नापाक ‘डिजिटल’ युद्ध

    16-Jun-2022   
Total Views |
 
 
cyber war
 
 
 
 
 
फुकट मिळालेल्या स्वातंत्र्याला अस्मितेची किनार नसते. पाकिस्तानची अवस्थाही अशीच. राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा काय तर काश्मीर आणि भारताशी शत्रुत्व आणि त्यातून कधीही साकार न होणारे ’गजवा-ए-हिंद’चे स्वप्न. अटलबिहारी वाजपेयी यांनी तर तेव्हाच पाकिस्तानला आरसा दाखवला होता. ‘पर तुम क्या जानो आजादी क्या होती हैं? तुम्हें मुफ़्त में मिली न कीमत गयी चुकाई।’, पाकिस्तान आपला मित्र केव्हाच होऊ शकत नाही, हे सांगताना पाकिस्तानला स्वातंत्र्याची किंमत काय कळणार, हे तेव्हाच सांगून टाकले होते. स्वातंत्र्य, राष्ट्रप्रेम या गोष्टींच्या उणिवा असल्या की गत काय होते, याचा प्रत्यय आता नरकयातना भोगणार्‍या पाकिस्तानला येत असेल. पण, याचा काही फायदा होईल, असली परिस्थिती नाहीच. उलट असल्या शत्रूपासून सावध राहण्याची गरज आहे.
 
गेल्याच आठवड्यात शुक्रवारी जुम्म्याची नमाज झाली. त्यानंतर देशात एकच हिंसाचार उसळला. या हिंसाचाराच्या प्रकरणात ‘फॅक्ट चेक ऑर्गनायझेशन डिजिटल फारेंसिक्स रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिटिक्स सेंटर’तर्फे (डीएफआरएसी) याबद्दल ‘पोलखोल’ करण्यात आली. ‘डीएफआरसी’तर्फे या प्रकरणात सांगितल्यानुसार, पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल कथित वादग्रस्त टीपण्णीवरून सुरू असलेल्या हिंसाचाराचा कट हा पाकिस्तानातच रचला होता. हिंसाचार माजवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने फेक व्हिडिओ शेअर केला होता. पाकिस्तानी पत्रकार असद खरालने भारतात धार्मिक हिंसाचार माजला आहे, असे भडकवणारा एक फेक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये ते हिंदू दहशतवाद भारतात कसा फोफावतोयं पाहा, असं म्हटलं. एवढ्यावर तो थांबला नाही, तर पुढे म्हणतो की, हे सगळे पाहून मानवाधिकार संघटना फक्त न्याय हक्कांच्या गप्पा मारत असतात. शुक्रवारी हे ट्विट तीन हजारवेळा रिट्विट करण्यात आले. हा खोटा व्हिडिओ सोशल मीडियावर ’हिंदू दहशतवाद’ या नावाने फिरवण्यात आला. त्यानंतर भारतात जागोजागी हिंसाचार उफाळून आला.
 
व्हिडिओ दोन वर्षे जुना आहे. मध्य प्रदेशातील धारमध्ये दि. ५ फेब्रुवारी, २०२० रोजी गर्दीने सहा जणांना चोरीच्या आरोपावरुन मारहाण केली होती. मात्र, या व्हिडिओचा वापर भारताविरोधात हिंसाचार उफाळून आणण्यासाठी करण्यात आला. एकाच पत्रकाराच्या व्हिडिओमुळे संपूर्ण भारतात हिंसाचार पसरला का, तर तसे नाही. ‘डीएफआरएसी’च्या दाव्यानुसार, तब्बल ६० हजारांहून अधिक सोशल मीडिया अकाऊंट्सद्वारे हिंसाचार भडकावण्याचे काम सुरू होते. सोशल मीडियावर वारंवार भडकवणारी भाषणे, हॅशटॅग्स आणि पोस्ट करण्यात आल्या. हिंसाचाराचे व्हिडिओ सातत्याने ‘व्हायरल’ व्हावेत, त्यावर लोकांनी प्रतिक्रिया देत राहावी यासाठीही ‘डिजिटल’मीडियाचा अल्गोरिदम काम करत असतो, अन्यथा सोशल मीडियावर असले व्हिडिओ ‘व्हायरल’ होण्यापासून कुणाला रोखता येणे शक्य नव्हते का? सोशल मीडिया कंपन्यांनी त्यांच्या ‘फॅक्ट चेक’ अंतर्गत अशा पोस्ट हटविण्यासाठीचे धोरण आणि नियमावली कठोर केली असती, तर परिस्थिती वेगळी असली असती.
 
मात्र, आगीत तेल ओतले जाईल याची काळजी सोशल मीडियाचे ‘अल्गोरिदम’ पुरेपूर घेत असते. पाकिस्तान हा प्रत्येक गोष्टीला धार्मिकतेच्या चष्म्यातून पाहतो. नुपूर शर्मा प्रकरण तरी याला कसे अपवाद ठरेल? या सगळ्या प्रकारात ‘मुस्लीम ब्रदरहुड’ही मागे नव्हती. इजिप्त, बहारीन, सौदी अरब आणि युएई या मुस्लीम देशांनी जरी या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले असेल तरीही कतार, तुर्की आणि पाकिस्तानने या संघटनेला पाठिंबा देणे थांबवलेले नाही. ‘बॉयकॉट इंडिया’सहीत भारतीय उत्पादनांवर बहिष्काराची ठिणगी इथूनच पेटली होती, तर दुसरीकडे आता नुपूर शर्मा प्रकरणाचा वचपा म्हणून भारतीय सरकारी संकेतस्थळांवरही हल्ला सुरू करण्याची योजना पूर्ण आहे. धर्मांधतेच्या आहारी गेलेल्या दहशतवाद्याला आसरा देणार्‍या या पाकिस्तानला स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत भारतासोबत हातात हात घालून विकास करण्याची संधी होती. मात्र, सुरुवातीला अमेरिका, त्यानंतर चीनच्या नादी लागून त्यांनी ती घालवली. असो. तो त्यांचा अंतर्गत मुद्दा. परंतु, ज्या कट्टरतेला खतपाणी पाकिस्तान त्यांच्या देशात घालतंय त्या आगीच्या झळा आता भारतात जाणवू लागल्याने विषय चिंतेचा नक्कीच आहे.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. तीन वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन.