देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सामाजिक क्रांती घडवून आणणार्या पंढरपूर मंदिर प्रवेश सत्याग्रहासही ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. सानेगुरुजींनी आपल्या प्राणांची बाजी लावून दहा दिवस हा सत्याग्रह केला. या सत्याग्रहाचा सविस्तर इतिहास विद्याधर ताठे यांनी 'भेटवा विठ्ठला' पुस्तकात शब्दबद्ध केला असून सा. ‘विवेक’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि. ९ मे रोजी पंढरपूर येथे तनपुरे महाराजांच्या मठात सकाळी ९.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने पंढरपूर आणि समतेची प्रस्थापना यांचा आढावा घेणारा लेख.
महाराष्ट्र ही संतमहंतांची भूमी. आपल्या ज्ञात इतिहासाचा आपण अभ्यास करतो, तेव्हा आपल्या लक्षात येते की, प्राचीन काळापासून महाराष्ट्रात भागवत धर्माची आणि पंढरीच्या वारीची परंपरा सुरु आहे. संत ज्ञानेश्वर माउलींच्या पूर्वजांनी पंढरपूची वारी केली होती. ‘पंढरीची वारी आहे माझा घरी आणिक न करी तीर्थ, व्रत’ अशी महाराष्ट्राची आध्यात्मिक मानसिकता आहे. ज्या पंढरपूर वारीचे इतके पुरातन महत्त्व आहे, ते पंढरपूर किती जुने असेल, या प्रश्नाचे उत्तर ’जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर’ अशा शब्दांत संत नामदेवांनी दिले आहे. वीटेवर उभा असलेला, भक्ताची वाट पाहणारा, दयाळू पांडुरंग परमात्मा हे वारकर्यांचे आराध्य दैवत होय. पुंडलिकाच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन पांडुरंग परमात्मा पंढरपुरात थांबले. भावभक्तीचा भुकेला देव, असा पांडुरंगाचा लौकिक आहे आणि या लौकिकाला अनुभवता येते पंढरपूरच्या वारीत! आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपुरात वारकर्यांची दाटी होते आणि त्या दाटीत अबीर बुक्का लेऊन पांडुरंग, वारकर्यांचा विठोबाही नाचतो, अशी जनधारणा आहे आणि हीच जनधारणा संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटात प्रत्यक्षात आणली.
महाराष्ट्र संत मंडळाचा विचार केला, तर आपल्या लक्षात येते की, अठरापगड जातीजमातीचे संत विठ्ठलनामाचा जयघोष करत पंढरीच्या दिशेने आले. आपली जात, काम, प्रदेश यापासून मुक्त होत ते वारकरी म्हणून विठ्ठलाच्या चरणी आले आणि ‘जीव शिव नाही भेद’ अशी ग्वाही त्यांनी आपल्या अभंगातून दिली. दिंडीत खांद्याला खांदा लावून नाचले, गोपाळकाल्याचा प्रसाद एकमेकांच्या मुखी भरवून संतांनी समतेचे तात्विक अधिष्ठान निर्माण केले. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगल। कोणाचाही जीवाचा न घडो मत्सर। वर्म सर्वेश्वर पूजनाचे॥’ अशी साक्षच पंढरपूर आणि वारकरी संप्रदायाने दिली, असे असले तरीही चोखोबांना पांडुरंगाच्या गाभार्यात प्रवेश करता आला नाही. संत मंडळाने चोखोबांचा थोरलेपणा मान्य केला. पण, तत्कालीन समाजधारणा त्यांना मोडता आली नाही. संतांनी प्रबोधन केले, वाट दाखवली, पण त्या वाटेने चालण्यासाठी आपल्याला पुढे अनेक शतके वाट पाहवी लागली. चोखोबांनी विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन करणारे अभंग लिहिले आहेत. मंदिरात न जाताही पांडुरंगाचे सावळे रूप चोखोबांनी कसे अनुभवले असेल? या प्रश्नाचे उत्तर ‘भावभक्ती’ होय. चोखोबांनी आपल्या मनात विठोबाची जी प्रतिमा निर्माण केली आणि तिचेच चिंतन केले तोच पांडुरंग मंदिरात उभा होता. संतसाहित्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा चोखोबांची वेदना सहजपणे आपल्या लक्षात येते.

संत प्रबोधन करत राहिले. या प्रबोधनाचे परिणाम दिसायला २०वे शतक उजाडले. प्रश्न फक्त मंदिर प्रवेशाचा किंवा दर्शनाचा नाही, प्रश्न समतेचा आहे, प्रश्न सन्मानाचा आहे. हे आधुनिक काळातील समाजधुरिणांच्या लक्षात आले. ‘पिंडी ब्रह्मांडी एकच तत्त्व’ असे जर आपण म्हणतो, तर मग हे भेद का? आणि कशासाठी? कुणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी, अज्ञानामुळे भेद उत्पन्न केले. माणसा माणसात भेद निर्माण करून समाजात अस्पृश्यतेच्या भिंती बांधल्या. या भिंती जमीनदोस्त करण्याची जबदरस्त मोहीम २०व्या शतकाच्या सुरुवातीस सुरू झाली. महाराष्ट्राचा विचार करायचा, तर १९१३ साली विदर्भातील गणपती उर्फ हरि महाराज यांनी आपले खासगी विठ्ठल मंदिर सर्वासाठी खुले केले. १९३०-३३ या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक, पुणे, अमरावती येथे मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह केला. याच काळात विनोबांनी पवनार परिसरात अनेक मंदिरे सर्वांसाठी खुली केली. विनोबा आणि सानेगुरुजी या दोघांचे सख्य होते. पंढरपुरात मंदिरप्रवेश सत्याग्रहाविषयी दोघांमध्ये चर्चा झाली होती.
