ईडीची नोटीस येताच परबांना आठवली शिर्डी..

    15-Jun-2022
Total Views |
y 
 
 
 
 
मुंबई :  शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने समन्स बजावला आहे. ईडीने अनिल परब यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले आहे. परंतु अनिल परब ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित न राहता खुशाल शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेले. अनिल परब यांच्या वतीने त्यांचे वकील ईडी कार्यालयात उपस्थित राहिले. याआधी अनिल परब कधीही समन्स बजावल्यावर लगेच ईडी कार्यालयात हजर झाले नाहीत. मागच्या वेळीसुद्धा तिसरी नोटीस बजावल्यावर परब ईडी कार्यालयात हजर झाले होते.
 
 
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली असता ते ईडीच्या अधिकाऱ्यांना टाळून शिर्डीच्या दरबारात साईबाबांसमोर हजर झाले. अनिल परब हे साईबाबांच्या दुपारच्या आरतीला उपस्थित होते. अनिल परब यांचा हा दौरा पूर्वनियोजित होता. पूर्वनियोजित दौऱ्यामुळे ते चौकशीला अनुपस्थित राहिल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी अधिकाऱ्यांना दिली.
 
 
अनिल परब यांनी दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. या रिसॉर्ट प्रकरणात काही दिवसांपूर्वी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीकडून धाड टाकण्यात आली होती. त्यानंतर अनिल परबांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणाच्या संबंधित कागदपत्रे आता ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. 26 जून 2019 ला अनिल परब यांनी साई रिसॉर्टचा कर भरल्याची मूळप्रत ईडीच्या हाती लागली. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
 
 
साईबाबांच्या कृपेने या शुक्लकाष्ठातून अनिल परबांची सुटका होणार कि नाही हे येत्या काळात स्पष्ट होईलच पण परब अजून किती दिवस ईडीची चौकशी टाळणार आहेत असा प्रश्न उपस्थित होतो. आजच्या गैरहजेरी मुळे परबांविरुद्ध अटकेचा वॉरंट जारी करा अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.