मुंबई : “जितेंद्र नवलानीची चौकशी कोण करत आहे? जितेंद्र नवलानीवर ‘एसआयटी’ कुणाची आहे? जितेंद्र नवलानीवर ‘एफआयआर’ कुणाचा? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचे उत्तर देणार का,” असे प्रश्न भाजप नेते किरीट सोमय्यांनी बुधवारी भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केले आहेत.
किरीट सोमय्या म्हणाले की, “महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्याआधी उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अनेकांवर आरोप केले. जितेंद्र नवलानी, चार ‘ईडी’ अधिकारी, किरीट सोमय्या, १५ हजार कोटींचा घोटाळा. पंतप्रधानांना पत्रही लिहिण्यात आले. ठाकरे सरकारच्या डझनभर मंत्र्यांनी टीव्हीवर मुलाखती दिल्या. ‘इओडब्ल्यू’ने ‘एसआयटी’ बनवली आहे, असेही सोमय्या म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “महिनाभर पेड जाहिराती देऊन झाल्या. ६८ लोकांची चौकशी करणार, अशी यादी बनवली. ‘एसआयटी’ने १७ लोकांची चौकशी केली. नंतर ४२ लोकांची चौकशी केली. आता पुढे काय झाले? ‘ईओडब्ल्यू’ने जितेंद्र नवलानीशी संदर्भात ज्या चौकशा केल्या, त्याचे पुढे काय झाले, त्याला डोनेशन दिले, लाच दिली अशा सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या. आता त्या ‘एसआयटी’चे काय झाले आहे? ही ‘एसआयटी’ विसर्जित झाली, हे मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे मान्य करणार का,” असा प्रश्नही किरीट सोमय्यांनी विचारला आहे.
‘सेटिंग करण्यासाठी हे सगळे नाटक’
“संजय पांडे हे कबूल करणार का? की ‘इओडब्ल्यू’ला हा तपास बंद करायला सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांनी याबाबत उत्तर द्यायला पाहिजे. संजय राऊतांबाबत मला सांगू नका. संजय राऊत म्हणजे सरकार नाही. संजय राऊत हे प्रवक्ते आहेत. उद्धव ठाकरेंनी सेटिंग करण्यासाठी हे सगळे नाटक केले का? कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले. मला जी माहिती मिळाली, त्यानुसार “एकाच गुन्ह्यावर दोन ‘एसआयटी’, दोन ‘एजन्सीज’, दोन ‘एफआयआर’ हे असे कसे, एकाच बाजूला ‘ईओडब्ल्यू’ एका बाजूला दुसरी ‘एजन्सी’, हे तुम्ही लावले काय आहे? ‘ईओडब्ल्यू’ची ‘एसआयटी’ पण त्याच १५ पानी पत्रावर चौकशी करते आहे, हे खरे आहे का,” अशी माहिती किरीट सोमय्यांनी दिली. “उद्धव ठाकरेंना हे माहित नाही का? की एकाच विषयावर दोन ‘एफआयआर’ झाले, तर ते दोन्ही ‘एफआयआर’ रद्द होणार. माझ्या माहितीप्रमाणे ‘ईओडब्ल्यू’च्या ‘एसआयटी’ला ६७ लोकांच्या जबाबात काहीही सापडले नाही. त्यामुळे ‘ईओडब्ल्यू’ला जितेंद्र नवलानी प्रकरण चौकशी थांबवायला सांगितले आहे. ‘एफआयआर’ करायची नाही, असे सांगितले आहे,” असा थेट आरोपही किरीट सोमय्यांनी केला. “या सगळ्या प्रकरणी चौकशी करायला पाहिजे,” अशीही मागणी किरीट सोमय्यांनी केली.