निसर्गोपासक झाडांचा वकील...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2022   
Total Views |
 
 

Dr. Shreeya Ksheersagar 
 
 
 
 
 
 
वृक्ष हे सजीव असून, त्यांच्या अस्तित्वामागे कार्यकारण भाव आहे. या जाणिवेने निसर्गाची उपासना करणार्‍या नाशिकच्या डॉ. श्रीश क्षीरसागर यांच्याविषयी...
 
 
 
आपणासी जें जें ठावे
ते ते दुसर्‍यासी सांगावे
शहाणे करून सोडावे
सकळ जन...
 
समर्थ रामदासांनी सांगितलेल्या ओळींना सार्थ ठरवणारे नाशिकमधील नाव म्हणजे डॉ.श्रीश क्षीरसागर. वैद्यकीय व्यवसायाबरोबरच निसर्ग निरीक्षण, अवलोकन, छायाचित्रण, भटकंती, साहित्य-कला-वाचन-लेखन, वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं अशी चौफेर मुशाफिरी करणारे डॉ. श्रीश सुपरिचित आहेत निसर्गाविषयीच्या त्यांच्या सखोल ज्ञानासाठी.
 
जिजीविषु वृत्ती, हार न मानणं, प्रयत्न न सोडणं इतकेच नव्हे, तर आशावादी राहाणे, सकारात्मकतादेखील आपल्याला निसर्गाने शिकवली म्हणणारे डॉ. श्रीश मूळचे दापोलीचे. शालेय शिक्षण मुंबई व दापोली येथे तर वैद्यकीय शिक्षण मुंबईत पोदार वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी पूर्ण केले. वडील डॉक्टर व प्राध्यापक असलेल्या त्यांच्या घरात संशोधनाची वृत्ती कायम होती.
 
आपल्याला विज्ञान आणि कला अशा दोन्ही बाजूंमध्ये रस असल्याने शालेय जीवनापासूनच दापोलीसारख्या निसर्गरम्य ठिकाणी सदोदित आजूबाजूला दिसणार्‍या निसर्गाच्या विविध रुपांनी आकर्षित करून घेतलं. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, कीटक, फुलं-झाडं दिसत राहात व त्यांच्या निरीक्षणाबरोबर त्या काळात खूप वाचनही घडलं. बैठक पक्की होत गेली. पक्षी, फुलपाखरं, कीटक, रानफुले ही मूळ आवड. त्यांच्या निरीक्षण अभ्यासातून आपोआप त्यांचा आधार असणारे वृक्ष-झाडं यांच्यातही रस निर्माण झाला आणि त्यांचादेखील समावेश झाला.वृक्षांच्या अभ्यासाकडे त्यांच्या झालेल्या प्रवासाविषयी डॉक्टर सांगतात. एखाद्या झाडाचा, पानांचा, फुलांचा, फळांचा किंवा पक्ष्यांचा एखादा फोटो दिल्यानंतर तत्काळ त्या झाडाचा संपूर्ण ‘बायोडेटा’ सांगणारे डॉ.श्रीश वनस्पतींबद्दल कुतूहल असणार्‍यांमध्ये वनस्पती शास्त्राचा ‘एन्सायक्लोपीडिया’ म्हणून ओळखले जातात. ' Ugly tree is yet to be born ' हे सांगणार्‍या डॉक्टरांचा निसर्गाचा अभ्यास दांडगा आहे.
 
निसर्गाविषयीच्या माहितीने समृद्ध असे अनेक लेख, लेखमाला व पुस्तके लिहिणार्‍या डॉक्टरांचा वाचन प्रवास देखील थक्क करणारा आहे. मुंबईत महाविद्यालयामध्ये शिकत असताना सुट्ट्यांमध्ये दापोलीच्या कृषी विद्यापीठ वाचनालयात दुपारभर जाऊन तिथली वेगवेगळ्या विषयांवरची त्या दिवसांत उपलब्ध असलेली पुस्तकं, संदर्भग्रंथ वाचून, त्यांतून नोट्स काढून, तिथल्या कीटकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, वानिकीशास्त्र शाखांच्या प्राध्यापकांशी चर्चा करून ते माहिती- ज्ञान मिळवत असत. अगदी कृषी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना करावं लागणारं ’ळपीशलीं लेश्रश्रशलींळेप’ देखील ते करत. लांबलांब जाऊन तिथे आढळणारी फुलपाखरं - पतंग जमून त्यांचे वर्गीकरण करून डॉक्टरांनी कीटकशास्त्रज्ञांची शाबासकी मिळवली होती. प्रचंड मेहनतीने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने त्यांनी केलेल्या फुलपाखरांच्या प्रकल्पाचे सर्वत्र कौतुक झाले.
 
