दिल्ली: नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची ईडीकडून सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरु आहे. या चौकशीविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या नावाखाली रस्त्यावर गोंधळ घातला असून काँग्रेसच्या काही आक्रमक कार्यकर्त्यांनी ईडी चौकशीच्या निषेधार्थ अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयाबाहेर टायर जाळले. आम्ही शांततेच्या व अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करू असा दावा करणारी काँग्रेस आता मात्र सर्वसामान्यांना त्रास देत वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण करत आहे.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर पलटवार करत आहेत. त्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी भाजपवर केला आहे. तसेच दिल्ली पोलिस काँग्रेसच्या मुख्यालयात घुसल्याचा आरोपही काँग्रेसने दिल्ली पोलिसांवर केला. काँग्रेस यासाठी एफआयआरची मागणी करत आहे, तर दिल्ली पोलीसांनी या प्रकरणाचा इन्कार केला आहे.
नॅशनल हेराल्ड आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस बजाविली आहे. सोनिया गांधी यांनी प्रकृती अस्वास्थ्य असल्याचं कारण देत चौकशीसाठी मुदतवाढ मागितली आहे. राहुल गांधी यांनी सलग तिसऱ्या दिवशी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजेरी लावताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून वातावरणातील प्रदूषणात भर घातली. खासदार मणिकम टागोर भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही आणि दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासह काही काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
काँग्रेस नेते शेख हुसैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह विधान केले, त्यानंतर नागपुरामध्ये हुसैन यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांसह राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राहुल यांच्या समर्थनार्थ दिल्लीत तळ ठोकून आहेत. काँग्रेसचे मुख्यमंत्री आपलं राज्यसोडून दिल्लीत काय करत आहेत? असा प्रश्न उपस्थित करून भाजपने काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर निशाणा साधला.
'आज सकाळपासून माझे दिल्लीतील निवासस्थान दिल्ली पोलिसांनी सील केले आहे, कुटुंबातील सदस्य तसेच शेकडो समर्थक घरी उपस्थित आहेत.. दिल्लीत शांततापूर्ण मोर्चा काढणे गुन्हा आहे का?' असा प्रश्न ट्विटरच्या माध्यमातून काँगेसचे खासदार दीपेंद्र हुड्डा यांनी उपस्थित केला.