पुणे : अतिरेकी संघटनांना निधी पुरविणे (टेरर फंडिंग) च्या प्रकरणात संशयित असलेल्या जुनेद मोहम्मद या तरुणाच्या एटीएसच्या पथकाने येथील दापोडी परिसरातून मुसक्या आवळल्या असून त्यास न्यायालयाने ३ जून पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हा तरुण अतिरेकी संघटनांच्या संपर्कात असल्याच्या आणि त्याच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचला आणि दापोडीतील त्याच्याबाबत सोमवार ( दि.२३) पासूनच चौकशी सुरू केली होती, मध्यरात्री त्याच्या मुसक्या आवळल्यावर आज मंगळवार (दि.२४) ला जुनेद यास येथील विशेष न्यायालयापुढे एटीएसने हजर केले आणि त्याची कोठडी मिळवली.
विशेष म्हणजे पुण्यात एटीएसची अशा प्रकरणातील दुसरी कारवाई आहे. फेब्रुवारी २०१९ उत्तर प्रदेशातील एका तरुणास अटक करण्यात आली होती. आजच्या एटीएस च्या कारवाईत मिळालेल्या माहितीनुसार, जुनेद मोहम्मद हा काश्मीरमधील गझवाते अल हिंद आणि लष्कर ए ताईबा या अतिरेकी संघटनांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती. महिन्याभरापूर्वीच त्याच्या बँक खात्यात पैसे जमा झाले होते.तो फेसबुकवरून तिघांच्या संपर्कात होता.मागील दोन वर्षात त्याने काश्मीरला ६ वेळा जाऊन तेथील अतिरेकी संघटनेत असलेल्या लोकांशी संपर्क साधला होता.
त्याच्या खात्यात जमा रकमेचा त्याने कसा विनियोग केला,स्थानिक कोणाच्या संपर्कात तो होता, तरुणांना अतिरेकी कारवाया करण्यासाठी त्याने प्रयत्न केले होते का याबाबत आता एटीएस त्याच्या चौकशीतून उलगडा करणार आहे .तो लष्कर ए ताईबाच्या आफताब शाह आणि उमर नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होता.या दोघांकडून त्याच्या खात्यात पैसे जमा झाले होते.
कोण आणि कुठला हा जुनेद?
पुण्याच्या दापोडी भागातून अटक केलेला आणि अतिरेकी कारवायांत सहभागी असल्याचा संशय असलेला जुनेद मोहम्मद हा मूळचा विदर्भातील असल्याची माहिती आहे. तो बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील रहिवासी असून गेल्या दीड वर्षापासून तो येथे राहायला आला होता. मदरशात त्याचे शिक्षण झाले.