रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर तीन दिवसांपूर्वीच ईडीने कारवाई करत काही कागदपत्रे ताब्यात घेतले होते. मुंबईसह पुणे आणि मुरुड येथेही ईडीने धाडी टाकल्या होत्या. यानंतर पुन्हा एकदा शुक्रवारी ईडीचे पथक दापोलीत दुसऱ्यांदा पोहोचले आहे. यावेळी ईडीने मुरुड ग्रामपंचायतीकडून साई रिसॉर्टची कागदपत्र ताब्यात घेतली आहेत.
ईडीच्या पथकाने मुरुड ग्रामपंचायतीमध्ये जाऊन घेतल्या कागदोपत्री अधिकृत नक्कला आणि इतर काही महत्वाची कागदपत्रं ही ताब्यात घेतली आहेत. रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित मालममत्तांची चौकशी आता ईडीकडून कसून सुरू आहे. गुरुवारी ईडीचे पथक मुरुड येथे दाखल झाले, त्यावेळी त्यांनी जाऊन पाहणी केली. रितसर अर्ज करुन मुरुड ग्रामपंचायत कार्यलयात जाऊन ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती शुक्रवारी दुपारी घेतली आहे. यामध्ये एसीसमेंट उतारा,आकारणी आदी कागदपत्रे यांचा समावेश आहे.
आता या रिसॉर्टची कागदपत्रेही ईडीच्या तब्यात आल्याने आता अनिल परबांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पण या रिसॉर्टशी आपला कोणताही सबंध नाही, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. तर अनिल परबांचे हे रिसॉर्ट आहे, आणि ते अनाधिकृत आहे. त्यामुळे हे रिसॉर्ट पाडले पाहिजे अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वारंवार केली आहे. तसेच या घोटाळ्याची सीबीआय चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.