ठाणे जिल्ह्यात सावित्रीच्या लेकी अव्वल; तब्बल ९८.०४ टक्के मुली उत्तीर्ण

जिल्ह्याचा दहावीचा एकूण निकाल ९७.१३ टक्के; निकालात मुलींची बाजी

    18-Jun-2022
Total Views |

10th
 
 
 
 
 
ठाणे/कल्याण/वाडा/भिवंडी : ठाणे जिल्ह्यात बारावीपाठोपाठ दहावीतही सावित्रीच्या लेकीच अव्वल ठरल्या आहेत. माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२२ अर्थात दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात ठाणे जिल्ह्याचा ९७.१३ टक्के निकाल लागल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली. जिल्ह्यात यंदा १ लाख, १३ हजार, ८२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्ण टक्केवारीत मुलींनीच बाजी मारली आहे. यंदा १ लाख, १७ हजार, १८३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी १ लाख, १३ हजार, ८२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ५५ हजार, ४७३ मुली परीक्षेस बसल्या होत्या, त्यापैकी ५४ हजार, ३९० मुली उत्तीर्ण झाल्या, तर ६१ हजार, ७१० मुले परीक्षेस बसले होते, त्यापैकी ५९ हजार, ४३५ मुले उत्तीर्ण झाले. त्यामुळे यंदाच्या निकालात मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९८.०४ टक्के असून, मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ९६.३१ टक्के आहे. त्यामुळे मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्ण टक्केवारी अधिक असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.
 
 
 
ज्ञानदीप विद्यामंदिर व ज्ञानदीप कॉन्व्हेंट स्कूलचा निकाल १०० टक्के
 
समीर ज्ञानप्रसारक विश्वस्त निधी संचालित मुंब्रा येथील ज्ञानदीप विद्यामंदिर (मराठी माध्यम) व ज्ञानदीप कॉन्व्हेंट स्कूल (इंग्रजी माध्यम) या शाळांचा ‘एसएससी’ परीक्षेचा निकाल यंदाही १०० टक्के लागला आहे. मराठी माध्यमात ईश्वरी विनोद पाटील ९३.८० टक्के गुण मिळवून प्रथम, रोहित गोपीनाथ बडगुजर ९३.४० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर संकेत सतीश नेवगे याने ९१.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. इंग्रजी माध्यमात दिव्या भारती ८८.४० टक्के मिळवून प्रथम, नुरशमा शाहिद अन्सारी ८५.४० टक्के मिळवून द्वितीय, तर चेतन प्रवीण हिबारे याने ८५ टक्के प्राप्त करून तिसरा क्रमांक पटकावला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सतीश देसाई, सचिव समीर देसाई, उपाध्यक्षा शिवानी देसाई, खजिनदार प्रवीणा देसाई माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक वासुदेव बर्‍हाटे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी कदम आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी हार्दिक अभिनंदन केले.
 
 
 
सलग तेराव्या वर्षी ‘या’ शाळेचा १०० टक्के निकाल
 
कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक शाळेचा सलग तेराव्या वर्षी, डोंबिवलीतील विद्या निकेतन शाळेचा सलग आठव्या वर्षी, तर जनगणमन विद्यालयाचाही सलग पाचव्या वर्षी १०० टक्के निकाल लागला आहे. विशेष म्हणजे, निकालात मुलींनी बाजी मारली आहे. कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक शाळेतील शेतकरी कुटुंबातील गायत्री युवराज चव्हाण हिने ९२.४० टक्के गुण मिळवत शाळेतून प्रथम क्रमांक, वेल्डिंगचे काम करणारे दिगंबर मेश्राम यांचा मुलगा तेजस मेश्राम याने ९०.४० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक आणि मनस्वी रवींद्र मढवी या विद्यार्थिनीने ८९ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे प्रयत्न व पालकांच्या सहकार्यामुळेच १०० टक्के निकाल लागत असतो, असे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
 
 
 
वाडा तालुक्याचा निकाल ९६.२९ टक्के
 
वाडा तालुक्याचा दहावीचा निकाल ९६.२९ टक्के लागला असून, परीक्षेस पात्र २,८३१ पैकी २,७२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लिटील एंजल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सलग १५ व्या वर्षी १०० टक्के निकाल लागला आहे. या शाळेची विद्यार्थिनी निर्मिती ठाकरे ९२.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे, तर हर्ष ठाकरे ९२, चिरायू दुरगुडे ९१.८० टक्के मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. अस्पी विद्यालय उचाट या शाळेचा संभाजी अनंता दुबेले हा विद्यार्थी ८३.४० टक्के गुण मिळवून इंग्रजी माध्यमात पहिला आला, तर आदेश मोरे ८२.६०, प्रणाली पाटील ८१.२० टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. याच शाळेच्या सेमी इंग्रजी विभागात अश्विनी आगिवले 86.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम तर त्रतिक पवार ८२, मनाली पाटील ८१.२० टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
 
 
 
भिवंडी पालिकेच्या ११ शाळांचा १०० टक्के निकाल
 
भिवंडी-निजामपूर शहर मनपाअंतर्गत एकूण अकरा माध्यमिक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून एकूण ८०१ विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांमध्ये खान अल्फियाबानो आसिफ अहमद हिने ८५.८०टक्के, मराठी माध्यमात अर्चना सराफदार हिला ८२ टक्के, तेलगू माध्यमध्ये मेरगु प्रवीण मधुकर याने ८५ टक्के, हिंदी माध्यमांमध्ये मंसरी नदीम सरवर हिने ६४.८० गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. एसएससी परीक्षेत पालिका शाळांच्या १०० टक्के निकालाबद्दल तसेच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार्‍या सर्व विद्यार्थ्यांचे पालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, माध्यमिक शिक्षण विभाग प्रमुख उपायुक्त नूतन खाडे, शाळा विभाग साहा. आयुक्त अनुराधा बाबर आणि माध्यमिक शाळा विभाग प्रमुख सौदागर शिखरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
 
 
 
मनीषा राणे ४७ व्या वर्षी दहावी उत्तीर्ण
 
डोंबिवली : डोंबिवलीतील ४७ वर्षीय मनीषा राणे दहावीची परीक्षा ५६ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना आपले शिक्षण पूर्ण करता आले नव्हते. पण, अर्धवट शिक्षण राहिले ही गोष्ट मनाला सलत असल्याने त्यांनी यंदा दहावीची परीक्षा दिली व त्या चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाल्या. विशेष म्हणजे, भाजपच्या डोंबिवली ग्रामीण मंडलच्या महिला अध्यक्षा म्हणून मनीषा राणे या राजकारणात सक्रिय असून, घर आणि राजकारण या दोन्ही गोष्टी सांभाळून त्यांनी आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण केले आहे.