जातककथांतील राजधर्म

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2022   
Total Views |

news 1

 
 
 
भगवंतांची शिकवण जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी आहे. गृहस्थी, उपासक, राजे, अनेक व्यापारी, सेनापती आणि अत्यंत सामान्य माणसे या सर्वांना त्यांनी उपदेश केला आहे. त्याच्या हजारोे कथा आहेत. जातककथा हा त्यातील एक भाग आहे. जवळजवळ ५६०च्या आसपास जातककथा आहेत. आजच्या बुद्धपौर्णिमेला भगवान गौतम बुद्धांच्या जन्मदिनी जातककथांमधील राजनीतीशास्त्र जाणून घेऊया...
 
 
 
 
भगवान गौतम बुद्धांचा आणि राजनीतीचा संबंध काय, असा प्रश्न सहज उत्पन्न होण्यासारखा आहे. याचे कारण असे की, गौतम बुद्धांनी तरुण वयातच राजत्याग केला. डोक्याचे मुंडन केले आणि संन्याशाची वस्त्रे घातली. मानव दुःखी का होतो? या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधून काढण्यासाठी ते राजवाड्याबाहेर पडले. आणि शेवटी त्यांनी दुःखमुक्तीचा मार्ग शोधून काढला आणि त्याचा प्रचार सुरू केला. मृत्यूपर्यंत त्यांनी कधीही कोणतेही राजकारण केले नाही.
 
 
असे जरी असले, तरी भगवंतांची शिकवण जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी आहे. गृहस्थी, उपासक, राजे, अनेक व्यापारी, सेनापती आणि अत्यंत सामान्य माणसे या सर्वांना त्यांनी उपदेश केला आहे. त्याच्या हजारोे कथा आहेत. जातककथा हा त्यातील एक भाग आहे. जवळजवळ ५६०च्या आसपास जातककथा आहेत. आणि या कथा केवळ नीतिपाठ देणार्‍या नसून अनेक कथा जीवनाच्या शाश्वत सत्यावर प्रकाश टाकणार्‍या आहेत. यातील अनेक कथांत राजधर्म सांगितलेला आहे. कधी स्पष्टपणे तर कधी अपरोक्षपणे. आजच्या परिस्थितीच्या संदर्भातील त्यातील निवडक जातककथांचा आस्वाद आपल्याला इथे घ्यायचा आहे.
 
 
राजधर्म याचा अर्थ असा होतो की, प्रजेवर शासन करणार्‍या शासकाची कर्तव्ये कोणती आहेत? त्यांचा कर्तव्यधर्म कोणता आहे? त्याचे पालन का आणि कसे केले पाहिजे? न केल्यास काय होईल? हे सांगणार्‍या या कथा आहेत. राज्यपद्धती कोणती का असेना राजधर्म सर्वांचा सारखाच असतो. राजेशाहीचा राजधर्म वेगळा आणि लोकशाही शासनाचा राजधर्म वेगळा, अशी विभागणी करता येत नाही. राजेशाही, लोकशाही, या वेगवेगळ्या राज्यपद्धती आहेत. प्रत्येक राज्यपद्धतीचा अंतिम हेतू प्रजेचे कल्याण साधण्याचा असतो.
 
 
राजधर्माचा पहिला विषय येतो, प्रजेवर संकट आले असता शासनकर्त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रजेला संकटमुक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे करीत असताना स्वतःच्या प्राणाचे मोल द्यावे लागले तरी हरकत नाही. या कथेचे नाव आहे, ‘महाकपिजातक.’ या कथेतील नायक आहे, एक वानर. जातककथा बुद्धाच्या पूर्वजन्मीच्या कथा आहेत. या कथेत भगवंताचा जन्म वानर योनीत झालेला आहे. अगदी थोडक्यात ही कथा अशी आहे. ज्या ठिकाणी बोधिसत्वाच्या वानराचा कळप राहत होता. तेथे अतिशय गोड फळे देणारे आंब्याचे झाड होते. त्या झाडाचा शोध घेत घेत सैन्यतुकडी बरोबर घेऊन राजा तेथे येतो. वानरांना हाकलून लावण्यासाठी सैनिकांना वानरांवर बाण सोडण्याचा आदेश देतो. आपली प्रजा संकटात आली हे बोधिसत्वाला (वानरटोळीचा नायक) लक्षात येते.
 
