‘लॉकडाऊन’मध्ये आपण नोकरी-व्यवसायात जशी लवचिकता आणली, ‘डिजिटल’ पार्श्वभूमी मजबूत केली, ऑनलाईनची नवी लवचिक ‘मॉडेल्स’ वापरली, तसेच काही नवीन नियोजन स्त्रियांसाठी करायला पाहिजे, तरच त्यांना विधायकदृष्ट्या जगता येईल.
आपण जगभरात स्त्रियांच्या नेतृत्वाचा विचार करतो की, केवळ सात टक्केच नेतृत्व स्त्रियांकडे आहे. तरीही ‘कोविड-१९च्या महामारीच्या काळात ज्या कुशलतेने संपूर्ण जगात स्त्रियांनी परिस्थिती हाताळली, त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. जागतिक स्तरावर आरोग्य कर्मचार्यांच्या सेवांमध्ये महिला कर्मचार्यांची म्हणजे परिचारिका, अंगणवाडी सेविका, आयाबाई आणि वैद्यकीय डॉक्टर्स यांची संख्या आघाडीवर आहे. बर्याच स्त्रिया ‘न्यूनॉर्मल’च्या काळात दूरस्थपणे (work from home)
काम करत आहेत. घरगुती जीवन सांभाळत आहेत. वैयक्तिक नाती, पालकत्व, कुटुंबातील सदस्यांची काळजी आणि त्यांचे शारीरिक व भावनिक आरोग्य अशा अनेक पातळीवर काम करत आहेत.
महामारीच्या संकटातून जात असताना त्यांना या अनेक भूमिकांची जबाबदारी पार पाडताना अनंत संकटांचा सामना करताना व तणावाचा त्रास सोसताना मोठ्या प्रमाणात क्लेश सहन करावा लागला. त्यांची घरातली कामे, वैयक्तिक जबाबदार्या आणि त्यांच्या वेळेची या सगळ्यांशी जुळवून घेताना वाढलेली मागणी, यामुळे लैंगिक भूमिकेतून विशेष असमानतेचा त्रास सहन करावा लागत आहे. नोकरदार महिलांसाठी हा अभूतपूर्व काळ त्यांच्या समोर नवनवीन आव्हानांची संकटे उभी करत आहे. अगदी लहान मुलांच्या पालनपोषणापासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अनेक तांत्रिक बदलांना सामोरे जात ते त्यांच्या घरी वृद्ध, प्रियजनांचे आरोग्य सुनिश्चित करण्यापर्यंत अनेकाविध गोष्टींकडे लक्ष देत पुढे जात आहेत. पण, ही सगळी जबाबदारी अवघड आहे.
‘घरातून काम’ हा जीवनाचा एक नवीन मार्ग बनत असताना कुटुंबावर होणारा परिणाम विशेषतः घरगुती कामे आणि व्यावसायिक जीवन या दोहोंची समांतर हातमिळवणी करत आपले चित्त शांत ठेवणे व आरोग्य सुदृढ ठेवणे, बर्याच स्त्रियांना दीर्घकाळ जमणारी गोष्ट नाही. अनेक उच्च पातळीवर काम करणार्या स्त्रियांच्या मते, या काळात स्त्रियांची जबाबदारी व कामाचा व्याप असीमित होता, अमर्याद होता. जोपर्यंत या जबाबदार्यांचे योग्य अंतर्निहित समायोजन होत नाही, तोपर्यंत स्त्रियांना आवश्यक असणारा आराम मिळणे शक्य नाही. ‘घरातून काम’ करणे स्त्रियांसाठी, निदान भारतीय स्त्रियांसाठी सोपी गोष्ट नाही. किंबहुना तिची पारंपरिक घरातील भूमिका पाहता ‘घरातून काम’ तिच्यासाठी अवघड आहे.
