आदर्श कला व वणिज्य महाविद्यालय, कुळगाव-बदलापूरच्या प्राचार्या डॉ. वैदेही दप्तरदार यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दि. ३१ मे रोजी संपन्न झाला. त्यानिमित्ताने हा लेखप्रपंच...
डॉ. वैदेही दप्तरदार या माझ्या डोंबिवलीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयातील सहकारी. अर्थशास्त्राच्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका. विद्यार्थीकेंद्री शिक्षक हल्ली अपवादानेच आढळतात. वैदेही या एक अशाच सन्माननीय अपवाद. शिक्षणप्रक्रियेत शिक्षक क्रमिक पुस्तक (टेक्स्टबुक) शिकवायचे, त्या माध्यमातून विषय शिकवतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थीही शिकवतो, घडवतो. त्याची वैचारिक, बौद्धिक व भावनिक जडणघडणकरतो. विद्यार्थी व शिक्षक यांच्यापलीकडेच नाते असणार्या वैदेही शिक्षकाच्या या तिन्ही जबाबदार्यांचे भान आहे.
म्हणून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यावर त्यांचा भर होता. वर्गाबाहेरील बिनभिंतीच्या शाळेतसुद्धा त्या विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत. त्यांच्या चर्चा, विचारविनिमय करता-करताच "Chiesting out the unessential' ही मूर्तिकलेतील प्रक्रियाही यांच्याकडून सहज घडत असे. मुळात आपल्याला प्रतिपाद्य विषयाचे सखोल ज्ञान असल्याशिवाय आणि विद्यार्थ्यांविषयी सहजस्फूर्त आत्मियता असल्याशिवाय आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांत मिसळणे शक्य होत नाही. आपले शिकवणे रंजक व उद्बोधक होण्यासाठी मुळात शिक्षकाजवळ ‘आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग’ करण्याची क्षमता असावी लागते. ग्रंथांच्या ओळीमध्ये काय लिहिले आहे, ‘रिडिंग बिटवीन दि लाईन्स’ याचा त्याला विचार करावा लागतो, तसेच त्यातील संदर्भ उलगडून दाखविण्यासाठी ‘रिडिंग बीहाईंड दि लाईन्स’ हेही करावे लागते. तसेच त्यासाठी चौकस व शोधकबुद्धी आणि संशोधकवृती असावी लागते.
व्यापक चतु:स्त्र आणि अद्ययावत वाचन असावे लागते. वैदेहीमध्ये त्यांच्या शिक्षक असण्यावत मला ही सर्व गुणवैशिष्ट्ये दिसली. याला जोड होती ती सळसळत्या उत्साहाची. त्यांच्याजवळ नव्याचा शोध घेण्याचा, नवे शिकण्याचा ध्यास आहे, सतत तळमळीने शिकविण्याची हौस आहे, शिक्षकातला विद्यार्थी जेव्हा संपतो तेव्हा तो शिक्षक उरत नाही, तो पाट्या टाकणारा हमाल होतो. आज अशी अनेक मंडळी तुम्हाला शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना दिसतील. मात्र, आपल्या बुद्धी व विचारांवर वैदेहीने कधीच गंज चढू दिला नाही म्हणूनच व्याख्याता ते प्राचार्य हा प्रवास त्या यशस्वीरित्या पूर्ण करू शकल्या, याचा मी साक्षीदार आहे.
‘नॅक’मधील ‘एन’सुद्धा माहीत नव्हता तेव्हापासून पेंढरकर महाविद्यालयात आम्ही प्रतिवर्षी दोन दिवसांचे चर्चासत्र आयोजित करीत असू. त्यातील विद्यार्थी व प्राध्यापकांचा सहभाग स्वयंस्फूर्त होता. अनेक आंतरराष्ट्रीय विषयांवर आम्ही ही चर्चासत्रे आयोजित करीत असू, त्यांची आखणी, प्रत्यक्ष अंमलबजावणी व त्यावर आधारित ग्रंथांची निर्मिती यासाठी संघभावनेने काम करणार्या चमूमध्ये वैदेहीचा भरभरून सहभाग असे. कदाचित त्यांच्या त्या सळसळत्या उत्साहामुळेच आमचे मैत्र जुळले असेल.
या चर्चासत्र मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दीनिमित्त एक चर्चासत्र आम्ही योजले होते. त्यात ‘डॉ. आंबेडकरांचे अर्थशास्त्रातील योगदान’ या विषयावर वैदेही आणि आनंदी नारायणन यांनी जे शोधनिबंध वाचले, ते त्यांच्या बुद्धीची चमक दाखविणारे होते. विशेषत: वैदेहीने ‘दि प्रॉब्लेम ऑफ दि रुपी’ या बाबासाहेबांच्या ग्रंथाचे जे विश्लेषण केले, ते माझ्या आजही स्मरणात आहे. ‘स्टाफ अकॅडमी’च्या कार्यक्रमातही तिचा उत्साहाने सहभाग असे. चौकस बुद्धीची अभ्यासक अशी तिची ओळख मी करुन देईन.
