आपली वाट प्रत्येक व्यक्ती स्वतः उजळून टाकू शकतो, या ध्येयाने कार्यरत असलेल्या नाशिकच्या गजेंद्र मेढी यांच्याविषयी...
मानव संसाधन व प्रशिक्षण क्षेत्रात अनुभवी व नावाजलेल्या ‘मोमेंटम’ संस्थेची निर्मितीसूत्र यशस्वीपणे गेली अनेक वर्ष सांभाळणारे गजेंद्र मेढी मूळचे नाशिककर. एका कंपनीत मानव संसाधन विभागात कार्यरत असताना अचानकपणे प्रशिक्षणाच्या जबाबदारीतून त्यांना एका नव्या क्षेत्राची ओळख झाली. पुढे त्याच क्षेत्रामध्ये संपूर्ण करिअर करण्याचा गजेंद्र यांचा प्रवास अतिशय रंजक तर आहेच, तसेच विलक्षण प्रेरणादायीदेखील आहे. आपल्यावर आलेले आव्हान किंवा संकट ही अनेक वेळा वेगळ्या परिवेशात येणारी संधी असते. आपण ती ओळखून त्या संधीचे सोने करायचे असते, असा विचार गजेंद्र यांनी केवळ आचरणात आणला नाही, तर तोच विचार त्यांच्या प्रशिक्षणातून पुढेदेखील नेला.
‘बी.कॉम’, ‘मास्टर्स इन पर्सनल मॅनेजमेंट’, ‘इंडस्ट्रियल सायकोलॉजी’, असे गजेंद्र यांचे मूळ शिक्षण. अपघातानेच प्रशिक्षणाच्या पडलेल्या जबाबदारीच्या पूर्ततेनंतर आपण मांडलेले विचार सकारात्मकरित्या स्वीकारले जात आहेत, प्रशिक्षणार्थींना त्यातून दिशा मिळत आहे हे लक्षात आले. तेव्हा, गजेंद्र यांनी या क्षेत्राकडे गांभीर्याने बघितले. अर्थात, कुठल्याही नवीन वाटेवर पाऊल टाकताना ते सक्षमपणे टाकले जावे व त्या क्षेत्रातले बारकावे समजून घेणे आवश्यक असते. यातूनच गजेंद्र यांनी ‘ट्रेन द ट्रेनर’ हे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळवले. पुढे चार वर्षं विविध ठिकाणी प्रशिक्षण शिबिरे राबवली. ज्यात काही महाविद्यालयांचादेखील समावेश होता. मराठी माध्यमातून येणार्या अनेकांप्रमाणे इंग्रजी बोलण्याचा मलादेखील न्यूनगंड होता. परंतु, महाविद्यालयातील मुलांशी सातत्याने केलेल्या संभाषणातून मला भाषेवर प्रभुत्व मिळवता आले. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण देताना शिक्षकदेखील घडत असतो. प्रगल्भ व अनुभवसंपन्न होत असतो, गजेंद्र सांगतात.
नवीन व्यवसाय सुरू करणे सोपे, पण सातत्यपूर्ण यशप्राप्तीसाठी त्यात सर्वंकष व नवीन कल्पक विचारांची मांडणीदेखील हवी. मानव संसाधन विभागातील काही कार्यभाग बाहेरील संस्थेमार्फत सल्लागार या रूपाने करून घेण्याची संकल्पना गजेंद्र यांनी केवळ मांडलीच नाही, तर यशस्वीपणे तिची पूर्ततादेखील केली. आज १४ वर्षांनंतर सल्लागार म्हणून ते २२ कंपन्यांशी जोडलेले आहेत. प्रशिक्षण विभागातदेखील त्यांनी घेतलेली झेपही उल्लेखनीय आहे. उद्योग क्षेत्रातील नामांकित अशा जवळपास १७५ संस्थांसाठी ते प्रशिक्षक म्हणून कार्य बघतात. त्यापैकी एका मोठ्या कंपनीतील ९८ हजार कामगारांना प्रशिक्षण देण्याचा विक्रम त्यांच्या संस्थेने केलेला आहे. कुठल्याही कार्यात निर्मितीक्षमता वाढवायची असेल, तर आपल्या कार्यातून आनंद मिळाला पाहिजे, हे तत्व राबवत प्रशिक्षणासाठी आखणी केली जाते. प्रशिक्षण हे सहसा रटाळ असते, हा सर्वसामान्यपणे झालेला समज भेदून मानसशास्त्रीय विचारातून मनोधारणेत बदल साधत ‘व्यक्तिमत्त्व विकास’ ही त्रयसूत्री अंगीकारून प्रशिक्षणाची मांडणी केली जाते.
