मुंबई : “महाविकास आघाडीचे (मविआ) मंत्री दावोसला केवळ भारतीय कंपन्यांशी करार करण्याकरिता गेले होते का, अथवा दावोस दौर्यामध्ये अन्य किती कंपन्यांशी करार केला, याची माहिती त्यांनी जनतेला द्यावी. तसेच, केवळ दोन भारतीय कंपन्यांशी करार केले असल्यास या दौर्याचा संपूर्ण खर्च हा या सर्व मंत्र्यांकडून वसूल करण्यात यावा,” अशी मागणी भाजपचे मुंबई प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केली.
दावोसला जाण्याची आवश्यकता काय?
“मविआ सरकारचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, त्याचबरोबर ऊर्जामंत्री नितीन राऊत व उद्योगमंत्री सुभाष देसाई हे सर्वजण दावोसला जाऊन भारतीय कंपन्यांबरोबर करार करून परत आले. यावेळी त्यांनी गुरगावातील कंपनीबरोबर हजारो कोटींचे करार केले, तर दुसरी शैक्षणिक कंपनी ‘बायजूस’ ज्याच्याबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या शाळांकरिता सामंजस्य करार केला गेला. जर परदेशात जाऊन भारतीय कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करायचे होते, तर त्याच्याकरिता जनतेच्या पैशाचा चुराडा करून दावोसला जाण्याची आवश्यकता काय होती,” असा सवाल आ. भातखळकर यांनी यावेळी उपस्थित केला. नाव दावोसला जाण्याचे, मात्र ‘जनतेच्या पैशावर सैर करण्याचे’, हे उद्योग असल्याची टीका आ. भातखळकर यांनी केली. त्यामुळे दावोसला जाऊन अन्य किती कंपन्यांशी करार केले, याची माहिती जनतेला द्यावी आणि या दोन कंपन्यांशी करार केले असतील, तर दावोसच्या दौर्यावर जनतेच्या पैशातून जो खर्च झालेला आहे, तो सर्व खर्च जनतेला परत देण्यात यावा. तसेच, हे पैसे तिन्ही मंत्र्यांकडून वसूल करण्यात यावेत,” अशी मागणीही आ. अतुल भातखळकर यांनी यावेळी केली.
महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात करण्याचे काम
”जे महाराष्ट्राच्या छत्रपतींशी खोटे बोलू शकतात, असे मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी तर सहजतेने खोटे बोलू शकतात. त्यामुळे, बंद दरवाजाआड वचन दिले होते, हे खोटे कोण बोलत आहे, हे आज महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे उमगले आहे,” अशी बोचरी टीका भाजपचे मुंबई प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केली. तसेच, कुठल्याही मुख्यमंत्रिपदाचे वचन हे त्यांना दिले गेले नव्हते. परंतु, केवळ सत्तेच्या लालसेपायी स्वतः मुख्यमंत्री व्हायचे आणि स्वतःच्या मुलाला कॅबिनेटमंत्री करायचे, म्हणून हिंदुत्व, मराठी बाणा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात करण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. हेच आजच्या छत्रपती संभाजीराजेंच्या विधानांवरून सिद्ध झालेले आहे,” असे म्हणत आ. भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.