मुंबई(विशेष प्रतिनिधी): कोल्हापुरातील राधानगरी अभयारण्या जवळील सावर्धन गावातून सोमवारी दि.१८ भेकाराची शिकार केल्या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर गुन्हा नोंदवला असून पुढील चौकशी सुरू आहे.
वनविभागाला सोमवार दि १८ मिळालेल्या गुप्त माहिती नुसार सावर्धन गावात जाऊन अधिकार्यांनी तपासणी केली. गावातील हडक्याचे माळ या प्रभागात भेकर प्राण्याच्या मांसाचे तुकडे करून वाटणी करताना तीन आरोपींना रंगे हाथ पकडले. तिन्ही आरोपी सावर्धन गावचे रहिवासी आहेत. कोंडीबा डवर, राजेंद्र पाटील, ओंकार पताडे या तीनही आरोपींना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. आरोपींविरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास कोल्हापूर विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. राधानगरी वनक्षेत्रपाल (वन्यजीव) तसेच राधानगरी अतिरीक्त कार्यभार सहाय्यक वनसंरक्षक एस.एस. पाटील, वनपाल एस. व्ही.कांबळे, आणि वनरक्षक ए. डी. कुभार, हे पुढील तपास करणार आहेत.