उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय, मंत्री अनिल परबांवर ईडीची धाड!
26-May-2022
Total Views |
मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे मातोश्रीच्या सर्वात जवळचे नेते अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीने धाडसत्र सुरू केले आहे. अनिल देशमुख यांच्या शंभर कोटी वसुली प्रकरणात परबांचेही नाव उघड झाले होते. त्यातच पोलीसांच्या बदल्यांमध्ये झालेल्या गैरव्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय ईडीला आहे. त्याच प्रकरणात गुरुवार दि. २६ मे रोजी सकाळी ६.३० वाजल्यापासून ईडीने कारवाई सुरू केली आहे.
मुंबई आणि कोकण विभागातील पोलीसांच्या बदल्या शिवसेनेच्या गोटातून झाल्याचा आरोप सीबीआयने केला होता. याच प्रकरणात तथ्य आढळ्यानंतर ईडीनेही याची चौकशी सुरू केली आहे. ईडीने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये अनिल परबांचे नाव होते. मात्र, अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. यापूर्वी सचिन वाझे प्रकरणात अनिल परबांचे नाव उघडकीस आले होते. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबद्दलही परबांवर आहे. कंत्राटदारांकडून वसुलीसाठी सचिन वाझेला परबांनी काम दिल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.
या सर्वच प्रकरणात कुठले पुरावे आढळत आहेत का, अन्य कुठले धागेदोरे आढळतात का याबद्दलचा तपास आता ईडी घेत आहे. या प्रकरणी प्रार्थमिक तक्रार ईडी नोंदविणार आहे. त्यानुसार आता ही कारवाई सुरू असल्याचे समजते. अनिल परब हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जातात. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही अनिल परबांच्या दापोलीतील रिसॉर्टबद्दल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार केली होती. बेकायदा रिसॉर्ट प्रकरणात त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचा दावा सोमय्यांनी केला होता.
काही दिवसांपूर्वी परबांशी नजीक असलेल्या काही व्यक्तींवर आयकरने कारवाई केली होती. त्यात छापेमारीत अनेक पुरावे उघड झाल्याचे बोलले जात आहे. परबांचे शासकीय निवासस्थान शिवालयसह अन्य सात ठिकाणी मनी लाँड्रींग प्रकरणी ईडीने छापे टाकले आहेत. सकाळी ६.३० वाजता शिवालयवर ईडीचे पथक पोहोचले होते. अद्याप या प्रकरणात ईडीतर्फे कुठल्याही प्रकारची माहिती याबद्दल दिलेली नाही.
सचिन वाझेने शंभर कोटी वसुली प्रकरण, पोलीस बदली प्रकरण यात परबांचे नाव आले होते. लॉकडाऊनमध्ये असताना दापोली २०२०-२१ मध्ये बेकायदा रिसॉर्ट बांधले होते. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दापोली न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता. अनिल परबांचा सहकारी संजय कदम यांच्या घरी आयकर धाड पडल्यावर सव्वा तीन कोटींची रोकड आढळली होती. या सगळ्याचे परिवर्तन म्हणून आता ईडी अॅक्शनमोडमध्ये आली आहे, अशी प्रतिक्रीया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.