इंद्रधनुषी आवाजाचा शिल्पकार - प्रदीप भिडे

    12-Jun-2022
Total Views |

pradeep bhide
 
 
 
 
फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकलेला, पुढे पत्रकारितेचा कोर्सही पुण्याच्याच ‘रानडे संस्थे’तून केलेला हा तरुण दूरदर्शनच्या सुवर्णकाळातील समस्त प्रेक्षकांचा लाडका वृत्त निवेदक बनला. ‘पुणे फेस्टिव्हल’चा तर तो अनेक वर्षे स्टार सूत्रसंचालक होता. ‘रयत शिक्षण संस्थे’च्या धामणीच्या (तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे) शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेला, पुण्याच्या संस्कारात वाढलेला प्रदीप भिडे नुकताच आपल्यातून निघून गेला. त्यानिमित्त या माध्यमकर्मीच्या कारकिर्दीचा हा धावता प्रवास...
 
 
 
प्रदीप भिडे हे नाव धारण करणार्‍या ७०च्या दशकातील तरुणाची कथा ही केवळ एका यशस्वी वृत्तनिवेदकाच्या वाटचालीची गोष्ट नाही, तर ती एका निम्न मध्यम वर्गातल्या, यशासाठी झगडत, कष्टाने एकेक डोंगर पार करत जाणार्‍या एका जिद्दी तरुणाची यशोगाथा आहे. ‘रयत शिक्षण संस्थे’त आई-वडील दोघेही शिक्षक ध्येयनिष्ठ आणि सेवाभावी, अशी आपली ओळख जपणारे. दोन भाऊ आणि एक बहीण या समवेत वाढताना पैशाची सुबत्ता नसली तरी वैचारिक श्रीमंतीत वाढलेला हा तरुण उत्तम मार्क्स मिळवून फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाला. चौफेर वाचन आणि मूल्य संस्काराची शिदोरी या भांडवलावर तो पुण्याच्या ‘पीडीए’ या नाट्यसंस्थेत भालबा केळकर यांच्या हाताखाली नाट्यशास्त्राचे धडेही घेऊ लागला. कॉलेजच्या ‘साहित्य सहकार’ या चळवळीत सामील होऊन अनेक साहित्यिक कार्यक्रमात तो धडाडीने सहभागी होत असे. ‘बीएससी’ ही पदवी मिळाल्यानंतर पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण करतो ना करतो तोच मुंबई दूरदर्शनला काम करण्याची संधी चालून आली. या निमित्ताने या मायावी नगरीत हातात एक ट्रंक आणि वळकटी सांभाळत तो दाखल झाला. दूरदर्शनचे केवळ तीन दिवसांच्या कामाचे कंत्राटपत्र घेऊन आग्रीपाड्याच्या चाळीतल्या गर्दीत हाही एक जीव सामील झाला आणि तीन दिवसांचा हा पाहुणा जवळपास ५० वर्षे मुंबईचा एक सन्माननीय सेलिब्रिटी म्हणून नावारुपास आला. हिंदी फिल्म सृष्टीत असेच नशीब आजमावायला मुंबईत आलेल्या मंडळीचे आपल्याला कायम कौतुक वाटत आलेले आहे. फुटपाथवर स्टुडिओत राहून एकवेळ जेवून इतिहास निर्माण करणार्‍या सिनेकलावंतांना मिळणारे ‘ग्लॅमर’ मराठी माणसाना द्यायला मात्र आपण फारसे तयार नसतो. पण, प्रदीप भिडे यांचा हा प्रवास तेवढाच तोलामोलाचा आणि रोमहर्षक आहे हे आवर्जून सांगितले पाहिजे. टीव्ही सुरू झाला दि. २ ऑक्टोबर, १९७२ला. भिडे बातम्या वाचायला लागले १९७४ साली. पण, त्या आधी ते ‘ऐसी अक्षरे’ या दूरदर्शनच्या प्रौढ शिक्षण कार्यक्रमात शिक्षकाची भूमिका करत असत. त्यांचे सादरीकरण आणि आवाजाची फेक प्रेक्षकांना आवडत असे. केंद्राच्या संचालकांनाही हा चमकदार तरुण भावला आणि मग ‘आजच्या ठळक बातम्या’ अधिक ठळक झाल्या. तेव्हा घरटी टीव्ही सेट नसे. वाड्यात सहसा घर मालकांकडे तो असे. इतर कोणतेही एवढे सहज मनोरंजन माध्यम उपलब्ध नसल्यामुळे, निवेदिका शुभरात्री म्हणेपर्यंत मंडळी छोट्या पडद्याला डोळे लावून बसलेली असायची. मनोरंजनाच्या कार्यक्रमापाठोपाठ मराठी बातम्या भाव खाऊन जात. यात भक्ती बर्वे, अनंत भावे, चारुशीला पटवर्धन, स्मिता तळवलकर आणि प्रदीप भिडे यांना तर ‘स्टार’सारखा भाव होता.त्यावेळी अनेकजण प्रदीप भिडे यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडलेले होते. विवाहोत्सुक तरुणीला नवरा कसा हवा असे विचारले, तर ‘प्रदीप भिडेसारखा’ असे म्हणत असे. एवढे गारुड या माणसाचे तरुणांवर होते.
 
