आद्य शंकराचार्य आणि मातृभक्तीचे ‘मातृपंचकम्’ स्तोत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2022   
Total Views |

Aadya Shankaracharya
 
 
 
जागतिक मातृदिन. आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रातिनिधिक दिवस. परवाच दि. ६ मे रोजी म्हणजेच वैशाख शुद्ध पंचमीला जगद्गुरू आद्य शंकराचार्यांची जयंती होती. मातृप्रेमाचे आदर्श उदाहरण म्हणजे आद्य शंकराचार्य आणि त्यांनी रचलेले ‘मातृपंचकम्’ हे स्तोत्र. मातृदिन आणि आद्य शंकराचार्यांची जयंती यांच्या औचित्याने आपण त्यांच्या स्तोत्रांतून मातृभक्ती या लेखातून जाणून घेऊ...
 
 
 
प्रस्थानत्रयीचे महान भाष्यकार, केवलाद्वैतवादाचे प्रवर्तक आणि जगद्गुरू वेदान्ती म्हणजे आद्य शंकराचार्य. त्यांचा जन्म केरळमधील पूर्णा/पेरियार नदीच्या काठावरील कालडी गावात कृष्णयजुर्वेदीय तैत्तिरीय शाखेच्या नंबुद्री ब्राह्मण कुळात झाला. त्यांच्या पित्याचे नाव शिवगुरू होते, तर माता आर्याम्बा (विशिष्टा/सती). आचार्य साक्षात् भगवान शंकराचा अवतार असल्याची समजूत आहे. आचार्यांच्या जीवनासंबंधी विश्वासार्ह माहिती देणारे ग्रंथ म्हणावे तसे उपलब्ध नाहीत. केवळ ३२ वर्षांच्या आयुष्यात प्रस्थानत्रयीवर परिपूर्ण भाष्ये, अनेकविध स्तोत्ररचना, भारतभर संचार करून चार दिशांना केलेली मठांची स्थापना यांसारख्या असाधारण कार्यामुळे आचार्य शंकराचार्य जगद्वंद्य ठरले, हे मात्र खरे! आद्य शंकराचार्य आणि त्यांच्या आईविषयीही काही कथा सांगितल्या जातात. कालडी ग्रामात राहणारे शिवगुरू आणि आर्याम्बा हे मोठे धार्मिक आणि सात्विक दाम्पत्य होते. त्यांच्या पुण्याईने त्यांना भगवान शंकर प्रसन्न झाले. तेव्हा आर्याम्बेने अपत्यप्राप्तीची इच्छा व्यक्त केली. तेव्हा श्रीशंकर म्हणाले, “अल्पायुषी पण विद्वान पुत्र हवा की, दीर्घायुषी पण मंदबुद्धी?”तेव्हा आर्याम्बेने अल्पायुषी पण विद्वान पुत्राची निवड केली. धर्माला ग्लानी आलेल्या काळात आद्य शंकराचार्यांचा जन्म म्हणजे तेजाची शलाकाच होती. आद्य शंकराचार्यांची विद्वत्ता ते एक-दोन वर्षांचे असल्यापासूनच दिसत होती. वेदपठण, ग्रंथमुखोद्गत करणे हे शंकराचार्यांसाठी बालक्रीडेसारखेच होते. ते तीन वर्षांचे असताना पितृछत्र हरपले आणि सर्व संसाराची जबाबदारी आर्याम्बेवर आली. आर्याम्बा गुरुपत्नीदेखील असल्याने शंकराचार्यांच्या वयाची काही बालकेही त्यांच्या घरी शिकण्याकरिता राहत होती. त्यांनी शंकराचार्यांना कसलीही कमी पडू दिली नाही.
 
 
  
आद्य शंकराचार्यांची मातृभक्तीही विलक्षण होती. आर्याम्बांना रोज सकाळी पाणी भरण्यासाठी दूर जावे लागे. त्यांचा हा त्रास सहन न होऊन आद्य शंकराचार्यांनी आपल्या तपसामर्थ्याने पूर्णा नदी वळवून आपल्या घरानजीक आणली. आजही कालडी गावात शंकराचार्यांच्या मठानजीक चंद्राकारात वळलेली पूर्णा नदी दिसते. आर्याम्बांना बाल शंकराशिवाय कोणाचाही आधार नव्हता. त्यामुळे तिने शंकाराचार्यांना संन्यास घेण्यास नकार दिला. मातृपरवानगीशिवाय संन्यास घेता येणार नसल्याने शंकराचार्य पेचात पडले. एकदा योगायोगाने ते पूर्णा नदीत स्नान करत असताना मगरीने त्यांचा पाय पकडला आणि ती त्यांना खोल पाण्यात नेऊ लागली. तेव्हा आर्याम्बा त्यांना वाचवण्यास असाहाय्य ठरत होत्या. तेव्हा शंकराचार्य म्हणाले,“जर तू मला संन्यास घेण्याची परवानगी दिली, तर ही मगर मला सोडेल.” केवळ पुत्र जीवंत राहावा यासाठी मातेने संन्यास घेण्यास परवानगी दिली. पण, तिच्या अंतिम क्षणी शंकराचार्यांनी हजर असावे, असे वचनही तिने घेतले. आद्य शंकराचार्य जेव्हा भारतभ्रमण करत होते, तेव्हा त्यांना अंतर्ज्ञानाने आई क्षेवटचे क्षण मोजत आहे, हे समजले. दिलेल्या वचनानुसार ते अंतिम क्षणी मातेजवळ होते. संन्याशाने हात लावलेल्या व्यक्तीचे अंतिम विधी आम्ही करणार नाही, असे तेथील लोकांनी सांगितल्यामुळे त्यांनी आपल्या मातेचे अंतिम विधी घरातल्या अंगणात स्वत: केले. तेव्हापासून केरळमध्ये नंबुद्री ब्राह्मण अंतिम संस्कार अंगणातच करतात.
 