 
तो नदीच्या या किनार्‍यापासून दुसर्‍या किनार्‍यावर लांब उडी मारतो. मागील दोन पायात उंच वेत घेतो आणि पुन्हा उडी मारून झाडावर येतो. झाडाची फांदी घेऊन तो लटकत राहतो. आणि सर्वांना आपल्या पाठीवर पाय देऊन वेतावरून पलीकडच्या काठावर सुरक्षित जाण्यासाठी आज्ञा देतो. भराभर सगळे वानर त्याप्रमाणे करतात. राजा ते दृश्य पाहतो आणि आश्चर्यचकित होतो. सैनिकांना बाण मारायला सांगून बोधिसत्वाला खाली लावलेल्या झोळीत पाडतो. सगळे वानर पाठीवर पाय देऊन गेलेले असल्यामुळे बोधिसत्वाची छाती फुटायची वेळ येते. त्याच्या तोंडातून रक्त येते. राजा त्याला विचारतो, “तू कोण आहेस?” बोधिसत्व म्हणतो, “मी वानरांचा राजा आहे. माझा राजधर्म वानरांची सुरक्षा करणे हा आहे. तुुम्ही बाण मारण्याची आज्ञा दिली, माझी प्रजा त्यात मरू नये म्हणून अधांतरी लोंबकळत राहून सर्वांना सुरक्षित बाहेर काढले.” एवढे बोलून त्याचा मृत्यू होतो. राजा त्या बोधिसत्वाचा राजाप्रमाणे अंत्यसंस्कार करतो. राज्यकर्त्यांचा राजधर्म कोणता? आपल्या राज्यकर्त्यांचा राजधर्म या कथेत वर्णिल्याप्रमाणे आहे का? तुम्हीच विचार करा.
 
 
‘संभवजातक’ या कथेत राजाची कर्तव्ये कोणती, हे सांगितले आहे. कुरुराष्ट्राचा राजा धनंजय याला राजधर्म कोणता, हे समजून घ्यायचे होते. त्याने राजपुरोहिताला विचारले. राजपुरोहित राजधर्म समजून घेण्यासाठी संभव नावाच्या पंडिताकडे गेला. तो पंडित म्हणाला, “राजाचे पहिले कर्तव्य म्हटले म्हणजे त्याने आजचे काम उद्यावर टाकणार्‍या माणसाचा सल्ला कधीही घेता कामा नये. दुसरे कर्तव्य म्हणजे जो आपले दोष दाखवून देईल त्याच्यावर राग न धरणे. तिसरे कर्तव्य म्हणजे कुमार्गाने न जाणे. अधर्मावर विश्वास न ठेवणे आणि अनर्थकारक कर्मे न करणे.” या कर्तव्यांचे पालन केल्याने राज्याची अभिवृद्धी होत जाते आणि प्रजा सुखी होते.
 
 
राज्यकर्त्यांची ही कर्तव्ये सार्वकालिक आहेत आणि राज्यव्यवस्था कोणती आहे, याच्याशी तिचा संबंध नाही. एक पक्षाचे सरकार असो किंवा तीन पक्षांचे सरकार असो ही राज्यकर्तव्ये सर्वांना सारखी लागू होतात. राज्यकर्ता झाला की त्याला शक्ती प्राप्त होते. या शक्तीचा वापर तो लोककल्याणासाठी करू शकतो किंवा स्वतःच्या वासनापूर्ततेसाठी करू शकतो. वासनापूर्ती करणार्‍या राजाची ही कथा आहे. ‘मणिचोरजातक’ असे तिचे नाव आहे. या कथेतील राजा वाराणसीचा राजा आहे. कथेतील नायक बोधिसत्व आहे. त्याच्या पत्नीचे नाव आहे, सुजाता. ती अतिशय सुंदर आहे. तिचे माहेर वाराणसीत होते. आई-वडिलांना भेटण्यासाठी ती आपल्या पतीबरोबर बैलगाडीत बसून वाराणसीत आली. तेव्हा वाराणसीच्या राजाची स्वारी नगर प्रदक्षिणेला निघाली होती. राजाच्या नजरेत सुजाता पडली. तो तिच्यावर भाळला. तिला आपल्या अंतपुरात कसे आणता येईल, याचा विचार करू लागला.
 
 
तेव्हाचा नियम असा होता की, कोणत्याही विवाहित स्त्रीला राजा मन मानेल त्याप्रमाणे उचलून घेऊन जाऊ शकत नसे. तिच्या पतीला कसे ठार करता येईल, याचा विचार तो करू लागला. त्याने आपल्या गुप्तचरांमार्फत आपल्या गळ्यातील रत्नहार त्या बैलगाडीत ठेवायला सांगितला. रत्नहार चोरीला गेल्याची बोंबाबोंब केली. नाकेबंदी करण्यात आली. सर्वांची झडती सुरू झाली. त्या बैलगाडीचीदेखील झडती झाली आणि त्यात रत्नहार सापडला. सुजाताच्या पतीवर चोरीचा आळ ठेवण्यात आला. त्याला देहदंडाची शिक्षा देण्यात आली.
 
