‘प्रतिभा’वंत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2022   
Total Views |

Bhide



किशोरवयात गावच्या धार्मिक उत्सवात हौस म्हणून नाटिका, एकांकिका लिहून प्रतिभावंत लेखिका बनलेल्या प्रतिभा जयंत भिडे यांच्याविषयी...

कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे या निसर्गरम्य गावी जन्मलेल्या प्रतिभा भिडे या पूर्वाश्रमीच्या प्रतिभा यशवंत घाणेकर. त्यांचे कुटुंब तसे अतिसामान्य. त्यांच्या गावचा परिसर दुर्गम असला तरी तिन्ही बाजूंनी डोंगर, खाली नदी, तर एका बाजूला सह्याद्रीची पर्वतराजी अशी निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या वनराईत त्यांचे कौलारू घर. निसर्गदेवतेने बालपणीच त्यांच्या मनावर आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवण्यास सुरुवात केली होती.

गावी तेव्हा चौथीपर्यंतच एकशिक्षकी शाळा होती. घरात पाचभावंडे. त्यामुळे प्रत्येकाच्या शिक्षणाचा प्रश्न असल्याने आई-वडिलांनी ते राहते घर, गाव सोडून देवरुखला तालुक्याच्या ठिकाणी शाळेत घातले. त्यामुळे, प्रतिभा यांच्यासह पाचही भावंडांचे उर्वरित पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. बालपणीचा पट प्रतिभाताईंनी उलगडला. गावी त्या राहत असलेल्या ठिकाणी गणपती आणि रघुपती, अशी दोन पुरातन मंदिरांच्या देवस्थानांच्या उत्सवात बच्चे कंपनीचे मनोरंजनात्मक विविध कार्यक्रम सादर केले जायचे.

त्या कार्यक्रमात आठवी-नववीत असताना स्वतः लिहिलेल्या एकांकिका नाटिका त्यांनी सादर केल्या. त्यामुळे लहानपणीच जडलेला लेखनाचा छंद त्यांनी आजपर्यंत जोपासला आहे. प्रतिभा यांचे आयुष्य खूपच खडतर परिस्थितीतून गेले. त्यांचे वडील शिवणकाम करत असल्याने त्यांनी देवरुखातच शिवणकामाचे दुकान थाटले आणि त्या दुकानावर सर्वांचे पालन-पोषण आणि उच्चशिक्षण झाले. प्रतिभा यांच्या घरातील पाचही भावंडे साहित्य क्षेत्रात व्यस्त आहेत. चारजण लिखाण करतात, तर एक भाऊ समीक्षा करतो.

प्रतिभा यांच्या लिखाणात सर्वात मोठा वाटा आहे तो आई-वडिलांकडून झालेल्या संस्कारांचा. त्यांच्या मेहनतीचा, त्यांच्या प्रामाणिकपणाचा. त्यांची आध्यात्मिक बैठक, भजन-कीर्तन तसेच श्रावणात महिनाभर ग्रंथवाचन आम्ही लहानपणापासूनच ऐकत आलोत. त्याच संस्कारांचा कुठेतरी परिणाम मनावर खोलवर रुजला आणि शब्दसंग्रह आपोआपच वाढत गेल्याचे त्या सांगतात. मनातली खळबळ शांत करण्यासाठी, मनात साचलेल्या खळखळीला बाहेर काढण्यासाठी एक वही आणि पेन खूप जवळचे वाटतात. मग सवयीने चांगले-वाईट जे जे मनात येईल, डोळ्यांना दिसेल, कानावर पडेल ते सारे वहीत व्यक्त होत राहते आणि आपण लिखाण कधी करायला लागलो ते आपल्यालाही कळत नाही, अशा तर्‍हेने लिखाणाची सुरुवात झाल्याचे त्या सांगतात.