गजेंद्र यांच्या संस्थेत आज २० मदतनीस आहेत. संस्था व्यक्तिसापेक्ष झाली, तर त्यात एकसुरीपणा येतो. ते होऊ नये म्हणून तरुण सहकार्यांमधून प्रशिक्षक घडवण्याला त्यांनी प्राधान्य दिले. जवळपास १५ वर्षांत संस्थेची सातत्याने प्रगती झाली. उद्योगक्षेत्रातील कामगारांपासून ते वरिष्ठांपर्यंतचे प्रशिक्षण करण्याची मिळालेली संधी, शैक्षणिक तसेच राजकारणात नेतृत्वगुणासाठी होणारे प्रशिक्षण वर्ग, एकाच वेळेस ३५ जिल्हे व ३५६ तालुक्यांमध्ये राबवलेले प्रशिक्षण अभियान,असे आपल्या यशातले महत्त्वाचे टप्पे आहेत असे गजेंद्र सांगतात. वयाने, अनुभवाने ज्येष्ठ व श्रेष्ठ असणार्यांसमोर प्रशिक्षक म्हणून उभे राहत त्यांच्याकडून प्रशंसेची पावती मिळाली की, आपण आपल्या जबाबदारीकडे अजून विनम्रतेने बघायला शिकतो, असे त्यांना वाटते. कुठल्याही प्रकारे जाहिरात न करता आपल्या संस्थेचा संपूर्ण राज्यात, भारतात विस्तार व ओळख होणे हे श्रेय संस्थेतील सगळ्यांचे आहे, असेच मत गजेंद्र मांडतात.
एखादे शिल्प घडवताना शिल्पकाराने केवळ नको तो भाग काढून टाकायचा असतो. मूळ शिल्प त्या पाषाणातच असते. त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीत अनेक क्षमता असतात. प्रशिक्षणातून आपल्याला केवळ त्या क्षमतांची जाणीव करून द्यायची असते. जाणीवपूर्वक सकारात्मक विचारातून परिवर्तन घडायला हवे. प्रत्येक प्रशिक्षणार्थी हे बीज नसून एक वृक्ष आहे हे सांगण्याचा आपला प्रयत्न यापूर्वीही होता व पुढेदेखील राहील.
’अत्त दीपो भव’ या संज्ञेप्रमाणे आपली वाट प्रत्येक व्यक्ती स्वतः उजळून टाकू शकतो. दरवेळी समोर येणार्या लोकांच्या स्वभाव गुणधर्म तसेच मानसिकतेनुसार आपल्याला प्रशिक्षणाच्या पद्धतीत काही बदल करावे लागतात. ते करण्याची तयारी असते, तेव्हा प्रवास सुंदर होतो. शिक्षण ही शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची व आवश्यक प्रक्रिया असते. इथून पुढेही अधिकाधिक प्रशिक्षक घडवणे हाच आपला प्रयत्न असेल. प्रशिक्षणार्थींना आपल्या प्रशिक्षणातून जगण्याचा उद्देश उमजून यावा, त्यांचा स्वतःवरचा विश्वास पुन: प्रस्थापित व्हावा व अर्थपूर्ण जीवन सगळ्यांनाच जगता यावे, हा आपला व आपल्या संस्थेचा ध्यास आहे. नैतिकता व मूल्याधिष्ठित सेवा, तसेच केवळ स्थानिकच नव्हे, तर जागतिक अभ्यासक्रमांवर आधारित प्रशिक्षणाची मांडणी करून समाजात सकारात्मक परिवर्तनाचा भाग होता यावे, हेच भविष्यातीलदेखील आपले उद्दिष्ट असेल, असे गजेंद्र आवर्जून सांगतात.