मुंबई : तथागत गौतम बुद्धांची आज २५८४ वी जयंती. त्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सर्व जनतेला बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्या दिल्या आहेत. "गौतम बुद्धांनी दिलेली नीतीसूत्रे अंगिकारली तर खऱ्या अर्थाने समाजातील अंध:कार दूर होईल" असे प्रतिपादन उद्धव ठाकरेंनी यावेळी केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, "आजच्या अनेक सामाजिक समस्यांतून बाहेर यायचे असेल तर गौतम बुद्धांची विचारसरणी मार्गदर्शक आहे. मनुष्यजातीच्या कल्याणासाठी त्यांनी दिलेली नीतीसूत्रे संपूर्ण विश्वाचे कल्याण करतील. आपल्यातील भेदाभेद, विषमता नष्ट करणारा समतेचा त्यांचा उपदेश आपण स्वीकारून वाटचाल केली तर तीच खरी मानवता असेल". आज समाजात हिंसाचार, विकृती, युध्यजन्य स्थिती वाढली आहे. या विकारांवर गौतम बुद्धांचा क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाचा संदेश आपणा सर्वांना मार्ग दाखवणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.