‘संस्कार भारती’चे संस्थापक सदस्य आणि ज्येष्ठ मार्गदर्शक, संघ प्रचारक योगेंद्रजी यांचे १० जून रोजी लखनौ येथे निधन झाले. लखनौच्या राम मनोहर लोहिया दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते ९९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने ‘संस्कार भारती’ या संघटनेची मोठी हानी झाली आहे. आपण निश्चित केलेल्या ध्येयाप्रमाणे जीवनभर ते काम करत राहिले. ‘दिव्य ध्येय की ओर तपस्वी जीवन भर अविचल चलता हैं।’ ही उक्ती त्यांच्या जीवनाला अगदी शंभर टक्के लागू होते. त्यांच्याविषयी...
लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आलेले योगेंद्र यांचे गोरखपूरला असताना नानाजी देशमुख यांच्या छत्राखाली प्रचारक म्हणून गोरखपूर, बरेली, प्रयाग, बदायूं, सीतापूर येथे राहिले. १९८१ मध्ये कलाक्षेत्रातील संघटन निर्माण करण्यासाठी अनेक दिग्गज एकत्र येऊन त्यांनी कलासाधक व कलांचे संरक्षण, संवर्धन, आणि राष्ट्रीय भाव जागरण करण्यासाठी ‘संस्कार भारती’ची स्थापना केली आणि तेव्हापासून योगेंद्र यांचे सलग म्हणजे, वयाची शंभरी पूर्ण करेपर्यंत अव्याहतपणे ‘संस्कार भारती’चे काम करत राहिले. संघटन मजबूत करत राहिले आणि वृद्धिंगत करत राहिले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचा एकच ध्यास होता ‘संस्कार भारती.’
अमर तत्व की अमिट साधना
प्राणो मे उत्सर्ग कामना
जीवन का शाश्वत व्रत ले कर
साधक हँस कण कण गलता है ॥
या कामासाठी अगदी शेवटी दवाखान्यात भरती होईपर्यंत ते भारतभर प्रवासही करत होते. आयुष्यात ठरवलेल्या ध्येयासाठी त्यांनी प्रत्येक क्षणाचा उपयोग केला. अविश्रांत परिश्रम घेतले. संपूर्ण जीवन त्यांनी कला क्षेत्रातला परिव्राजक म्हणून देशभरात भ्रमंती, कलासाधकांशी संवाद, पत्राद्वारे आणि दूरध्वनीवर संपर्क करत, कलासृष्टीतले कलाकार, त्यांची कला, यावर अखंडपणे चिंतन करत, त्यांना एकत्र आणण्याचे अवघड काम व दिशा देण्याचे महत कार्य योगेंद्र यांनी केले.
‘राष्ट्राय स्वाहा, इदं न मम’ असा भाव आपल्या कलाक्षेत्रातल्या कामाच्या प्रत्येक गोष्टीत असणारे योगेंद्रजी ‘संस्कार भारती’च्या कामासाठी भारतभर प्रवास करत. तेव्हा प्रवासात बरोबर असायची ती फक्त एक खांद्यावरची झोळी, त्यात फक्त दुसर्या दिवशी आंघोळीनंतर लागणारा पेहराव. एक धोतर आणि सदरा, एक डायरी. हा प्रवास एकदा नाही दोनदा नाही, तर तब्बल ३६ वर्षे त्यांनी केला आहे. हा प्रवास या राज्यातून त्या राज्यात, या प्रांतातून त्या प्रांतात, मैलोन्मैल प्रवासात मिळेल ते वाहन, नाही तर पायी, जी सोय उपलब्ध असेल त्याने. ना बुकिंग, ना एअर कंडीशन, गर्दीत, रेल्वेचा जनरल डबा, रात्र-अपरात्र, ऊन-पाऊस-थंडी कशाचाच विचार नाही.
पतझड के झंझावातों मे
जग के घातों प्रतिघातों मे
सुरभि लुटाता सुमन सिहरता
निर्जनता मे भी खिलता हैं॥
हे एवढे परिश्रम कशासाठी? तर कलाकारांचं संघटन उभं करायला. मनामनांत सांस्कृतिक चेतना जागवायला. ललित कलांना प्रोत्साहन द्यायला. कारण, आमच्या संस्कृतीत आणि संस्कारांत ललित कलांचं योगदान खूप मोठं आहे. त्यामुळे या ललित कलांच्या माध्यमातून माणसामाणसातील हे संस्कार जागृत करायला. एवढंच नाही, तर समाजात चांगले पोषक सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यासाठी कलाकारांची साधना व त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे. अशा एवढ्या मोठ्या कार्यात योगेंद्रजी मात्र स्वतःला या यज्ञातली एक समीधा मानायचे. ही समीधा गेली अनेक वर्षे कलायज्ञामध्ये अखंडपणे आहुती देत होती. त्यामुळेच संपूर्ण भारतभर तन-मन-धन या त्रिसूत्रीने एकत्रितपणे काम करणार्या हजारो कलासाधकांची फळी तयार झाली आहे. त्यात अनेक मान्यवर प्रतिष्ठित कलाकार, साहित्यिक, शिक्षण महर्षी, विचारवंत, तत्वज्ञानी आहेत.
