‘कोविड’ काळात राज्य सरकारकडून उद्योजक उपेक्षित : देवेंद्र फडणवीस

भाजप उद्योग आघाडी परिषद संपन्न

    26-May-2022
Total Views |

DF
 
 
 
 
 
 
मुंबई : “आत्मनिर्भर ‘पॅकेज’ पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाला दिले. घोषित केलेले पॅकेज प्रत्यक्षात अंमलात आणणे, हे पंतप्रधानांचे ध्येय होते. या ‘कोविड’ काळात उद्योगांना अतिरिक्त कर्ज मिळावे, यासाठीही त्यांनी विशेष उपाययोजना केली होती व याचा महाराष्ट्रातील उद्योगांना मोठा फायदा झाला. परंतु, या राज्यातील सरकारकडून उद्योजक, व्यापारी, १२ बलुतेदार यांना एका नव्या पैश्याची ‘कोविड’ काळात यांनी मदत केली नाही,” असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
 
 
 
भाजपच्यावतीनेउद्योग आघाडीच्या सर्व पदाधिकार्‍यांचा एकदिवसीय प्रशिक्षण वर्ग तथा उद्योग परिषद भाजप कार्यालय, वसंत स्मृती दादर येथे नुकताच आयोजित केला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील, संघटनमंत्री श्रीकांत भारतीय, उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार, उद्योजक श्रीराम दांडेकर, प्रदेश उपाध्यक्ष तथा उद्योग आघाडी प्रभारी राज पुरोहित, सरचिटणीस सुधीर धुत्तेकर, विश्वजित देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. “राज्याच्या विकासासाठी औद्योगिक क्षेत्रात भाजप कायम साथ देईल,” असे प्रतिपादनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
 
 
 
“भाजप उद्योग आघाडी पदाधिकारी यांनी विविध स्तरावर प्रयत्न करत, औद्योगिक क्षेत्रात जोडले जाणारे सर्व वेंडर, कामगार आदी सर्वांना पक्ष विचारधारेत जोडून घ्यावे,” असे चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच, उद्योग आघाडीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे गिरीधर मंत्री यांनी प्रास्ताविक केले.