 
 
भिडे उत्तम बातम्या वाचत. आवाज चांगला, भरदार, सुस्पष्ट, व्यक्तिमत्त्वही त्याला साजेसे. बातम्या वाचताना त्यातील भावभावना फारशा नाटकी होणार नाहीत, याची काळजी घेत त्या आशयाला त्यांनी दिलेली भावनिक किनार हे सगळे प्रेक्षकांना आवडत गेले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक माहिती बातमीच्या स्वरूपात समजून घेण्यास आवाजातील मूळ तटस्थता आणि त्याला दिलेले आवश्यक कंगोरे मदत करतात आणि यामुळे बातमीचा नेमका मथितार्थ ध्यानात येतो हे भिडे यांनी दाखवून दिले. घडलेली बातमी जशीच्या तशी तिच्या नेमक्या वजनासह पेश करणे हे अवघड काम प्रदीप यांनी आपल्या कमावलेल्या आवाजाच्या मदतीने आणि बातमीतील नेमका गाभा ओळखण्याच्या आपल्या अंगभूत कौशल्याने सहज केले. पडद्यावर सतत दिसणारा चेहरा हे तर त्यांच्या लोकप्रियतेचे कारण होतेच. पण, असे अनेक चेहरे तेव्हाही प्रेक्षकांसमोर होतेच की, पण बातमी मूल्याचा योग्य आदर करणारा वृत्तवाचक हे त्यांनी आयुष्यभर पाळलेले तत्व त्यांना जनमानसात एक वेगळेच आदराचे स्थान देऊन गेले. टीव्हीबाहेरही त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांना सूत्रसंचालक म्हणून बोलावले जायचे. सरकार दरबारी तर त्यांना प्रथम पसंती असे. शरदराव पवार, विलासराव देशमुख, मनोहरपंत जोशी, नारायणराव राणे, देवेंद्र फडणवीस अशा रथी महारथी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांना त्यांनी आपल्या निवेदनाने कायमच खुलवले. अनेक मुख्यमंत्री आवर्जून ‘भिडे यांना बोलवा,’ असे आपल्या अधिकार्‍यांना सांगत असत. हा विश्वास भिडे यांनी कमावला होता. कार्यक्रमाचे गांभीर्य कमी होईल, असे चुटके आणि शेरेबाजी करण्यात त्यांना अजिबात स्वारस्य नसे. सरकारी कार्यक्रमात ‘डेकोरम’ सांभाळायचा असतो, प्रेक्षकांना हसवण्यासाठी अल्लड शेरेबाजी करायची नसते, हे त्यांना ठाऊक असायचे. कार्यक्रम रंगवायचा तो आपल्या धीर गंभीर, टणत्कार असलेल्या आवाजाच्या रंगांनी याचे त्यांना पुरेपूर भान होते. बातम्यांबरोबर आणखी एक क्षेत्र त्यांनी गाजवले ते म्हणजे रेडिओ जाहिरातीचे. १९८० ते २००० ही दोन दशके या माणसाने जाहिरात जगतात विशेषतः रेडिओ जाहिरात क्षेत्रात अक्षरशः राज्य केले असे म्हणायला हरकत नाही. किमान पाच हजार जाहिराती त्यांच्या नावावर आहेत. त्या काळात कधीही रेडिओ लावला आणि ते ही ‘विविध भारती’ केंद्र लावले, तर पाच मिनिटांच्या अवधीत भिडे यांचा पहाडी आवाज कानी पडला नाही, असे कधी झाले नाही. हे काम त्यांना सहज मिळाले नाही. जाहिरात क्षेत्रात गुणवत्ता असल्याशिवाय कुणी उभे करत नाही. सातत्यपूर्ण कामगिरी आणि वस्तू आणि सेवेच्या वैशिष्ट्यांचे ठळक दर्शन घडवणारी शब्दफेक, आवाजाची धार आणि गोलाई यांचा मुलामा आवश्यक असतो. तो दिल्याशिवाय ग्राहकांपर्यंत तो संदेश प्रभावीपणे पोहोचत नाही, हे पुरेपूर ठाऊक असलेल्या या कलावंताने प्रत्येक जाहिरातीत आपले सर्वस्व ओतले. त्यामुळे पुरुष आवाज कुणाचा घ्यायचा, हा ‘एजन्सी’ समोरचा प्रश्न त्यांनी दोन दशके तरी निकाली काढला. सकाळी ८ वाजता कुलाब्यात, दुपारी ३ वाजता वरळीच्या रेडिओवाणी स्टुडिओत, रात्री ९ वाजता खार इथे अशी कोणतीही वेळ असो, त्यांनी ती कधीही चुकवली नाही. ‘सिंगल टेक ओके’ हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य होते. दृकश्राव्य जाहिरातीत तर वाचनाचा कस लागतो.मूळ इंग्रजी भाषेतील जाहिरातींना त्यातील संवादाच्या लांबीचा संवाद नेमका म्हणणे ओठांच्या हालचालींशी शब्द जुळवणे हे अवघड काम असते. भिडे मात्र ते सहजगत्या करत असत.
 