 
या खोट्या आरोपामुळे सुजाता हादरली आणि तिने मी जर सत्याचरणी असेल, तर इंद्राने माझे रक्षण करावे, अशी प्रार्थना केली. तिची प्रार्थना ऐकून इंद्र आला. इंद्राने अदृश्यपणे राजाला पकडून वधस्तंभाजवळ उताणा पाडला आणि सुजाताच्या पतीला मोकळे केले. वधाची शिक्षा अंमलात आणणार्‍यांनी एक घाव घालून राजाचे शीर धडापासून वेगळे केले. भगवंतांना हे सांगायचे आहे की, जो राज्यकर्ता परस्त्रीची हाव धरील त्याचे डोके छाटले पाहिजे. हे महापाप आहे. कथा पुढे सांगते की, दुष्ट राजा मेला म्हणून लोकांनी आनंद साजरा केला आणि बोधिसत्वालाच आपला राजा केला.
 
 
ज्यांनी आपल्याला मदत केली, आपले रक्षण केले आणि राजगादीवर जाण्याचा मार्ग सुलभ केला, त्यांचा विश्वासघात करता नये. असा विश्वासघात एका राजाने केला. आणि शेवटी जनतेनेच त्याला पकडून ठार केले, त्याची ही कथा. कथेचे नाव ‘सच्चकीरजातक.’ काशीच्या राजाचा मुलगा पुरात नदीतून वाहत गेला. ज्या झाडाला धरून तो जात होता. त्या झाडावर पोपट, उंदीर आणि नागदेखील होते. बोधिसत्व तेव्हा एका ब्राह्मण कुटुंबात जन्मले होते. त्यांचे घर नदीच्या काठावरच होते. वाहणार्‍या राजपुत्राला आणि सर्व प्राण्यांना त्यांनी वाचविले. पाऊस आणि थंडीने गारठलेल्या सर्वांना त्यांनी शेकोटीजवळ नेले. अगोदर मुक्या प्राण्यांची सेवा केली. राजकुमाराला नवीन वस्त्रे दिली. त्याने राजकुमाराचे प्राण वाचविले.
 
 
राजकुमाराला तपस्व्याने प्राण्यांची सेवा केली, हे आवडले नाही. मी राजपुत्र आहे, माझीच सेवा त्याने करायला पाहिजे, असे त्याला वाटले. आपला अपमान झाला, असे त्याला वाटले आणि अपमानाचा सूड घ्यायचे त्याने ठरविले. पुढे तो राजपुत्र राजा झाला. बोधिसत्व राजाला भेटण्यासाठी गेला. त्याला पाहताच राजा झालेला राजकुमार संतापला. याने माझा अपमान केला, म्हणून याला शिक्षा दिली पाहिजे. त्याने बोधिसत्वाला पकडले आणि हा दुष्ट माणूस आहे म्हणून याचा वध करा अशी आज्ञा दिली. तेव्हा बोधिसत्व म्हणाला, “नदीतून वाहत असलेल्या सापाला वाचवावे पण माणसाला वाचवू नये, याचा प्रत्यय मला आज आला.” लोकदेखील आपापसात चर्चा करू लागले. बोधिसत्वाने त्यांना आपण राजपुत्राला कसे वाचविले, हे सांगितले.
 
 
त्याचे बोलणे ऐकून लोक खवळले. तो राजकुमार आता दुष्ट राजा झाला होता. लोक त्याला कंटाळले होते. त्यांनी बंड केले आणि राजाला धरले आणि त्याचा वध करुन टाकला. मागच्या कथेत देवाने राजाचा वध केला. कथेत वाईट राजाला दैवी शक्तीदेखील सहन करीत नाही आणि या कथेत लोकांनीच दुष्ट राजाला ठार केले. भगवंतांना हे सांगायचे आहे की, राजेशाही असो की गणराज्य असो शक्तीचा उगम प्रजेतून होत असतो. दुष्ट राज्यसत्तेला सहन करता कामा नये. अशा राज्यकर्त्यांना हाकलून लावले पाहिजे, असा या कथेचा सारांश आहे.
 
 
राजधर्माचे पालन फार कठीण असते. राज्यकर्त्यांनी आपल्या कर्तव्यांचे पालन प्रामाणिकपणे करायला हवे. सर्वांशी समानतेने व्यवहार करायला पाहिजे. न्यायबुद्धी सोडता कामा नये. अनाचार करता कामा नये. प्रजेचे धन लुबाडता कामा नये. सर्वांना त्यांचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. प्रत्येकाला स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगण्याची संधी दिली पाहिजे. तशी व्यवस्था राज्यात राहील, हे पाहिले पाहिजे. भगवंताच्या कथा या सूक्ष्म अर्थाने राज्यघटनेचा आशय सांगत असतात. त्या अर्थाने त्या वाचाव्या लागतात आणि आजच्या परिस्थितीनुसार त्या समजून घ्याव्या लागतात. तसा अल्पसा प्रयत्न याठिकाणी केला आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@