महामारीच्या काळापूर्वी कामाच्या वा व्यवसायाच्या निमित्ताने का होईना, स्त्रियांना स्वतःची ओळख आणि अस्मिता दाखविण्यासाठी एक खास जागा होती. पण, त्या जागेची सुरक्षा जाळी आज अनेक महिलांसाठी संपलेली दिसून येते. ‘लॉकडाऊन’च्या आधीच्या वेळेच्या तुलनेत लोकांना घरून कामावर ठेवण्याच्या नियुक्तीचे प्रमाण तीन पटीने वाढले आहे आणि ‘कोविड’पूर्व काळाच्या तुलनेत ‘वर्क फ्रॉम होम’ कामाची संधी सात पटीने वाढली आहे. अनेक कंपन्यांमध्ये उत्पादकता आणि काम व जगणे यांमध्ये समतोल ठेवण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे व नियम लागू केल्याने घरातून काम करण्याची प्रणाली कदाचित कायमस्वरूपी बनू शकते.
परंतु, आपल्याकडील स्त्रियांसाठी ती किती सोयीस्कर व सुरक्षित ठरेल, याची ग्वाही आज देता येत नाही. आपल्या स्त्रिया घरच्या आणि कामाच्या जात्यात भरडले जाण्याची शक्यताच अधिक आहे. शिवाय ‘सायबर’ सुरक्षा धोरणे किती सुरक्षित आहेत, हा प्रश्न आहेच. अनेक संस्थांच्या निष्कर्षानुसार, ‘कोविड-१९’च्या महामारीच्या उद्रेकामुळे महिलांना गरीब व अनारोग्याकडे ढकलले जाण्याचे प्रमाण जगभरात वाढले आहे आणि अविकसित व विकसनशील देशात हे प्रमाण श्रीमंत विकसित देशाच्या तुलनेत अधिक प्रमाणात होण्याची भीती आहे. ‘युएन वुमन’च्या विश्लेषणात असे दिसून आले आहे की, ७४० दशलक्ष स्त्रिया आज या जगात अनौपचारिक अर्थव्यवस्थेत काम करत आहेत. महामारीच्या पहिल्याच महिन्यात या महिलांचे उत्पन्न ६० टक्क्यांनी घटले आहे आणि ते आज सातत्याने घटत आहे.
जागतिक पातळीवर सरासरी दिवसाला स्त्रिया बिनपगारी घरगुती काम आणि घरच्यांची सेवा करण्याच्या कामात पुरुषांच्या तिप्पट वेळ काम करतात, असे पश्चात संशोधनात दिसून येते. भारत ही वेळ सात ते आठ टक्के प्रमाणात जास्त असू शकते. हे असे कोरोना काळात घरगुती जबाबदार्यांचे वाढलेले काम स्त्रियांसाठी तरी अन्यायकारक ठरत आहे. बर्याच स्त्रियांना त्यांचा नोकरी-व्यवसाय सोडून द्यावा लागला आहे. वरील देशात कोरोना साथीच्या काळात महिलांना रोजगार व शिक्षणक्षेत्रात नुकसान सोसावे लागले आहे. त्यांचे कमाईचे स्रोत गेल्याने त्यांना गरिबीचा सामना करावा लागत आहे.
शाळा बंद झाल्या आणि आपल्याकडील संस्कृतीत मुलांचे संगोपन व अभ्यासाची जबाबदारी महिलांना द्यायची, असा अलिखित पारंपरिक नियम असल्याने शहरातील बर्याच महिलांना त्यांचा रोजगार सोडण्यावाचून पर्यायच उरलेला नाही. ‘लॉकडाऊन’मध्ये आपण नोकरी-व्यवसायात जशी लवचिकता आणली, ‘डिजिटल’ पार्श्वभूमी मजबूत केली, ऑनलाईनची नवी लवचिक ‘मॉडेल्स’ वापरली, तसेच काही नवीन नियोजन स्त्रियांसाठी करायला पाहिजे, तरच त्यांना विधायकदृष्ट्या जगता येईल. स्त्रियांचे ‘नवीन सामान्य’ सामाजिक विकासासाठी आवश्यक आहे. त्याचे विश्लेषण पुढील लेखात करूया. (क्रमश:)
डॉ. शुभांगी पारकर