केरळ: पश्चिम बंगाल प्रमाणेच केरळ राज्यात देखील विरोधकांवर हिंसक हल्यांच्या माध्यमातून दबाव टाकण्याची परंपरा फार जुनी आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन उड्डाण करणाऱ्या विमानात आंदोलन केल्यानंतर केरळ युवक काँग्रेसच्या तीन सदस्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचे अंगरक्षक अनिल कुमार यांच्या तक्रारीनंतर वालियाथुरा पोलीस विभागाने भारतीय दंड संहिता कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन कन्नूर येथे तीन दिवसांच्याअधिकृत दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री विजयन कन्नूरहून तिरुअनंतपुरमला जाणार्या विमानात चढले असता फरजीन मजीद, नवीन कुमार आणि सुनीथ कुमार हे केरळ युवक काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मुख्यमंत्र्यांच्या विमानात चढले आणि केरळ पोलिसांच्या कथित छळाच्या निषेधार्थ त्यांनी काळे झेंडे मुख्यमंत्र्यांना दाखवले. त्यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा पथकाने आणि विजयन यांच्यासोबत असलेले एलडीएफ नेते जयराजन यांनी पकडले आणि त्यांना सीआयएसएफच्या ताब्यात दिले.
एलडीएफ नेते जयराजन यांनी या घटनेचे वर्णन “दहशतवादी हल्ल्यापेक्षाही भयंकर” असे केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन यांनीही या घटनेवर टीका करत "युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याचा कट रचत होते" असा दावा केला आहे. तर काँग्रेस नेते व्हीडी साठेसन यांनी या घटनेचे वर्णन “पोलीस दडपशाहीचा प्रतिकात्मक निषेध” असे केले आहे. काँग्रेसचे माजी आमदार केएस सबरीनाथन यांनी या घटनेची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या एका व्यक्तीने दोघांना धक्काबुक्की केल्याचे दाखवले आहे. तसेच एलडीएफ नेते जयराजन यांनी निषेध करणाऱ्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याचा दावा माजी आमदार सबरीनाथन यांनी केला आहे.
"आमचा उद्देश फक्त निषेध नोंदवण्याचा होता पण विमानतळावर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा पथकाने आणि एलडीएफ नेते जयराजन यांनी आम्हाला अमानुष मारहाण केली", "ज्यामुळे आम्हाला गंभीर दुखापत झाली" असा दावा युवक काँग्रेस मत्तनूर ब्लॉकचे प्रमुख आणि आंदोलकांपैकी एक फरझीन मजीद यांनी केला आहे. या घटनेनंतर दोन आंदोलकांना उपचारासाठी तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले.
या घटनेनंतर अज्ञात हल्लेखोरांनी केरळ मधील पेरांब्रा, कोझिकोड येथील काँग्रेस कार्यालयावर क्रूड बॉम्ब फेकून इमारतीच्या खिडक्या आणि दरवाजे फोडले. कोझिकोड व्यतिरिक्त, राज्याच्या इतर भागातही असेच हल्ले झाले. केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मुख्य कार्यालयावरही डीवायएफआयच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. आंदोलकांनी केपीसीसीवरही दगडफेक केली आणि इमारतीसमोर उभ्या असलेल्या वाहनाची तोडफोड केली. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या निषेधाचा बदला घेण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे.