मुंबई: 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेतून माझ्या प्रश्नांच सोडा, शिवसैनिकांना तरी ते काय दिशा मिळाली, काय कळलं असेल का? हा माझा मोठा प्रश्न आहे. मुळात त्यांचे भाषण हे दिशा देणारे नव्हते. मुंबईतील मेट्रो आणि धारावी बद्दल सांगितलं, पण बाकीचं काय? स्वार्थी मुख्यमंत्री आधी कुटुंबाचा विचार करतात हेच वेळोवेळी दिसून आलंय. त्यामुळे बाप बेटेच्या सरकारमधून मुंबईला मुक्त करायची गरज आहे, हे देवेंद्रजी म्हणाले ते योग्यच!', अशी प्रतिक्रिया भाजप आ. नितेश राणे यांनी शनिवार दि. १४ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या भाषणांतर दै.मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली.
नितेश राणे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी आम्हाला उत्तरं देणं तर सोडाच पण शिवसैनिकांना तरी स्टेजवर बोलणारा व्यक्ती काय भाषण करतोय हे कळलं का? ज्या व्यासपीठावरून ते बोलत होते आणि जे मुद्दे ते हाताळत होते. त्यात महाराष्ट्राचे मुद्दे आणि विकासाचे मुद्दे लांबच राहिले. एकंदरीत शिवसेनेला दिशा देणारं, शिवसैनिकांना दिशा देणारं, कार्यक्रम देणारं यातील कुठलाही थांगपत्ता नसलेलं भाषण ऐकायला मिळालं. म्हणून मी जे काही प्रश्न त्यांना विचारले त्यातून चुकीची अपेक्षा चुकीच्या व्यक्तीकडून केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलत असताना हे प्रश्न हाताळतील पण अपेक्षेप्रमाणे आम्ही जे त्याच्याविषयी बोलतो की हा 'ढ' विद्यार्थी आहे. ते परत एकदा सिद्ध करून दाखवलं.", अशी टीका नितेश राणेंनी केली.
मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्न विचारण्याचा अधिकार गामावलाय
"गेली अडीज वर्ष महाविकास आघाडीच्या काळात हिंदू समाजावर बरेच हल्ले झाले. पालघर, नांदेड, अमरावती, मालेगाव अशा अनेक ठिकाणची उदाहरणं समोर आहेत. एवढेच नव्हे तर आज हिंदूंच्या सणांवरही निर्बंध लावले जतायत. हिंदुत्वाची खरी व्याख्या ही भाजप आणि संघातून सहज समजू शकते. मुळात हिंदुत्व जगायचं कसं याचं ज्वलंत उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत हे आहेत. 'संभाजीनगर करायची गरज काय?' असे मुख्यमंत्री म्हणाले, यावरून त्यांनी बाळसाहेबांच्या भूमिकेला तिलांजली दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. हिंदूद्वेष काय असतो हे मुख्यमंत्र्यांना पाहिल्यावर दिसतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्न विचारण्याचा अधिकार केव्हाच गामवलाय.", असे नितेश राणे यांचे म्हणणे आहे.
मुंबईकरांसाठी तुम्ही काय केलं?
पुढे राणे म्हणाले, मुंबईत जन्मलेला मी मुख्यमंत्री म्ह्णून स्वतः मिरवतात. पण मुंबईकरांसाठी तुम्ही काय केलं. तुमच्या ताब्यात असणाऱ्या मुंबई महापालिकेने भ्रष्टाचार सोडून काय केलं? त्यामुळे मुख्यमंत्री मुंबईसाठी काय केलं हे काय सांगणार? तुम्ही कांजूरमार्गच्या जमिनीबद्दल सांगितलं मात्र स्वतःच्या आमदारकीसाठी जसे राज्यपालांकडे गेले, कसा पंतप्रधानांना फोन करून आमदारकी मिळवली आणि इतर ठिकाणी वशिलेबाजी केली.तशी मुंबईसाठी का केले नाही? मुंबईसाठी हेच ताकद का वापरली नाही? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला.