आला पावसाळा, माळरान सांभाळा

    20-Jun-2022
Total Views |
 माळरान
 
 
 
 
 मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. आता राज्यात सर्वत्र मान्सूनच्या सरी बरसतील. पावसाळा म्हणजे सजीव सृष्टीत नवचैतन्य निर्माण करणारा ऋतू. निसर्गाचे चक्र पुनरुज्जीवित करणारा हा पावसाळा माळरानावरदेखील विविध अधिवासांना आधार ठरतो. परंतु, गेल्या काही वर्षांत याच माळरानांवर पावसाळ्यात वृक्षारोपणाचे कार्यक्रम केले गेले. माळरान ही एक वेगळी परिसंस्था असून त्यावर अनेक जीव अवलंबून आहेत. हे वृक्षारोपण कितपत योग्य आहे, याचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
 
पावसाळ्यात अनेक पशुपक्षी, उभयचर, सरीसृप इ. आपल्या नवीन पिढी निर्माणाचे कार्य करत असतात. त्याचबरोबर झाडांच्या बिया झाडाखाली पडून किंवा पशुपक्ष्यांच्या विष्ठेद्वारे दूरवर जाऊन त्या रुजून रोपे तयार होत असतात. पावसाळ्यात फक्त नैसर्गिक पद्धतीनेच नाही, तर मानवाद्वारेदेखील मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाते. सर्वत्र अनेक संस्था, सङ्कूह, वनविभाग व निसर्गप्रेमींकडून वृक्षारोपणाच्या मोहिमा हाती घेतल्या जातात. या दरम्यान एक फार मोठी चूक होत आहे, ती म्हणजे माळरानांवर केले जाणारे वृक्षारोपण. लहानपणापासून आपल्याला जिथे दाट झाडी आहे, तिथेच वन्यजीव राहतात, तिथेच त्यांना अन्न मिळते व माळरान हे ओसाड असते, असे शिकवले जाते. ते चुकीचे असून माळरान घनदाट जंगलांप्रमाणेच वन्यजीवांनी व इतर जैवविविधतेने नटलेला समृद्ध अधिवास आहे.
 
 
आपल्या महाराष्ट्रात अहमदनगर, सोलापूर, पुणे, बीड, औरंगाबाद, सातारा, सांगली इ. जिल्ह्यांमध्ङ्मे मोठमोठी समृद्ध जैवविविधतेने नटलेली माळराने आहेत. मुळात माळरानावर मोठी झाडे फार तुरळक असतात. माळरान अधिवास हा कमी पावसाच्या प्रदेशात असतो, पण आपल्या भागात जास्त पाऊस पडावा म्हणूनदेखील अनेक लोकं माळरानावर जवळजवळ अंतरावर झाडे लावत आहेत. अनेक संस्थांद्वारे माळरानांवर दाटीने वृक्षारोपण करून त्या झाडांसाठी ठिबक करून पाणी द्यायची सोय केली जात आहे, पण हे करताना त्यांच्याकडून माळरानावर असलेल्या जैवविविधतेकडे कानाडोळा केला जात आहे. त्या जैवविविधतेला खरंच या वृक्षारोपणाची गरज आहे का? यापूर्वी का तिथे नैसर्गिकरित्या दाट झाडी निर्माण झाली नाही, यावर वृक्षारोपण करताना विचार केला जात नाही. माळरानावरच्या समृद्ध जैवविविधतेमध्ङ्मे लांडगा, कोल्हा, रानमांजर, खोकड, तरस, चिंकारा, काळवीट या दुर्ङ्कीळ सस्तन प्राण्यांचा तसेच भारीट, खाटीक, चंडोल, भारतीय धाविक, तितर, माळटिटवी, पाखुर्डी, आखूड बोटांचा सर्पगरूड, भोवत्या इ. पक्ष्यांचा समावेश आहे. या सर्वांना जगण्यासाठी माळरानांची गरज आहे व त्यांची निर्ङ्किती निसर्गाने माळरान या अधिवासासाठी केली आहे. माळरान जरी आपल्या डोळ्यांना वरून ओसाड वाटत असली, तरी ती तेथील जैवविविधतेसाठी नंदनवन आहेत. माळरान जैवविविधतेतील लांडगा या वन्यजीवाचा समावेश ‘आययुसीएन’च्या धोकाग्रस्त प्रजातींच्या यादीत केला गेला आहे. दिवसेंदिवस झपाट्याने वाढणारे शहरीकरण, शेतीकरण व चुकीच्या, गरज नसलेल्या वृक्षारोपणामुळे माळरान अधिवास कमी होत चालला आहे. परिणामी, अधिवासाच्ङ्मा कमतरतेमुळे लांडग्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.
 