 
 
हा आवाज केवळ जाहिराती आणि बातम्यांपुरता मर्यादित राहिला नाही, तर ध्वनिफिती, रंगमंचीय-सांस्कृतिक कार्यक्रम, फिल्म्स डिव्हिजनचे माहितीपट, कॉर्पोरेट फिल्म्स यातही तो निनादत राहिला. कार्यक्रमांच्या उद्देशाचे भान ठेवून आवाजातील लवचिकता वापरत, त्यांनी या सर्वच क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केली. साहित्य, शिक्षण, सामाजिक उत्तरदायित्व याचा परीसस्पर्श लाभलेल्या भिडे यांनी आपल्या मराठी भाषेच्या प्रभुत्वाच्या जोरावर एक सशक्त अशी निवेदन संस्कृती महाराष्ट्रात रुजवली, वाढवली. भिडे यांची ही कारकिर्द पाहताना मला नेहमी ‘आवाजाचे रंग’ नावाची मारुती चित्तमपल्ली यांची कथा डोळ्यासमोर येते. यात वनवासी भागात राहात असलेली एक म्हातारी आवाजाचे रंग ओळखण्यात पटाईत असते. म्हणजे तिला एखाद्या माणसाचा आवाज ऐकताना किरमिजी रंग दिसला की, तो माणूस कपाळावर आठी उमटवणारा असणार हे पक्के असायचे. मोकळ्या पल्लेदार आवाजाचा कुणी असला की, तिला धवल रंग दिसत असे. मग ती अंदाज बांधायची की तो गृहस्थ छान स्वभावाचा आणि भला असणार. विशेष म्हणजे ते तिचे आडाखे अचूक असत. यातला कळीचा मुद्दा म्हणजे आवाज ऐकला रे ऐकला की, ध्वनी बरोबर रंगांचे शिडकावे तिच्यासमोर फेर धरायचे. प्रदीप भिडे यांचा आवाज तिने ऐकला असता, तर नक्की एक छानसे इंद्रधनुष्य तिला दिसले असते. कारण, या माणसाच्या आवाजात इतके वैविध्यपूर्ण रंग होते की, सारा आसमंत तो ऐकताना त्यात भिजून जातो. एक मात्र माझा अंदाज आहे की, भिडे यांच्या आवाजात करडा आणि काळा हे रंग सापडणार नाहीत. आणि कसे सापडतील? ज्यांनी कधी कुणाचा दुस्वास केला नाही, कुणाशीही शत्रुत्व केले नाही, कायमच सर्वांचे भले चिंतले, त्यात तो कसा सापडेल? त्यांचा आवाज नेहेमीच माणुसकीची उब देणारा आणि मराठी सांस्कृतिक विश्वाचा इंद्रधनुषी आवाज म्हणूनच ओळखला जाईल.
 
 
 
keshavsathaye@gmail.com
 
 ९८२२१०८३१४
 
- डॉ. केशव साठ्ये