नवी दिल्ली : "विजय प्राप्त करणे हा आयुष्यातला एक अनिवार्य भाग असल्याने आपण तो नक्कीच मिळवत आहोत. परंतु आपल्याला तो विजय आता उपयोगात आणायचा आहे. विजयी होणं हे आपलं ध्येय नसून तो आपल्या आयुष्यातला एक टप्पा आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. गुरुवाद, दि. १६ जून रोजी तेलंगणा येथे विद्यार्थी सेवा समिती आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) वतीने 'स्फूर्ती छात्रशक्ती भवन' या वास्तूचे उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी वास्तूचे उद्घाटन सरसंघचालकांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते.

"विद्यार्थी क्षेत्रात कार्य करणाऱ्या इतर संस्थांमधली लोकं एकेकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर हसायची. हे केवळ सरस्वती पूजन आणि परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचं कौतुक; या व्यतिरिक्त काही करत नाहीत. परंतु आज असं म्हणायची कोणाची हिम्मत होणार नाही. पूर्वी अभाविपला क्षुल्लक (नगण्य) समजणारी लोकं आज त्यालाच आघाडीवर (अग्रगण्य) पाहू लागली आहेत. अभाविप हे आपल्या कष्टाने झालेलं एक परिवर्तन आहे. त्यामुळे आपलं कार्य हे इतर संघटनांप्रमाणे नाहीये. विजय प्राप्त करणे हा आयुष्यातला एक अनिवार्य भाग असल्याने आपण तो नक्कीच मिळवत आहोत. परंतु आपल्याला तो विजय आता उपयोगात आणायचा आहे. विजयी होणं हे आपलं ध्येय नसून तो आपल्या आयुष्यातला एक टप्पा आहे.", असे सरसंघचालक यावेळी म्हणाले.
"मी तेलंगणातील अभाविप कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहे. राज्यात प्रतिकूल परिस्थिती असूनही आपण लढत आहात हे माझ्या लक्षात आहे. 'स्फूर्ती छात्रशक्ती भवन' या वास्तूचे उदघाटन हेच वास्तव दर्शविते की सध्याची आपली चळवळ ही सकारात्मक पातळीवर आहे.", असेही ते पुढे म्हणाले.