पुणे : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे कोणा कोणाचे भागीदार ( पार्टनर) आहेत असा सवाल करून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी, मुंबईत अतिरेकी कसाब कडून हल्ला झाला तेव्हा पोलिसांना जे निकृष्ट दर्जाचे बुलेट प्रुफ जॅकेट ज्या कंपनीने पुरविले होते, त्या कंपनीचे विमल अग्रवाल यांच्याशी ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर, यशवंत जाधव यांचे संबंध असल्याने या दोघांच्या व्यवसायात भागीदारी असणारे मुख्यमंत्री उद्घव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीयांची भागीदारी देश विघातक शक्ती पर्यंत पोहचली असल्याचा खळबळजनक आरोप आज मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
येथील भाजप कार्यालयात बोलताना सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी १००० कोटींची माया जमविण्याचा आरोप करून जाधव, पाटणकर आणि विमल अग्रवाल यांच्या विरोधात आपण कंपनी मंत्रालय, इडी तसेच आयकर विभागाकडे कारवाईची मागणी केली त्यांच्या व्यावसायिक संबंधांची चौकशीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. बोगस बुलेट पृफ जॅकेट प्रकरणात तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या विमल अगरवाल यांच्या सोबत यतीन यशवंत जाधव यांनी व्यवसायात भागीदारी केली.
ज्या विमल अग्रवाल ने बोगस जॅकेट पोलिसांना पुरविले त्यामुळे पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांना अतिरेकी कसाब ने केलेल्या अतिरेकी हलल्याचे वेळी आपले प्राण गमवावे लागले होते. भ्रष्टाचारासाठी पोलिसांच्या जीवाशी खेळणाऱ्या याच विमल अग्रवालच्या समर्थ इरेक्तर्स अँड डेव्ह. कंपनीने अलीकडच्या काळात बद्री इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. कडून ८० कोटींची मालमत्ता मलबार हिल येथे विकत घेतल्याचे सोमय्या यांनी सांगितले.या समर्थ चे ठाकरे यांचे मेहुणे पाटणकर यांच्याशी आर्थिक संबंध आहेत.त्यांनी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन टीडीआर चे व्यवहार केल्याची माहिती त्यांनी दिली.
त्यामुळे आता उध्दव ठाकरे यांनी तुमची भागीदारी कोणा कोणा सोबत आहे हे जाहीर करा असे सोमय्या यावेळी म्हणाले. एकीकडे शरद पवारांच्या नवाब मलिकांचे दाऊद सोबत कनेक्शन पुढे आले आणि ठाकरे हे थेट अतिरेकी कसाब प्रकरणात गोवल्या गेलेल्या आरोपी सोबत असलेल्या भगिदाराशी जोडले जात आहेत असेही त्यांनी नमूद केले.
अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडणार
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोली येथील अनधिकृत रिसॉर्ट लवकरच जमीनदोस्त होणार असल्याची माहिती सोमय्या यांनी या पत्रकार परिषदेत दिली.२५ कोटींचा हा रिसॉर्ट आठवडाभरात पाडला जाईल असे त्यांनी सांगितले. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने याबाबत ९० दिवसांची नोटीस दिली होती,त्यामुळे ही मुदत आता संपल्याने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना याबत कारवाई करावी लागेल असे ते म्हणाले.
हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई सुरू होणार
राज्याच्या मंत्रिमंडळात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी ४० हजार शेतकऱ्यांच्या नावाने ३१लाख ९३ हजार १०० रुपये जमा केले असून हे पैसे नियम डावलून जमां केल्याने या प्रकरणात आणि १५८ कोटी रुपयांच्या मनी लॉड्रिंग प्रकरणात हो कारवाई होत असल्याचे सोमय्या यावेळी म्हणाले. त्यांच्या दोन संस्थांना दिलेल्या नोटीस ची मुदत संपल्याने ही कारवाई केली जाणार आहे.मुश्रीफ यांना पाठीशी घालणाऱ्या शरद पवार यांच्यावर देखील सोमय्यानी यावेळी टीका केली.