 
 
आर्याम्बा जेव्हा अंतिम घटिका मोजत होत्या, तेव्हा आद्य शंकराचार्यांनी ‘मातृपंचकम्’ हे स्तोत्र लिहिले, असे म्हटले जाते. आईविषयीचे स्तोत्र म्हटल्यावर आई आणि देव यांची तुलना किंवा तिच्या दैवी स्थानाविषयीचे गुणगौरव असे सामान्यपणे वाटू शकते. परंतु, हे स्तोत्र वेगळे आहे. हे आईच्या वेदना, दु:ख, पुत्राची हतबलता व्यक्त करणारे आहे. ‘मातृपंचकम्’चे सौंदर्य असे आहे की, येथे शंकराचार्य आपल्या आईची तुलना, तिची स्तुती करत नाहीत, त्याऐवजी ते त्यांची आई असलेल्या बाईबद्दल शोक व्यक्त करतात आणि कर्तव्य करू शकत नसल्यामुळे त्यांची विवेकबुद्धी त्याला कशी टोचत आहे, हे दर्शवितात. स्कंदपुराणात म्हटले आहे की, ज्याची सर्व आराधना करतात, अशा तपस्वीनेही त्याच्या आईची पूजा करावी. ‘सर्व वन्द्येन प्रयत्नना प्रसूर्वन्द्यातः।’ व्यक्ती सर्व बंध तोडू शकते, पण आईसोबतचे बंध कधीच तुटत नाही. आद्य शंकराचार्य तरी याला अपवाद कसे असतील?
ते ‘मातृपंचकम्’मध्ये म्हणतात -
 
 
आस्तां तावदियां
प्रसूतिसमये दुर्वारशूलव्यथा
नैरुच्यं तनुशोषणं मलमयी
शय्या च संवत्सरी।
एकस्यापि न गर्भभारणक्लेशस्य हे सक्षमः
दातुं निष्कृतीमुन्नतोस्पि
तनयः तस्य जनन्यै नमः।
 
 
आई, मी जन्माला आलो तेव्हा मला झालेल्या प्रचंड वेदना तू सहन केल्या. जन्माला आल्यानंतर, वर्षभर माझ्याकडून घाणेरडे झालेल्या अंथरूणावर तू माझ्यासह झोपलीस. तुझे शरीर कृश आणि वेदनादायक झाले. नऊ महिन्यांत तू मला जन्माला घातलेस आणि या सर्वांच्या बदल्यात, हे प्रिय आई, मी मोठा झाल्यानंतरही काहीही करू शकत नाही किंवा त्याची भरपाई करू शकत नाही.
 
 
गुरुकुलमुपसृत्य स्वप्नकाले तु दृष्ट्वा
कशेमुचितवेषं प्रारुदो मां त्वमुच्चैः।
गुरुकुलमथ सर्वं प्ररुदत्ते समक्षं
सपदि चरणयोस्ते मातरस्तु प्रणामः।
 
 
तुला मला माझ्या गुरुकुलातील संन्यासी पोशाखात पाहून तू रडलीस आणि धावत आलीस. तू मला मिठी मारलीस आणि माया केलीस. तुझी तळमळ मला समजत होती. आई, तुम्ही सर्व गुरू आणि विद्यार्थीही रडले, पण तुझ्या पाया पडून नमस्कार करण्याशिवाय मी काय करू शकलो?
 
 
न दत्तं मातस्ते मरणसमये तोयमपि वा
स्वधा वा नो दया मरणदिवसे श्राद्धविधिना।
न जप्तो मातस्ते मरणसमये तारकमनुः
अकाले सम्प्राप्ते मयि कुरु दयां मातरतुलाम्।
 
 
तुझ्या मृत्यूच्या वेळी मी तुला पाणी दिले नाही. तुझ्या मृत्यूच्या प्रवासात तुला मदत करण्यासाठी मी तुला काही अर्पणही केले नाही. मी तुझ्या कानात तारकनामाचा (रामनाम) जप केला नाही. हे परममाते, कृपा करून माझ्या या दोषांसाठी मला क्षमा कर. मी तुझ्या भेटीसाठी इथे उशिरा आलो आहे.
 
