मुंबई (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील सुमारे ४३ हेक्टर कांदळवनाची जमीन वापरण्याबाबत मंजुरी द्यावी अशी मागणी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए) केली आहे. बेलपाडा पाणथळ क्षेत्राला न्हावा शेवातील बंदरापर्यंत जोडणाऱ्या रस्त्यासाठी राज्य वनविभागाची परवानगी मागण्यात आली आहे.
हा प्रस्ताव पनवेलमधील आमरा मार्ग आणि 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक' दरम्यानच्या कोस्टल रोडसाठी देण्यात आला आहे. शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) हा प्रस्ताव वन विभागाला दिला आहे. या मध्ये सुमारे ३२ हेक्टर जमीन आधीच प्रस्तावित आहे. आता त्यात आणखी ४३ हेक्टरची भर पडली आहे. हा रस्ता आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बेलापूर, खारघर आणि नेरुळ आणि जेएनपीशी जोडणार आहे.
'जेएनपीए'ने गेल्या महिन्यातच ताब्यात असलेली कांदळवन जमीन वनविभागाला हस्तांतरित करण्याचे मान्य केले होते. मात्र तेव्हा सुमारे ७० हेक्टर कांदळवनाची जमीन राखून ठेवण्यात आली होती. आता ही जमीन रस्ते बांधणी आणि बंदर विस्तारासाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे. मुंबईच्या 'वनशक्ती' संस्थेने १५ मे रोजी राज्य प्राधिकरणांना आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला पत्र लिहलेले होते. या पत्रात उरणमधील पाणथळ जागा गायब झाल्याचा उल्लेख आहे. बेलपाडा पाणथळ जागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ट्रक पार्किंग सुविधा विकसित केल्या जात आहेत. तसेच आणि दिवसेंदिवस पाणथळ जागेत कचरा जमा होत आहे. या बाबत माहिती द्यावी असे या पत्रात नमूद आहे.