नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जपानमधील टोकियो येथे दुसर्या ’क्वाड’ सदस्य राष्ट्रनेत्यांच्या शिखर परिषदेत जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासह भाग घेतला.
मुक्त, खुले आणि सर्वसमावेशक हिंद-प्रशांत क्षेत्र आणि सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता कायम ठेवून वादविवादांचे शांततापूर्ण निराकरण करण्याच्या निर्धाराचा नेत्यांनी या बैठकीत पुनरुच्चार केला. हिंद-प्रशांत क्षेत्रातल्या विकासाच्या शक्यता, संधी आणि युरोपमधील संघर्ष या विषयावर नेत्यांनी विचार-विनिमय केला. शत्रुत्व मिटवणे, संवादाला पुन्हा आरंभ करणे आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून संघर्ष सोडवणे या भारताच्या सुसंगत आणि तत्त्वनिष्ठ भूमिकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले. ’क्वाड’ राष्ट्रांमध्ये सध्या सुरू असलेल्या सहकार्याचा आणि भविष्याबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनाचाही या नेत्यांनी आढावा घेतला. दहशतवादाचा नायनाट करणे, पुरस्कृत दहशतवादाचा निषेध करणे, दहशतवादी गटांना दहशतवादी हल्ले किंवा सीमापार हल्ल्यांना साहाय्य होईल, अशाप्रकारचा शस्त्रास्त्र पुरवठा, आर्थिक किंवा लष्करी साहाय्य्य न करण्याच्या प्रतिबद्धतेवर यावेळी भर देण्यात आला.
कोरोना महामारीच्या काळात ‘क्वाड’ गटाच्या सदस्य देशांमधील परस्पर सहकार्याचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. ते म्हणाले की, महामारीदरम्यान अडचणी असतानाही, लस वितरण, आपत्ती व्यवस्थापन आणि आर्थिक सहकार्याव्यतिरिक्त अनेक क्षेत्रांमध्ये सदस्य देशांमधील परस्पर सहकार्याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. यामुळे हिंद-प्रशांत महासागर शांतता, सौहार्द आणि स्थिरतादेखील सुनिश्चित झाली आहे,” असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी ‘क्वाड फेलोशिप’ कार्यक्रमासही प्रारंभ केला.
पंतप्रधान मोदी-राष्ट्राध्यक्ष बायडन भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा पार पडली. भारत-अमेरिका यांच्या द्विपक्षीय अजेंड्यात संरक्षण आणि सुरक्षा विषयक सहकार्याला विशेष स्थान असल्याचे दोन्ही नेत्यांनी नमूद केले. अमेरिकी उद्योगांनी भारतात उत्पादनक्षेत्रात भागीदारी करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने कोरोना महामारीचा यशस्वी सामना केल्याचे मत बायडन यांनी व्यक्त केले. त्याचवेळी कोरोना व्यवस्थापनामध्ये चीन अपयशी ठरल्याचेही बायडन यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.