गोराईमधील मलनिस्सारण वाहिनीची दैना; मागील २६ वर्षांपासून नादुरूस्त

मुंबई महापालिकेचे काम फक्त आश्वासन देणे : स्थानिकांचा आरोप

    21-Jun-2022
Total Views | 63

gorai
 
 
 
 
 
 
मुंबई : मागील तीन ते चार वर्षांपासून गोराईमधील प्रभाग क्र. ९ येथील मलनिस्सारण (गटार/सांडपाणी)वाहिनी साफ करण्यात आली नसून, ही वाहिनी मागील २६ वर्षांपासून दुरूस्तदेखील करण्यात आली नसल्याचे स्थानिकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना सांगितले. तसेच, मुंबई महापालिकेकडून आम्हाला केवळ आश्वासनेच देण्यात येतात. त्या आश्वासनांवर अंमलबजावणी पालिकेकडून करण्यात येत नसल्याचेही स्थानिकांकडून सांगण्यात आले.
 
 
 
पालिका कर्मचार्‍यांची फक्त पाहणी!
 
गोराईमध्ये मागील अनेक वर्षांपासून मलनिस्सारण आणि पाण्याच्या समस्या पाहायला मिळत आहेत. परंतु, पालिका त्याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नाही. पाण्याची वाहिनी फुटल्यावर त्यात गटाराचे पाणी मिसळते आणि हे सर्व दूषित पाणी घरात शिरते. पालिकेचे कर्मचारी येतात, पाहणी करतात आणि जातात, अशा बिकट परिस्थितीत आम्ही कसे राहणार? मुसळधार पाऊस पडल्यावर गटार पूर्ण भरते. गेले तीन वर्ष हा त्रास सहन करत आहोत. यावर उपाययोजना होत नाहीत, असे स्थानिकांनी सांगितले आहे.
 
 
 
लवकरच कामाला सुरुवात
 
आमच्यापर्यंत येणार्‍या तक्रारींचे निवारण आम्ही वेळोवेळी केले आहे. काही दिवसांपूर्वीच गोराईतील २०२ सोसायटीतून आलेल्या तक्रारीचे त्वरित निवारण करण्यात आले. तसेच गोराईमध्ये ३० वर्षांपूर्वीच्या मलनिस्सारण वाहिन्या आहेत, ज्या ‘म्हाडा’ने टाकलेल्या आहेत. तसेच, गोराई हे खाडीलगत असल्यामुळे काही वेळा जो मल असतो, त्याचा निचरा होण्यास अडथळे येतात. त्यामुळे या पाईपलाईन लवकरच बदलण्यात येणार आहेत व पावसात पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी प्रभागात विविध रस्त्यांवर गटारांचे कामदेखील सुरू आहे.
- श्वेता कोरगांवकर, माजी नगरसेविका, काँग्रेस
 
 
 
राजकारण न करता समस्या सोडवाव्यात
 
अगदी तासभर पडलेल्या पावसात जर आमच्या घरात पाणी शिरत असेल, तर आम्ही जायचे कुठे? आमच्या लहान लहान मुलांनी जायचे कुठे? अनेकदा तक्रारी करूनही यावर कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. मागील तीन ते चार वर्षांपासून आमच्या येथील गटार वाहिनी साफ करण्यातच आलेली नाही. तेव्हा कोणतेही राजकारण न करता आमच्या समस्या सोडवाव्यात, एवढीच आमच्या प्रशासनाला विनंती आहे.
- सुजाता मेनन, स्थानिक रहिवासी
 
 
 
पालिका अधिकारी कारणे सांगतात
 
गटार वाहिनी मागील २६ वर्षांपासून बदलण्यात आलेली नाही. जरासा पाऊस पडला, तरी सर्व घाण पाणी घरात शिरते. त्यामुळे येथील लहान लहान मुलांना आरोग्याविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच, पिण्याच्या पाण्याविषयीदेखील अनेक समस्या गोराईकरांना पाहायला मिळत आहेत. यासंबंधी तक्रार करण्यास गेल्यावर पालिकेच्या अधिकार्‍यांकडून विविध कारणे दिली जातात. आमच्या समस्यांकडे लक्ष पुरवून त्या सोडवाव्यात, एवढीच आमची मागणी आहे.
- महादेव बाळकृष्ण कानडे (भाई), स्थानिक
 
 
 
 - शेफाली ढवण
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121