घरात संस्कृत ग्रंथ, स्तोत्रपठण, भजन, प्रवचनाचा माहोल असल्याने शब्दांचे ऐश्वर्य मुळात होतेच. भावविवश मन होते. त्यामुळे कविता, लेखन हा एक जिव्हाळ्याचा छंद जडला त्यांची पहिली आवड कविता, लेखन झाली. त्यातून त्यांनी मावळते चांदणे, विभ्रम, अलवार क्षण, संधीप्रकाशाची रेघ आणि बालकवितासंग्रह ’फूल पाखरे आम्ही सारे,’ असे एकूण पाच कवितासंग्रह लिहिले आहेत.
लिखाण करणे हेच त्यांच्या आयुष्याचे व्यक्त होण्याचे साधन झाले. पदवी शिक्षणासाठी त्यांनी समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेतल्याने समाजाचा सर्वांगीण अभ्यास करायला मिळाला. काव्यलेखनाबरोबर त्या गद्य लेखन करू लागल्या. ‘ओंबील’ हा ललित लेखसंग्रह लिहिला. शास्त्रीय संगीत ऐकण्याची आवड असल्याने त्या संगीत नाटके बघायला जात. पंडित राम मराठे यांचं ‘जय जय गौरीशंकर’ हे नाटक बघून, तर त्या खूप प्रभावित झाल्या. असं एखादं नाटक आपण लिहायचं असं मनात पक्कं करून सुमारे १९-२० वर्षांनी ‘संगीत शिवलीला’ हे पौराणिक संगीत नाटक त्यांनी लिहिले.
त्याला ‘कोमसाप’चा नाट्यलेखनाचा पुरस्कार, ‘कोकण ग्राम विकास मंडळा’चा ‘यमुनाबाई बाजी राणे’ सर्वोत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कार असे दोन पुरस्कार मिळाले. तसेच,‘नो किड्स नो किचन’ हे एक सामाजिक नाटक लिहिले. त्याला ‘प्रतिलिपी डॉट कॉम’चातसेच, ‘वंडर सेव्हन पब्लिकेशन’चा उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कारही मिळाला. ‘आता मला बोलू द्या’ आणि ‘अब चार हो जाय’ या दोन एकांकिकांनाही नाशिकच्या ‘समिज्ञा फाऊंडेशन’चा कुसुमाग्रज एकांकिका लेखनाचा पुरस्कार मिळाला, अशी त्यांची दहा पुस्तके प्रकाशित झालीत. त्याशिवाय अनेक गीते ‘युट्यूब’वर आहेत.

१९९१ साली त्यांचा विवाह झाला आणि त्या ठाणेकर बनल्या. ठाण्यात परिस्थितीच्या दुष्टचक्रात अडकल्याने १२-१३ वर्षे लिखाण थांबले. पण, २००३-२००४ पासून पुन्हा नव्या उमेदीने लिखाण करू लागल्या. अनेक दिवाळी अंक, मासिके, वर्तमानपत्रांत लेख, कथा, कविता असे लेखन त्या करतात. आपण ज्या समाजात वाढलो, त्या समाजाप्रती आपण काहीतरी केले पाहिजे, असे संस्कार असल्याने प्रतिभा व त्यांची भावंडे गावच्या गरीब, शाळेत जाऊ इच्छिणार्‍या पण परिस्थिती नसलेल्या दहा मुलांचा शैक्षणिक खर्च करत आहेत.

त्यांना अगणित पुरस्कार मिळाले असून ‘कर्तव्यम् प्रेरणा २०२२’ हा मानाचा पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना देण्यात आला. सध्या त्या ‘नॅचरोपॅथी’ आणि योगाची तृतीय वर्षाची परीक्षा देत आहेत. तसेच, एक कादंबरी, एक नाटक आणि एक कवितासंग्रहाचेही लिखाण सुरू आहे. आई-वडिलांचे संस्कार भावंडांचे सहकार्य तसेच, कुटुंबाकडून बळ मिळत गेल्याने यशाची शिखरे पादाक्रांत केली. तसेच असंख्य चाहत्यांच्या शुभेच्छांच्या जीवावर अजून खूप मोठा पल्ला गाठायचा असल्याची आकांक्षा त्यांनी मनी बाळगली आहे, अशा महत्त्वाकांक्षी प्रतिभावंत लेखिकेला भावी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!


@@AUTHORINFO_V1@@