 
मुक्तामणिस्त्वं नयनं ममेति
राजेति जीवेति चिरं सुत त्वम् ।
इत्युक्तवत्यास्तव वाचि मातः
ददाम् हे तण्डुलमेष शुष्कम्।
 
 
माझं आयुष्य, माझे रत्न आणि मोती, कुलदीपका, अरे माझ्या प्राणा, अरे माझ्या प्रियतमा, अशा अनेक प्रेमळ उपाधींनी तू मला बोलावलेस. पण, त्या बदल्यात, हे प्रिय आई, मी तुझ्या तोंडात शेवटी फक्त कोरडा भात देतो आहे.
 
 
अम्बेति तातेति शिवेति तस्मिन् 
प्रसूतिकाले यदवोच्च उच्चैः।
कृष्णेति गोविंद हरे मुकुंदे-
त्याहो जनन्य रचितोसयमञ्जलिः।
 
 
हे आई, कठोर प्रसूतीच्या वेळी, तू दुःखाने ओरडून ओरडलीस, आई गं, हे पिता, हे भगवान शिवा, कृष्णा, गोविंदा, हरी आणि मुकुंदा... तुला असह्य वेदना झाल्या, पण त्या बदल्यात प्रिय आई, मी फक्त माझे विनम्र अभिवादन करू शकतो आणि केवळ तुला साष्टांग नमस्कार करू शकतो...
 
 
 
आद्य शंकराचार्यांनी रचलेले हे ‘मातृपंचकम्’ हे खरंतर हतबल पुत्र आणि आईच्या भावना व्यक्त करणारे काव्य आहे. हे स्तोत्र आईची महिमा वर्णन करते. हे स्तोत्र त्यांनी रचले होते, जेव्हा त्यांची आई, आर्याम्बा मृत्युशय्येवर होती. यातील प्रत्येक श्लोक आणि स्पष्टीकरण, ज्यामध्ये आद्य शंकराचार्यांनी आईच्या महानतेचा आणि तिच्या अतुलनीय प्रेमाचा आणि आपुलकीचा गौरव केला आहे. काही शंकराचार्य आईला एकटे सोडून गेले, ते तत्त्वज्ञानी असल्याने त्यांना भावना कशा समजणार असे निरर्थक प्रश्न उपस्थित करतात. पण, या प्रश्नांना उत्तर म्हणजे ‘मातृपंचकम्.’ आईला झालेला त्रास, वेदना शंकराचार्य जाणत होते. जगद्गुरू होताना अंतिम क्षणी दर्शनाचे दिलेले वचन आदर्श पुत्रवत त्यांनी पाळले.
 
 
 
खरंतर आद्य शंकराचार्यांची स्तोत्रे पाहिली, तर त्यांनी लिहिलेली देवी स्तोत्रे ही आईशी संवाद साधणारीच स्तोत्रे वाटतात. देवीस्तोत्रांमधील देव्यपराधक्षमापनस्तोत्रातील एक पद प्रसिद्ध आहे. ‘कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।’ एकवेळ वाईट मुलगा जन्माला येऊ शकतो, पण वाईट आई कधीच नसते. आद्य शंकराचार्यांनी देवीने केलेले भक्ताचे पालनपोषण, संवर्धन याला आई-मुलाचीच उपमा देतात. देवीची स्तुती करताना ते तिच्यातील मातृत्वभावनेची स्तुती करतात. ते म्हणतात-
 
 
जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता
न वा दत्तं देविद्रविणमयि भूयस्तव मया।
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि
कुमाता न भवति॥
 
 
मी कधीच तुझी चरणसेवा केली नाही, तुला प्रिय असणार्‍या गोष्टीही कधी तुला दिल्या नाही. तरीही तू माझ्यावर नितांत प्रेम करतेस. कारण, वाईट मुलगा जन्माला येऊ शकतो, आई कधीही वाईट असू शकत नाही.
 
 
त्यांनी रचलेले अन्नपूर्णा स्तोत्र असू दे वा आनन्दलहरी वा दक्षिणामूर्ती स्तोत्र. स्तोत्र जरी देवीचे असले तरी तिच्या सामर्थ्याचे वर्णन करताना ते तिच्यातील मातृत्वाचेही वर्णन करतात. अन्नपूर्णा स्तोत्राच्या शेवटी ते म्हणतात -‘माता पार्वती देवी, पिता देवो महेश्वर:।’ आई ही जगद्कल्याणी पार्वती देवी आणि पिता भगवान शंकर आहेत.’
 
 
भावकोमलविद्वता असणारे आद्य शंकराचार्य. आस्तिक-नास्तिक तत्त्वज्ञानाचे खंडण-मंडण करणारे शंकराचार्य. पण, आई आणि मातृत्व या हळव्या विषयांवर तेही तेवढेच भावनिक असल्याचे दिसते. आद्य शंकराचार्यांनी मांडलेले मातृत्व आजच्या पिढीने जाणले, तरी मातृदिन आणि आद्य शंकराचार्यांना अभिवादन करणारे ठरेल...
 
श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयम् । 
नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरम् ॥
 
 
- वसुमती करंदीकर
 
 
@@AUTHORINFO_V1@@