत भारतात अनेक ठिकाणी सुरू होती. महाराजांनी कोल्हापूर संस्थानात ’जोगत्या मुरळी प्रतिबंधक कायदा’ केला आणि ही घृणास्पद पद्धत बंद केली.
 
 
परंतु, महाराजांचे कार्य फक्त सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक सुधारणांपुरतेच मर्यादित नव्हते. त्यांना आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातसुद्धा संस्थानाची प्रगती व्हावी, अशी आस होती. याच हेतूने त्यांनी कोल्हापूर जवळ १९०७ साली राधानगरी धरणाचे काम सुरू केले. तसेच त्यांनी १९०६ साली कोल्हापूर शहरात ’श्री शाहू छत्रपती मिल्स’ सुरू केली. या उद्योगव्यवसायासाठी कुशल कामगार लागतील, याचा अंदाज असल्यामुळे तांत्रिक शिक्षण देणारे तंत्रविद्यालय सुरू केले. रयतेला राजकीय शिक्षण मिळावे, यासाठी महाराजांनी १९१९ साली ’डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था निपाणीला स्थापन केली.
 
 
शाहू महाराज पुरोगामी विचारांचा प्रसार करणार्‍या अनेक संस्था आणि व्यक्तींना सढळ हाताने मदत करत असत. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या ’मूकनायका’ला महाराजांनी त्याकाळी आर्थिक मदत केली होती. महाराजांनी मराठा समाजाप्रमाणेच जैन, मुसलमान, लिंगायत आणि अस्पृश्य जातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे काढून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली होती. त्यांनी सुरू केलेल्या वसतिगृहांच्या यादीवरून नजर फिरवली, तर छाती दडपते. १९०१ साली व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस, १९०१ साली दिगंबर जैन बोर्डिंग, १९०६ साली पीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह, १९०६ साली मुस्लीम बोर्डिंग, १९१५ साली इंडियन ख्रिश्चन होस्टेल, १९१९ साली ढोर चांभार बोर्डिंग वगैरे नावं काळजीपूर्वक वाचली म्हणजे महाराजांचा सर्वसमावेशक दृष्टिकोन समोर येतो. ही वसतिगृहं फक्त कोल्हापूर संस्थानात स्थापन केली, असं नाही. महाराष्ट्रातल्या इतर शहरांतही महाराजांनी अशी वसतिगृहं स्थापन केली. १९२० साली नाशिक येथे उदाजी मराठा वसतिगृह, १९२० साली अहमदनगर येथे चौथे शिवाजी महाराज मराठा वसतिगृह, १९२० साली नाशिकला उभे केलेले पंजारी समाज वसतिगृह, १९२० साली नागपूर येथे बांधलेले चोखामेळा वसतिगृह तसेच, १९२० साली पुण्यात स्थापन केलेले छत्रपती ताराबाई मराठा बोर्डिंग वगैरे संस्थांबद्दल वाचले की, महाराजांच्या विशाल दृष्टिकोनाचा अंदाज येतो.
 
 
महात्मा फुलेंनी पुण्यात दि. २४ सप्टेंबर, १८७३ रोजी ‘सत्यशोधक समाज’ स्थापन केला. दि. २८ नोव्हेंबर, १८९० रोजी महात्मा फुलेंचे निधन झाले. त्यानंतर काही काळ सत्यशोधक चळवळीला मरगळ आली होती. ‘यथावकाश’ या चळवळीचे नेतृत्व शाहू महाराजांकडे आले. या चळवळीच्या वाटचालीत १९१९ साली संपलेला तिसरा टप्पा महत्त्वाचा समजला जातो. सत्यशोधक समाजाच्या वार्षिक परिषदांना महाराजांचा भक्कम पाठिंबा होता. म्हणूनच या काळात सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रभर पसरली. सत्यशोधक समाजाची पहिली परिषद १९११ साली रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झाली. शाहू महाराजांच्या उदार आणि सक्रिय पाठिंब्यामुळे या चळवळीने झंझावाताचे रूप धारण केले. परिणामी कोल्हापुरात दि. ११ जानेवारी, १९११ रोजी ’श्री शाहू सत्यशोधक समाज’ स्थापन करण्यात आला. ब्राह्मणेतर पुरोहित तयार करण्यासाठी भास्करराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जुलै १९१३ मध्ये कोल्हापुरात ‘सत्यशोधक शाळा’ स्थापन करण्यात आली. शाहू महाराजांना गोरगरिबांच्या उद्धाराची फार कळकळ होती. यासाठी ते महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंतांच्या सतत संपर्कात असत. १९१७ साली शाहू महाराज प्रबोधनकार के. सी. ठाकरे यांना म्हणाले होते, “कोट्यवधी मागासलेल्या खेडूतांच्या उद्धाराचा आज सवाल आहे. त्यांना सामाजिक आणि धार्मिक रूढींच्या विळख्यातून सोडवायचे आहे. त्यासाठी महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजतत्वांचा खूप प्रसार व्हायला पाहिजे.” शाहू महाराजांचे असे बहुआयामी कार्य या छोट्या लेखाच्या अवकाशात पकडणे शक्य नाही. लोकोत्तर आणि पुरोगामी विचारांच्या शाहू महाराजांना नम्र अभिवादन!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

प्रा. अविनाश कोल्हे

 
 एम.ए., एल.एल.बी केले असून गेली दोन दशकं मुंबईच्या रूपारेल महाविद्यालयात राज्यशास्त्र विषय शिकवत आहेत. गेली अनेक वर्षे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयांवर विविध वृत्तपत्रांतून स्तंभलेखन. शिवाय त्यांनी मुंबईतील अमराठी रंगभूमीवर सादर होत असलेल्या नाटकांची परिक्षणं केलेली आहेत. ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांच्या निवडक परिक्षणांचे पुस्तक ’रंगदेवतेचे आंग्लरूप - मुंबईतील अमराठी रंगभूमी’ प्रकाशित झाले आहे. ते ’चीनमधील मुस्लीम समाजातील फुटीरतेची भावना’ या विषयांवर पी.एचडी. करत आहेत.