रशिया-भारताने अरबांचा केला खेळ

    17-Jun-2022   
Total Views |
  
 
 
 russia india
 
 
 
युक्रेनबरोबर संघर्ष सुरू केल्यानंतर अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय संघाने लगोलग रशियावर आर्थिक, व्यापारी निर्बंध घालायला सुरुवात केली. आपल्या निर्बंधांच्या धक्क्याने रशिया गुडघे टेकेल आणि आपल्या तथाकथित रणनीतीची सरशी होईल, असे या देशांना वाटत होते. पण, त्यांच्या या निर्बंधधोरणांकडे रशियादेखील नक्कीच विनोददृष्टीने पाहात असेल. म्हणूनच रशिया कोणी कितीही निर्बंध घातले तरी अजूनही मागे हटलेला नाही. पण, रशिया आता माघार घेईल, नंतर माघार घेईल, अशा बालिश विचारांनी अमेरिका, ब्रिटन, युरोपीय संघ वगैरेंनी एका निर्बंधानंतर दुसर्‍या निर्बंधाची घोषणा मात्र मोठ्या उत्साहाने केली. रशियाने मात्र या देशांच्या निर्बंध आणि युक्रेनबरोबरील संघर्षाच्या संकटातच संधी शोधली. विशेष म्हणजे रशियाच्या धोरणाचा सर्वाधिक फायदा भारताला झाला.
 
 
 
‘मुस्लीम पॉलिटिकल कौन्सिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. तस्लीम रहमानी यांनी शिवलिंग व हिंदू देवदेवतांबाबत अभद्र भाषेचा वापर करत नुपूर शर्मांना चिथावले व त्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. तेच प्रत्युत्तर ‘अल्ट न्यूज’च्या मोहम्मद झुबैरने उर्दूमध्ये भाषांतरित केले आणि अरब राष्ट्रांमध्ये फिरवले. त्यावर अरब राष्ट्रांनी नुपूर शर्मांसह भारताविरोधातला राग प्रकट केला. मात्र, तो राग पैगंबर वा इस्लामप्रेमापोटी कमी अन् भारताचे कच्च्या तेलासाठीचे अरब राष्ट्रांवरील अवलंबित्व कमी होण्यावर जास्त होता. कारण, आता भारताचे कच्च्या तेलावरील अवलंबित्व अरब राष्ट्रांसह अमेरिकेकडून स्थानांतरित होऊन रशियाकडे सरकले आहे.
 
 
 
अमेरिका आणि रशियाच्या संघर्षात भारताचा कसा फायदा होणार, हा प्रश्न निर्माण होणे साहजिकच. त्यासाठी सुरुवातीपासूनच्या घडामोडींकडे लक्ष द्यावे लागेल. युक्रेनबरोबर लढाई सुरू झाल्यानंतर अमेरिकेने रशियावर निर्बंध लावले, असे केल्याने संपूर्ण जगाला झुकायला लावू आणि रशियाला कंगाल करू असा त्यामागचा अमेरिकेचा हेतू होता. ८० च्या दशकाच्या अखेरीस सोव्हिएत संघाबाबत अमेरिका व इतरांनी असेच धोरण अवलंबले होते आणि आताही तसेच करता येईल, असे त्यांना वाटत होते. पण, आता मात्र झाले उलटेच आणि चलनासह कच्च्या तेलाच्या निर्यातीतही रशियाचाच फायदा मिळाला. कारण, व्यापार बुद्धीने केला जातो, भावनेने नव्हे.
 
 
  
फिनलंडच्या हेलसिंकीस्थित ‘सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अ‍ॅण्ड क्लीन एअर’ या संस्थेने रशियाने कच्च्या तेलाच्या व्यापारातून केलेल्या कमाईची आकडेवारी जारी केली आहे. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीपासून आतापर्यंत रशियाने केवळ कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि कोळशाची निर्यात करून तब्बल ९३ अब्ज युरोची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, त्यातही दोन तृतीयांश म्हणजे तब्बल ९७ अब्ज डॉलर्सची कमाई फक्त कच्च्या तेलाची निर्यातीतून केली आहे, तर उर्वरित कमाई नैसर्गिक वायू व राहिलेली कमाई कोळशातून केली. परंतु, तरीही प्रश्न उपस्थित होतो की, रशियाने निर्यात केलेले कच्चे तेल खरेदी कोण करत आहे?
 
 
 
अमेरिकेच्या दमनशाहीसमोर मान तुकवत बहुतांश विकसित देशांनी रशियाशी कोणत्याही प्रकारचा व्यापार करणे बंद केले आहे, तर दिवाळखोरीच्या भीतीने कितीतरी युरोपीय देश महागड्या दराने का होईना, पण रशियन कच्चे तेल खरेदी करण्यासाठी तयार आहेत, जर्मनीसारखे देश इच्छा असूनही बंदी घालण्यासाठी तयार नाहीत. त्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनने आपल्या हिताला प्राधान्य दिले व रशियानेही सवलतीचा वर्षाव केला. संधीचे सोने करत या दोन्ही देशांनी अमेरिकेच्या रागाला ठेंगा दाखवत आधीपेक्षा जास्त प्रमाणात रशियन कच्चे तेल खरेदीला सुरुवात केली.
 
 
 
पण, हा प्रकार एवढ्यावरच थांबलेला नाही, तर २०२१ मध्ये भारताने रशियाकडून १६ दशलक्ष बॅरल कच्चे तेल आयात केले होते. ते भारताच्या एकूण आयातीच्या निम्मेही नव्हते. पण, यंदाच्या फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांतच भारताने रशियाकडून १३ दशलक्ष बॅरलपेक्षा अधिकचे कच्चे तेल आयात केले. जेणेकरून तेलाचे भाव नियंत्रणात राहतील आणि अरब राष्ट्र व अमेरिकेचा मुजोरपणाही उतरवता येईल. मात्र, रशियावर निर्बंध घालून अमेरिकेने आपल्याच पायावर कुर्‍हाड मारल्याचे यातून दिसते. कारण, त्या निर्बंधांमुळेच रशियाला अरब राष्ट्रांचा हेकेखोरपणा उद्ध्वस्त करण्याची संधी दिली. दुसरीकडे यामुळे रशिया व भारताला आपली मैत्री अधिक दृढ करण्याचा मार्गही मोकळा करून दिला. म्हणजे, रशियाचे दुकान बंद करायला निघालेल्या अमेरिकेचे अन् अरब राष्ट्रांचेच यातून नुकसान होत असल्याचे दिसते.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

महेश पुराणिक

मूळचे नगर जिल्ह्यातील. नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदव्युत्तर पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक(वृत्त) पदावर कार्यरत.