पुढे वैदेहीने पेंढरकर कॉलेज सोडले, हे एका अर्थाने चांगलेच झाले. आपल्या बौद्धिक विहारासाठी इथले आकाश पुरेसे नाही, हे लक्षात आल्यावर संधी मिळताच ती त्या चौकटीतून बाहेर पडली. सोमय्या महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालयातून तिने प्राचार्य म्हणून प्रशासकीय व व्यवस्थापकीय अनुभव गाठीशी बांधला व शेवटच्या टप्प्यात बदलापूरच्या आदर्श कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून ती स्थिरावली. इथे तिच्या प्रतिभेला, कर्तृत्वाला खरा बहर आला. सुदैवाने व्यवस्थापकांनीही दूरदृष्टी पाहून तिला खूपच मोकळीक व प्रोत्साहन दिले. सेवानिवृत्तीपर्यंत कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता या अर्धनागरी शहरातील महाविद्यालयात आपले कर्तृत्व समर्पित करायचे, असे तिने ठरवले. आज हे महाविद्यायाल अनेक अर्थाने ‘लीडिंग कॉलेज’ झाले आहे, याचे श्रेय नि:संशय वैदेहीच्या नियोजनबद्ध व दूरदृष्टीने केलेल्या कामाला जाते.
‘नाऊ स्काय ईज दि लिमिट’ असे तिने ठरवावे. दीर्घकालीन योजना, उपक्रमांची आखणी केली. प्राध्यापकांची टीम बांधली. प्रशासकीय यंत्रणेवर पक्की मांड ठोकली. ‘नॅक’ मानांकनाच्या दृष्टीने तयारी सुरू केली. ग्रंथालय, क्रीडा, शिक्षण यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले, हे सर्व करताना विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे, याचे भान तिने कधीच सुटून दिले नाही. याच काळात वैदेहीच्या कर्तृत्वाला खरे रंगरूप आले. मुंबई विद्यापीठ, तेथील अधिकारी, प्रशासन, सिनेट, विद्वत् सभा, परीक्षा विभाग, विषय नियामक मंडळ या सर्वांशी तिने घट्ट संबंध प्रस्थापित केले. विद्यापीठाच्या अनेक योजनांचा महाविद्यालयासाठी लाभ करून घेतला. विद्यापीठ अनुदान मंडल, ‘नॅक’ कमिटी, ‘आयसीएसएस’ या केंद्रीय संस्थांबरोबर तिने चांगले संबंध प्रस्थापित केले. लाखो रुपयांची अनुदाने मिळवून अनेक योजना महाविद्यालयात राबविल्या.
अनेक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय चर्चासत्रांत शोधनिबंध सादर करुन आपल्या बुद्धिमत्तेचा ठसा उमटविला. जवळजवळ प्रत्येक वर्षी विविध विषयांवर चर्चासत्रांचा ज्ञानयज्ञ आयोजित केला. त्यावर आधारित ग्रंथांची निर्मिती करुन वैचारिक जगतात भर घातली. महाविद्यालयाचे ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ अद्ययावत केले. महाविद्यालयाचे हृदय असलेले ग्रंथालय ग्रंथसज्ज केले. या सर्वांचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. त्यांच्या आग्रहामुळेच अनेक चर्चासत्रांत मी स्वतः निबंध वाचले आहेत. आमचे मैत्र घट्ट झाले आहे.
वैदहीचे लग्न झाले तेव्हा ती पदवीधरही पूर्णपणे झालेली नव्हती. त्यानंतर आपले घर, संसार सांभाळून तिने उच्च शिक्षण पूर्ण केले. अनेक विद्याशाखांतील पदव्या मिळविल्या. सन्मानाची पीएच.डी मिळवली. आज ती अनेक विद्यार्थ्यांना पीएच.डीसाठी मार्गदर्शन करते आहे. हा सर्व प्रवास थक्क करून टाकणारा आहे. कर्तृत्वाची नवीनवी क्षितिजे आत्मसात करणे, हा तिचा ध्यास आहे, श्वास आहे. अर्थात, हे सर्व त्यांचे पतीदफ्तदार व मुलांच्या मनःपूर्वक व सक्रिय सहकार्याशिवाय शक्य झाले नसते. सांसारिक जीवनातही त्या यशस्वी पत्नी, माता व आता आज्जी म्हणून त्या यशस्वी व समाधानी आहेत. निवृत्तीनंतर त्यांना खूपच मोकळा वेळ मिळेल. त्यांनी आपली ज्ञानसाधना अशीच चालू ठेवावी. सामाजिक व आर्थिक प्रश्नांचा धांडोळा घेत लिहीत राहावे. ज्ञानमार्गी संस्था, संघटनांशी स्वतःला जोडून घ्यावे. आपल्या ज्ञानाचा, कर्तृत्वाचा, अनुभवाचा समाजाला उपयोग होईल, असे पाहावे, अशा आकारमुक्त बौद्धिक विचाराला मोकळे झाले आहे. पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा व शुभाशीर्वाद !