मुंबई : “कोरोनाकाळात याच पोलिसांना विठ्ठलाची उपमा दिलीत. हा विठ्ठल कसा राहतो, कोणत्या घरात राहतो, याची दखल घेतली का, शासकीय निवासस्थान कसे असतात, याची दखल कोणी घेतली का? मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणतात की, “कोणत्याही न्यायालयात जा, तुम्हाला तुमची घरे कधीच मिळणार नाहीत. कायद्याचा विचार न करता अशी विधान तुम्ही कशी करता,” असा प्रश्न ‘बीडीडी’ चाळीतील पोलीस पत्नी साक्षी सावंत यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना केला आहे.
“एका निवृत्त पोलीस कर्मचार्याला १५ ते २० हजार पेन्शन येते. त्यात मुलांची शिक्षणं आहेत, मुलींची लग्नं आहेत, अनेक निवृत्त पोलीस जागेवर आहेत. मुंबईचे पालकमंत्री व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे साहेब यांनी याची दखल घ्यावी,” अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. पोलिसांना हक्काची घरे मिळावी, यासाठी ‘बीडीडी’ चाळीतील पोलीस पत्नींनी एकी दाखवत संघर्ष केला. मात्र, याबाबत निर्णय न्यायालयात असतानाच राज्य सरकारने ‘बीडीडी’ चाळीतील निवृत्त पोलीस कर्मचार्यांना बांधकाम खर्च म्हणून ५० लाख इतकी रक्कम मोजावी लागेल, असे जाहीर केले. राज्य सरकारच्या या निर्णयावर दीर्घकाळापासूनहक्काच्या घरासाठी लढा देत असणार्या पोलीस पत्नींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इतकेच नाही, तर शिवसेनेचे पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वरळी विधानसभेचे आ. आदित्य ठाकरे यांनी याविषयात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी केली.
पोलीस पत्नी विजेयता पवार म्हणाल्या की, ”१९९४च्या ‘जीआर’नुसार आम्हाला भाडेतत्वावर या खोल्या दिल्या होत्या. तेच पुढे सुरू ठेवावे. आमच्यावर अचानक ५० लाखांचा बॉम्ब फोडला. तो कशाच्या आधारे फोडला? आम्हाला तितका पगार तरी होता का? पोलीस कर्मचारी असताना रात्रंदिवस काम करूनही आयुष्यभरात इतके पैसे नाही जमवले. आम्ही खूप संघर्ष करून इथे आलो. सहजासहजी आम्हाला हे मिळाले नाही. आयुष्यभराची पुंजी अशी जात असेल, तर आम्ही काय करायचे?” ३४ वर्षांपासून वरळी ‘बीडीडी’चाळीत वास्तव्यास असणार्या पोलीस पत्नी शुभांगी पवार म्हणतात की, “ १९९४चा ‘जीआर’ झाला, शासकीय कर्मचार्यांना फुकट घरे दिली. आम्ही फुकटची घरे मागत नाही. घ्या तुम्ही पैसे. पण, आमचाही थोडा विचार करा. आज आमची मुले शिक्षणाची राहिलीत, नोकर्या नाहीत मुलांना, आम्ही जायचे कुठे? तुमच्या निर्णयाचा आम्हाला धक्का बसला. आम्ही तुम्हाला निवडून का दिले, आमचा काहीतरी विचार कराल म्हणून निवडून दिले. आमचा विचार करा साहेब...,”अशी विनवणी करताना पवार यांना अश्रू अनावर झाले.