 

माळरान2
 
 
पूर्वी अनेक ठिकाणांहून मिळणारी ’लांडगा आला रे आला’ ही बातमीदेखील क्वचितच ऐकायला मिळत आहे. पट्टेरी वाघाला जसे जंगलात सर्वोच्च शिकारी प्राण्याचे स्थान आहे तसेच स्थान माळरान अधिवासात लांडग्याचे आहे. परंतु, दुर्दैवाने त्याच्या संवर्धनासाठी हवा तसा विचार केला जात नाही व त्याला पाहिजे तितके महत्त्व दिले जात नाही. सुदैवाने महाराष्ट्रात पुणे येथील ‘ग्रासलॅण्ड ट्रस्ट’ या संस्थेने याविषयीचे महत्त्व जाणून लांडगा व माळरानावरच्या इतर वन्यजीवांच्या संवर्धनासाठी माळरान जैवविविधतेचा अभ्यास व माळरानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपक्रम सुरू केले आहेत. आपण वेळेत जागे होऊन लांडग्याचे, पर्यायाने माळरान अधिवासाचे रक्षण केले नाही, तर हा माळरानावरचा वाघ व माळराने आपल्याला फक्त चित्रांमध्ङ्मेच पाहावी लागतील. आधीच आपण माळरानावरील माळढोक व तणमोरसारख्या पक्ष्यांना जवळजवळ गमावून बसलो आहोत व आता लांडग्याची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. हा देखणा प्राणी कायमचा गमावणे आपल्याला न परवडणारे आहे. आपल्याकडे फुलपाखरांसाठीदेखील नव्याने संवर्धन राखीव क्षेत्र घोषित केले गेले आहे. त्यासारखेच आता लांडग्यासाठी त्याचे राहिलेले अधिवास शोधून त्यांना संवर्धन राखीव व वन्यजीव अभयारण्य बनवायला हवीत, जेणेकरून लांडग्याबरोबरच माळरानावरच्या इतर जैवविविधतेचेदेखील संवर्धन होईल. अनेक ठिकाणी वनविभाग व इतर संस्थांकडून पावसाचे पाणी जिरवण्यासाठी माळरानांवर जवळजवळ अंतरावर लांब व मोठमोठे चर खोदले गेले आहेत.
 
 
माळरान1 
 
 
यामुळेदेखील लांडगा व माळरानावरील इतर प्राण्यांच्या हालचालींमध्ङ्मे अडथळा निर्माण होत आहे. माळरानांवर खोदलेल्या या अशाप्रकारच्या चरांमुळे व दाट वृक्षारोपणामुळे बिबट्याला लपायला जास्त जागा मिळू लागल्याने ज्या माळरानांवर पूर्वी बिबट्या नव्हता, तिथे तो आता दिसू लागला आहे व त्याची संख्यादेखील वाढत आहे. यामुळे स्थानिक जैवविविधतेत नवीन शिकारी प्राणी दाखल झाला असून असंतुलन निर्माण झाले आहे. यामुळे मानव-बिबट्या संघर्षदेखील निर्माण झाला आहे. माळरानावर लावलेल्या दाट झाडीमुळे लपायला जागा मिळाल्याने रानडुकरांची संख्यादेखील वाढली आहे व त्यांच्याकडून स्थानिक शेतीचे नुकसान केले जात आहे. त्यामुळे वन्यजीवांविषयी स्थानिकांमध्ङ्मे रोष निर्माण होत आहे. या चरांमुळे चिंकारा, काळवीट व गवतावर पोट भागवणार्‍या शाकाहारी प्राण्यांना कमी प्रमाणात गवत मिळत असून त्यांची संख्या देखील कमी होत आहे. पाखुर्डीसारखा पक्षी जो माळरानावर सपाट जागेवर अंडी देतो, त्यालादेखील या चरांमुळे अडथळा निर्माण झाला आहे. मानव आपल्या भागात जास्त पाऊस पाडण्यासाठी व पावसाचे पाणी जिरवून त्याद्वारे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी माळरान जैवविविधतेच्या मुळावर उठला आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर माळरानावरची जैवविविधता ही कमी पाण्यात स्वतःचे काम भागविण्यासाठी बनलेली आहे तिथे आपण करत असलेले हे खटाटोप बिलकुल गरजेचे नाहीत. निसर्गाचे भले करायच्या नादात आपण न कळत त्याचे नुकसान करतो आहोत, हे फार धोकादायक आहे. कुठेही वृक्षारोपण करताना त्याठिकाणी कोणत्या प्रकारचा अधिवास आहे व तेथील स्थानिक जैवविविधता कोणत्या प्रकारची आहे, याचा अभ्यास आपण अवश्य करायला हवा. त्यानुसार तिथे वृक्षारोपनाची गरज आहे की नाही, हे ठरवून कृती करायला हवी.
 
 
 
आपल्या कुठल्याही कृतीने निसर्गाचे नुकसान होत असेल, तर ती नक्की टाळायला हवी, यातच समस्त जीवसृष्टीचे भले आहे. या पावसाळ्यात आपण या सर्व गोष्टींचा विचार करूनचं वृक्षारोपण करूया, जेणेकरून चुकून तुमच्याकडून माळरानावरची समृद्ध जैवविविधता नष्ट होणार नाही.
 
 
-सचिन धायगुडे
अध्यक्ष, कोयना निसर्ग संवर्धन व पर्यावरण पर्यटन संस्था
8055909101