या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे सानेगुरुजींनी केलेला मंदिर प्रवेशासाठीचा सत्याग्रह आणि उपोषण खूप महत्त्वाचे आहे. देशाचा स्वातंत्र्य सूर्य उदयमान होत असताना, साने गुरुजींनी पंढरपुरात मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला. या सत्याग्रहाआधी चिपळूण येथील चितळे कुटुंबीयांचे खासगी मालकी असलेले विरेश्वराचे मंदिर सहमतीने सर्वासाठी खुले केले होते. या प्रयोगाने साने गुरुजींचा आत्मविश्वास वाढला होता आणि महाराष्ट्राच्या हृदयात असणारा पांडुरंगही अस्पृश्य राहू नये, असे सानेगुरुजी वाटले. कारुण्यमूर्ती सानेगुरुजींनी पंढरपुरात मंदिरप्रवेशासाठी आंदोलन केले. दि. १ मे ते दि. १० मे, १९४७ या काळात पंढरपुरातील तनपुरे महाराजांच्या मठात सानेगुरुजींनी आमरण उपोषण सुरू केले. याकाळात महाराष्ट्रात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रात खूप मोठी उलथापालथ झाली. मंदिरातील बडव्यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, “मंदिरात हरिजनांना मुक्त प्रवेश देण्याविषयी विधेयक सरकारपुढे विचाराधीन असून, लवकरच हा कायदा होईल आणि कायद्याने प्रांतातील सर्वच मंदिरे हरिजनांना खुली होतील. परंतु, मला कायद्यापेक्षा लोकांच्या हृदयातील कायदा हवा आहे. जनतेच्या उचंबळलेल्या भावनांनी मंदिरे मोकळी करण्यात जी गोडी आहे, प्रेम आहे ते निराळेच आहे. सरकार आपले कर्तव्य कायदा करून पार पाडेल, पण मी मानवी मनामध्ये परिवर्तनाची क्रांती व्हावी म्हणून तहानलेला आहे. लोकांच्या मनोरचनेत बदल होईल, तेव्हाच कायद्याचा खरा उपयोग होईल. जनतेच्या हृदय मंदिरात प्रकाश पडावा म्हणून माझी ही अटाअटी आहे... पंढरपूरचे मंदिर शेवटी प्रतीक म्हणून माझ्यासमोर आहे. हे मंदिर महाराष्ट्राचे हृदय आहे. येथे प्रकाश आला, तर महाराष्ट्रभर येईल, ही माझी श्रद्धा आहे. म्हणून हृदयाला, मुळाशीच हात घातला आहे. या संकल्पासाठी गरज पडली, तर माझे देहार्पण होवो. आता मला शांतपणे देवाघरी जाऊ द्या. सर्वांनी प्रेमाचा निरोप द्यावा.” सानेगुरुजींच्या या निर्वाणीच्या पत्रात त्यांचा सामाजिक कळवळा आणि महाराष्ट्रात असणारे पंढरपूरचे स्थान अधोरेखित होते आहे.
सानेगुरुजींचे उपोषण, महात्मा गांधींनी पाठवलेली तार, पंढरपूरमधील काही व्यक्तींचा विरोध आणि शेवटी पंढरपूर मंदिरातील पंच कमिटीने मंदिर प्रवेशासाठी मान्यता, असा घटनाक्रम या दहा दिवसांत घडला. पंच कमिटीने मंदिर प्रवेशासाठी परवानगी दिली. सानेगुरुजींनी उपोषणाची सांगता केली. पंढरपूरकरांचे आभार मानून त्यांनी कोणताही गाजावाजा न करता पंढरपूर सोडले. चोखोबांची वेदना शमवण्यासाठी सानेगुरुजींनी जे यशस्वी प्रयत्न केले, त्याला आता ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लवकरच आपल्या देशाची राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. या घटनेने आपल्या समतेची, न्यायाची हमी दिली आहे. कायद्याने भेदभाव, अस्पृश्यता नष्ट झाली असली तरी आजही समाजात विविध प्रकारचे भेदभाव अनुभवास येतात. आजही मंदिरप्रवेशासाठी आंदोलन करावे लागते. ही आपली सामाजिक स्थिती आहे. समता आणायची, तर ती व्यवहारातूनच आणावी लागेल. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी दिशादर्शन केले आहे. ‘एक गाव एक पानवठा, एक स्मशान, एक मंदिर’ ही भूमिका प्रत्यक्षात आणणे म्हणजेच सानेगुरूजींच्या मंदिर प्रवेश सत्याग्रहाचे कृतीतूनच स्मरण करणे होय.
- रवींद्र गोळे