वाराणसी : ज्ञानवापी संकुलाचे सर्वेक्षण न्यायालयात सादर करण्याची मुदत गुरुवारी संपत असून ते गुरुवारीच न्यायालयात सादर केले जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी हिंदू पक्षाने आता दोन नव्या मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये शिवलिंग सापडलेल्या ठिकाणच्या तळघराचे सर्वेक्षण आणि शिवलिंग कारंजा असल्याचा दावा करणार्या मुस्लीम पक्षाने तो कथित कारंजा चालवून दाखवावा, अशा दोन मागण्या करण्यात आल्या आहेत.
वाराणसी दिवाणी न्यायालयाने ज्ञानवापी संकुलाचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल न्यायालयास दि.१७ मे रोजी सादर करण्याचा आदेश दिला होता. मात्र, दि. १७ मे रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान वकील आयुक्तांनी एवढ्या कमी कालावधीत सर्वेक्षण अहवाल तयार करून सादर करण्यास असमर्थता दाखविली होती. त्यावेळी न्यायालयाने त्यांना आणखी दोन दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत संपली असून आज न्यायालयात सर्वेक्षण सादर केले जाऊ शकते.
त्याचवेळी हिंदू पक्षातर्फे दोन नव्या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्याविषयी माहिती देताना वकील हरिशंकर जैन म्हणाले की, “ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले, तेथे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले, त्या ठिकाणी असलेल्या तळघरामध्ये आणखीही बरेच पुरावे असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तो परिसर पूर्णपणे स्वच्छ करून तेथे चित्रीकरणाद्वारे सर्वेक्षण करण्याची आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे ज्ञानवापीमध्ये सापडलेले शिवलिंग कारंजा असल्याचा दावा मुस्लीम पक्षातर्फे करण्यात येत आहे. तसे असल्यास त्यांनी ते कथित कारंजे चालवून दाखवावे, अशी आमची मागणी आहे. कारण, ते जर कारंजे असेल तर त्यासाठी लागणार्या पाण्याचीही व्यवस्था तेथे असायला हवी. त्यामुळे कारंजे चालवून दाखविल्यास सत्य बाहेर येईल,” असे जैन यांनी सांगितले.
पुन्हा सर्वेक्षणाची मागणी
शृंगारगौरी प्रकरणातील फिर्यादी सीता साहू, मंजू व्यास आणि रेखा पाठक यांच्यावतीने ज्ञानवापीमध्ये पुन्हा एकदा सर्वेक्षणाची मागणी करण्यात आली आहे. ज्ञानवापी संकुलाच्या काही भिंती पाडण्याची मागणी त्यांनी आपल्या विनंती अर्जात केली आहे. अर्जामध्ये पुढील मागण्यांचाही समावेश आहे.
१. ज्ञानवापीमध्ये जेथे शिवलिंग आढळले, तेथे कोणीही वजू करू नये.
२. शिवलिंगाच्या पूर्व आणि उत्तर दिशेची भिंत तसेच नंदीच्या उत्तरेकडील भिंत तोडून तेथील राडारोडा हटवावा.
३. शिवलिंगाची लांबी, रुंदी, उंची शोधण्यासाठी आयोगाची स्थापना करावी.
४. बॅरिकेडिंगच्या आत पश्चिमेकडील भिंत तोडून मंडपाचेही चित्रीकरण करण्यात यावे.
- पार्थ कपोले