मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतागृहांच्या निर्माणासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, मुंबईतील वस्त्यांवरील नागरिकांना आजही मोकळ्या मैदानात, वाढलेल्या झाडाझुडपांत,असुरक्षित वातावरणात शौचास जावे लागत आहेत. यामध्ये उघड्यावर शौचास जाणार्या महिलांची सर्वाधिक कुंचबणा होते, अशी व्यथा चेंबूरमधील जय आंबेनगर येथील महिलांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना मांडली.
सार्वजनिक शौचालयाची गरज
येथील स्थानिक महिला सांगतात की, आम्हाला पहाटे अंधारातच प्रातःर्विधीसाठी जावे लागते. शिवाय रात्री-अपरात्री उघड्यावर जाणे धोकादायक आहे. भरदिवसा उघड्यावर जाणे लाजिरवाणे वाटत असल्यामुळे महिला अंधार पडल्यानंतरच शौचास जातात. तसेच, दिवसा उघड्यावर गेल्यास आजूबाजूच्या इमारतीतील नागरिक व्हिडिओ काढतात, अशी धक्कादायक माहितीही या महिलांनी दिली. हा प्रकार मानहानीकारक असल्यामुळे किमान सार्वजनिक शौचालयाची गरज असल्याचे महिलांनी सांगितले.
मूलभूत सुविधांपासून वंचित
“जय आंबेनगर हे ४०० नागरिकांची लोकवस्ती आहे. या वस्तीवरील नागरिकांना अनेकदा बेकायदा असल्याच्या नोटिसादेखील देण्यात आल्या आहेत. परंतु, आमचे पुनर्वसन करा,” अशी या नागरिकांची मागणी आहे. या सगळ्यांमध्ये या नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. “आमच्या घरांबाबत जो निर्णय होईल तो होईल, पण त्याची शिक्षा आम्हाला पालिका अशी का देत आहे? आम्हाला प्रत्येक घरात नाही, पण सार्वजनिक शौचालये तरी उभारून द्यावीत,” अशी मागणी या महिला करत आहेत.
महापालिका प्रशासन उदासीन!
येथील स्थानिक महिला व्यथा सांगताना म्हणतात की, “१५ वर्षांपासून आम्ही इथे राहतो. जंगलात उघड्यावर आम्हाला शौचास जावे लागते. आम्ही कित्येकदा आमच्या भागात सार्वजनिक शौचालय उभारून द्या, अशी मागणी केली होती. मात्र, कोणीही आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही. मुंबई महापालिका दोन ते तीन वेळा येऊन जागेचा ‘सर्व्हे’ करून गेली. पण, पुढे काहीच केले नाही. आम्हाला रात्री-अपरात्री या परिसरात भीती वाटते. दारू पिणारे, नशेडी लोक आमचे चोरून आमच्या तरुण पोरींचे व्हिडिओ बनवितात. नगरसेवक मतं मागायला येतात. मात्र, आमच्या मागण्या कोणीही पूर्ण करत नाही.”