ते स्वत: एक चित्रकार होते, स्वातंत्र्य लढ्यात पण त्यांनी कलाकार म्हणून मोठे योगदान दिले होते. १९४७ च्या दरम्यान देशाला मिळालेले स्वातंत्र्य, देशाची फाळणी व त्याचे दु:ख आणि ज्वलंत प्रासंगिक विषयांवर त्यांनी चित्रप्रदर्शनीची शृंखला लोकांसमोर आणली. ही प्रदर्शने भारतात व परदेशात प्रदर्शित झाली. ‘जनता की पुकार’, ‘देश विभाजन’, ‘धर्मगंगा’, ‘जलता कश्मीर’, ‘संकट मे गोमाता’, ‘विदेशी षड्यंत्र’, ‘माँ की पुकार’, ‘भारत की विश्व को देन’ आणि ‘1857 के स्वाधींनता की अमरगाथा’ या विषयांवरील चित्रे या प्रदर्शनात मांडून लोकांमध्ये राष्ट्रीय भावना आणि राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम केले. याला अमेरिकेतसुद्धा खूप लोकप्रियता मिळाली.
घरदार, आपले उपजीविका साधन याचा विचार न करता घराबाहेर पडून पूर्ण वेळ ‘संस्कार भारती’साठी आपले आयुष्य त्यांनी समर्पित केले. कसलाही अहंकार नाही, मोह नाही, कुणाचाही द्वेष नाही आणि कार्यकर्त्यांवर सर्दैव पितृवत प्रेम करणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून ‘संस्कार भारती’ परिवारात ते सुपरिचित होते. भारतातल्या सर्व प्रदेशातली कुटुंबे त्यांच्याशी जोडली होती. त्यामुळे ही सर्व कुटुंबे योगेंद्र यांचे आप्तच असत.
‘योगदान’ हा शब्द म्हणायला आणि लेखात वापरायला हा अत्यंत सोपा, पण त्याचा अर्थ कठीण आणि तसे जीवन जगणे त्याहूनही कठीण! एखाद्या कामासाठी, तेही सामाजिक कामासाठी, निरपेक्ष वृत्तीने आपले संपूर्ण आयुष्य देणे, हे तत्वनिष्ठ कार्यकर्त्यालाच जमते. ते सामान्यांचे काम नाही. अशाच असामान्य व्यक्तिमत्वाच्या सान्निध्यात सामाजिक काम करायला मिळणं हेसुद्धा भाग्यच आणि ते आम्हालाही लाभलं.
२०१८ मध्ये त्यांच्या कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल केंद्र शासनाने ‘पद्मश्री’ देऊन गौरविले होते. हे वर्ष ‘संस्कार भारती’च्या कार्यकर्त्यांना विशेष होतं. कारण, यंदाच्या प्रजासत्ताक दिनी ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाले, त्यात एक नाव होतं योगेंद्र श्रीवास्तव यांचं. ‘संस्कार भारती’च्या परिवारातील सर्वांचे मार्गदर्शक, कलाकारांना दिशा देणारे, संपूर्ण भारतातल्या कलाकारांना एका छताखाली गुण्यागोविंदाने नांदायला शिकवणारे, त्यांचा मेळ साधणारे, कलेच्या प्रांतात कलाकार-कार्यकर्ते घडविणारे, या निसरड्या क्षेत्रात पाय घसरून पडणार्याला हात देऊन उठविणारे, कार्यकर्त्यांचे रुसवे फुगवे मिटवणारे, उत्तम संघटन कौशल्य असणारे आणि हे संघटन मजबूत करायला भारतभर सतत प्रवास करणारे असे योगेंद्रजी आता ‘पद्मश्री’ योगेंद्रजी झाले होते. त्याशिवाय ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’, ‘भाऊराव देवरस पुरस्कार’ आणि अशा अनेक विशेष पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. देशभरातल्या सर्व कलाकारांचे संघटन उभे केलेले योगेंद्रजींचे ‘संस्कार भारती’च्या कार्यकर्त्यांचा दीपस्तंभ म्हणून कार्य सदैव स्मरणात राहतील.
जे देशासाठी लढले,
ते अमर हुतात्मे झाले,
सोडिले सर्व घरदार,
त्यागीला सुखी संसार,
ज्योतीसम जीवन जगले,
ते देशासाठी जगले.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आतापर्यंत राष्ट्रकार्यासाठी, कलेसारखे सशक्त माध्यम निवडून काम करणारे योगेंद्रजींच्या निधनाने संघटनेची मोठी हानी झाली आहे.त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘संस्कार भारती’पश्चिम प्रांताने १८ जून रोजी सकाळी ११ वाजता, स्वा. सावरकर स्मारक सभागृह डेक्कन जिमखाना पुणे येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. यावेळी प्रांत अध्यक्ष उस्ताद उस्मान खाँ साहेब, महामंत्री सतीश कुलकर्णी, कार्याध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, ज्येष्ठ कार्यकर्ते रवी देव, प्रशांत कुलकर्णी, इतर पदाधिकारी, प्रांत कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘पद्मश्री’ योगेंद्र यांच्या जीवनावरील, डॉ. नयना कासखेडीकर यांनी तयार केलेली ‘कलातपस्वी योगेंद्रजी’ ही डॉक्युमेंटरी फिल्म दाखविण्यात आली. त्यानंतर ‘डीआरडीओ’चे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुळकर, डॉ. नयना कासखेडीकर, उस्मान जी खाँ साहेब, सतीश कुलकर्णी यांनी योगेंद्रजींच्या आठवणींना उजाळा दिला. श्रद्धांजली सभेचा समारोप रवी देव यांनी केला. प्रशांत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक आणि प्रांजली देशपांडे यांनी सूत्रसंचालनकेले. सोनाली साहू यांनी ध्येयगीत सादर केले.
- डॉ. नयना कासखेडीकर