निसर्गाविषयीची चांगल्या लेखकांची पुस्तके, लघुपट, माहितीपट संदर्भ ग्रंथ यांचा आजवर विपुल अभ्यास करणारे डॉक्टर आज स्वतः एक संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जातात. लेखन करताना वनस्पतीविषयक, निसर्गविषयक लेखनासाठी पूरक संदर्भासाठी जुन्या पिढीतील लेखकांचे साहित्य मिळवून वाचले. त्याबरोबर आपले पुरातन संस्कृत साहित्य, नाटकं, महाकाव्यं, उपनिषदे, दर्शने, सुभाषितमाला, मूळ रामायण, महाभारत, आयुर्वेदाशी संबंधित ग्रंथ असे बरेच वाचन केले. त्यासाठी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या संदर्भग्रंथ विभागाचा उपयोग झाला. त्याप्रमाणे मराठी गाणी, काव्य यांतूनही निसर्ग- झाडं विषयक लेखन-छायाचित्रांना योग्य असे संदर्भ शोधले, डॉ. श्रीश सांगतात.
 
डॉक्टरांचं पहिलं ’बहर’ हे पुस्तक होत असताना एकदा वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्याकडे गप्पा सुरू होत्या. त्यावेळी एका वनस्पतीबद्दलच्या चर्चेत त्या वनस्पतीमुळे होणारे दुष्परिणाम व दुर्गुण बोलले जात. त्या वनस्पतीला दूषणं दिली गेली. पण, अशाप्रकारे मानवजातीच्या गरजांपोटी वृक्षांना चांगले किंवा वाईट म्हणणारे बरेच आहेत, असे मत त्यांनी मांडले. “डॉक्टर, तुम्ही वृक्षांचे वकील व्हा. त्यांचीही बाजू आहे आणि ती बाजू सचित्र आणि शब्दरूप मांडण्याची तुमच्याजवळ क्षमता आहे.” विनायक दादांचे हे सांगणे डॉक्टरांच्या कायमच स्मरणात राहिलेले आहे व त्याचा उल्लेख ते आवर्जून करतात. इतकेच नव्हे, तर डॉक्टरांचा परिचय असणार्‍या सगळ्यांनाच डॉक्टर हे ’झाडांचे वकील’ आहेत याविषयीची खात्री वाटते.
 
कीटक-फुलपाखरे, पक्षी आणि इतर जीव सर्व झाडांचा उपयोग करून घेणं शिकतात आणि हळूहळू झाडं कुठल्याही स्थानिक परिसंस्थेचा भाग होऊ लागतात. वृक्षसंगोपनावर भर असावा, असेही डॉक्टरांना आवर्जून वाटते. निसर्गाविषयीची ओढ, त्याचा अभ्यास करण्याची वृत्ती निर्माण होण्यासाठी डॉक्टरांचे निसर्गभान, ‘फुलवा-बहर’ सारखी त्यांची परिपूर्ण पुस्तके, बहुआयामी व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी ठरल्याचे अनेक निसर्गप्रेमींचे मत आहे. आपपरभाव, पंक्तिप्रपंच किंवा द्वेष निसर्ग कधीच शिकवत नाही. समानता हा निसर्गाकडून घेण्यासारखा मोठा गुण आहे. या सर्वनियंत्रक शक्तीप्रति नतमस्तक होणे हेच खरे शिक्षण म्हणणार्‍या डॉ. श्रीश यांच्या ज्ञानाविषयी, निसर्गाप्रती असणार्‍या आदरयुक्त कळकळीप्रती मग केवळ आदरच वाटत जातो.
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@