मुंबई : “ही मुंबई कोळ्यांची आहे. कोळ्यांनाच पाहिजे. जो झाड कापतोय, त्याला तुम्ही पर्यावरणमंत्रिपद देतात. पर्यावरणमंत्र्याला झाडे लावायची माहिती आहे का? मुंबईचे संरक्षण करायचे सोडून अभ्यास नसणारा मंत्री येतो अन् खुर्चीवर बसतो. सगळी मुंबई विकून झाली. आता यांची नजर आमच्या कोळीवाड्यावर आणि बाजारांवर आहे. मात्र, ही मुंबई या कोळ्यांची आहे. आमच्या प्रश्नांकडे लक्ष द्या, अन्यथा चार-पाच हजार नाही, २०-२५ हजार कोळी महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करतील,” असा इशारा वर्सोव्यातील कोळी महिलांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना ठाकरे सरकार आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना दिला.
वर्सोव्यातील डोंगरी गल्ली येथील विस्तीर्ण किनार्यावर सर्वत्र गाळ आणि घाणीचे साम्राज्य झाले आहे. मागील कित्येक वर्षांपासून या परिसरातील कोळी महिला आणि येथील स्थानिक किनार्यावर जेट्टी बांधून द्यावी, ही मागणी करत आहेत. भरतीसोबत समुद्रातून वाहून येणारा गाळ आणि कचरा खाडी किनार्यावर पसरून सर्वत्र दुर्गंधी आणि रोगराईचे वातावरण पसरल्याचे चित्र आहे. अशाच गुडघाभर गाळात उतरून या भागात बोटी बांधण्याचे काम चालते. त्यामुळे अनेकदा गाळातील खिळे, काचा, टोकदार वस्तू या पायात घुसून कामगारांना गंभीर जखमा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच किनार्यावर फिरायला आणि खेळायला येणार्या बालकांनाही या गाळामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत.
यासंदर्भात मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्थेने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा राजेश्री भानजी यांनी सांगितले. मागील आठ ते नऊ वर्षांपासून हे काम व्हावे, यासाठी त्या पाठपुरावा करत आहेत. मात्र, त्यांना राज्य सरकार किंवा स्वच्छतेबाबत मुंबई महापालिकेकडून दिलासा देण्यात येत नाही. त्या सांगतात, “२००८ पासून मी या चिखलासाठी पत्रव्यवहार करते आहे. पण आजपर्यंत काहीही काम झालेले नाही. परत आठ दिवसांपूर्वी मी मेरीटाईम बोर्डला जाऊन आले. तरीपण काम झाले नाही. हे साफ करायला सरकारकडे पैसे नाहीये पण कोस्टल रोडसाठी आहेत. आजच्या घडीला ‘बीएमसी’ला पैसे मिळवून देण्याचे काम सरकार करते आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
पुढे त्या म्हणाल्या की, “आमच्या किनारपट्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. २० वर्षांपूर्वी खाडीत बरीच मासेमारी आम्ही करायचो. आता मात्र नुसता गाळ येतोय. हा गाळ साफ झाला पाहिजे, आमच्या पोरांना कामे मिळतील. मासेमारीला जाऊ शकतील. राज्य सरकार कांदळवने तोडत आहेत. त्यामुळे आमचे जे उरले तेही हे सरकार गिळण्याच्या प्रयत्नात आहे. सगळे उद्ध्वस्त करत सुटलेत! आमची मुंबईत १०८ मच्छीमार्केट आहेत तेही बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव सुरू, आमची घर तोडायला लागलेत. किनारपट्ट्या तोडत सुटलेत आम्ही करायचे काय? यांचे डोके कुठे चालले आहे बघा. इथे आम्हा लोकांचे खाण्याचे हाल होत आहेत आणि हे आमचे सगळे विकत सुटले आहेत. आम्ही मूळनिवासी आहोत, हा दर्या, आमची शेती अन् हा आमचा गाव आहे. हे आम्ही होऊ देणार नाही. आमच्या महिला सज्ज झाल्या आहेत. २० हजार महिला रस्त्यावर उतरू आणि वेळ पडली ना मुंबई बंद करायला आमच्या या कोळी महिला थांबणार नाही,” असा इशाराही त्यांनी यावेळी राज्य सरकारला दिला.