जळगावकर पक्षिमित्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2022   
Total Views |
 

Ashwin Lilachand Patil  
 
 
 
 
 
 
वाचनातून निर्माण झालेला पक्षीनिरीक्षणाचा छंद जोपासून त्याला शास्त्रीय नोंदीची जोड देणारे हाडाचे पक्षि निरीक्षक अश्विन लिलाचंद पाटील यांच्याविषयी...
 
 
 
 
वसायाने शिक्षक असूनही कॅमेरा आणि दुर्बीण घेऊन हा माणूस रानोमाळी भटकत असतो. पक्षी निरीक्षणावेळी आढळलेल्या जखमी पक्ष्यांवर उपचार करतो. कोणतीही पार्श्वभूमी नसताना या माणसाने पक्षी निरीक्षणाच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यासाठी कुवार रानवाटा तुडवल्या आहेत. जळगाव जिल्ह्याची पक्षी विविधता जगासमोर मांडून त्यांना आसरा देणारा हा माणूस म्हणजे अश्विन पाटील.
 
 
पाटील यांचा जन्म दि. २४ जानेवारी, १९८३ साली जळगावमध्ये झाला. कोवळ्या वयात मनावर जे कोरले जाते, जे बिंबवले जाते, त्याच ठशांची शिदोरी माणूस आयुष्यभर सोबत घेऊन चालतो. हीच गोष्ट पाटील यांच्या आयुष्यात घडली. ते दहावी इयत्तेत शिकत असताना एका वृत्तपत्रात दर गुरुवारी अभ्यासक कौस्तुभ पांढरीपांडे यांचे ’चला पक्षी निरीक्षणाला’ हे पक्ष्यांबद्दलचे सदर प्रसिद्ध होत असे. एकदा सहज वृत्तपत्राचे वाचन करत असताना त्यांचे लक्ष या सदराकडे गेले. सदर वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, माणसाच्या विश्वाप्रमाणेच पक्ष्यांचेही विश्व वेगळे आहे. यातूनच त्यांनी दर गुरुवारी प्रसिद्ध होणारे हे पक्ष्यांविषयीच्या सदाराचे कात्रण कापायला सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्या आठवड्यात सदरात वाचलेला पक्षी शोधायला ते बाहेर पडू लागले. या सवयीमुळे त्यांना पक्षीनिरीक्षणाचा ध्यास लागला. पक्ष्यांच्या रंगीबेरंगी दुनियेत प्रवेश केल्यावर पक्ष्यांच्या निरीक्षणामध्ये हळूहळू वाढ झाली. त्यांच्या हालचाली, सवयी, लकबी यांचे रहस्य त्यांच्यासमोर उलगडू लागल्यावर त्यांची पक्षी जिज्ञासा वाढू लागली.
 
 
कालानुरुप पाटील यांची या क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांशी संपर्क होऊ लागला. विविध निरीक्षणाचे आदानप्रदान होऊ लागले. दरम्यानच्या काळात शैक्षणिक बाजूच्या दृष्टीने यांच क्षेत्रासंबंधीचे त्यांनी शिक्षण घेतले. वनस्पती आणि प्राणीशास्त्रामधून पदवीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर ‘बी.एड’चे शिक्षण घेऊन शिक्षकी पेशा स्वीकारला. हा पेक्षा स्वीकारल्यावरही पाटील यांची पक्षी निरीक्षणाची हौस काही थांबली नाही. उलटपक्षी त्याला अधिक बहर फुटत गेला. एकदा पाटील यांच्या मित्राने सुगरण पक्ष्याचे घरटे तोडून त्यांना आणून दिले. या घरट्यामधून चार पिल्ले निघाली. त्यामुळे पाटील यांनी हे घरटे पुन्हा मूळ जागेवर दोरीच्या साहाय्याने बांधून स्थिर केले. सरतेशेवटी आईने हे बांधलेले घरटे आणि त्यातील पिल्ले पुन्हा स्वीकारली.
 
 
या प्रथम प्रयोगाने त्यांना पक्ष्यांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. पुढच्या काळात पक्ष्यांचे निरीक्षण आणि त्यासंदर्भात काम करता करता परिचय वाढला आणि यातूनच दोन-चार समविचारी मित्र त्यांच्या सहवासात आले. आपली पक्ष्यांवर काम करणारी एक छोटीशी संस्था असावी, या प्रेरणेने प्रेरित होऊन त्यांनी अमळनेरसारख्या छोट्याशा गावात दि. २४ जानेवारी, १९९९ रोजी ’उडान पक्षीमित्र संस्था’ सुरू केली. तेव्हापासून खर्‍या अर्थाने पाटील यांचे पक्षीमित्र म्हणून कामाला सुरुवात झाली. संस्थेच्या प्रमुख उद्देशामध्ये संरक्षित पक्ष्यांची विक्री थांबवणे, त्यांचे संवर्धन-संरक्षणाकरिता प्रयत्नशील राहणे, जखमी पक्ष्यांवर उपचार करणे आणि जनजागृती करणे यांचा समावेश आहे. गेल्या दोन दशकांमध्ये पाटील यांनी अनेक पक्ष्यांवर उपचार करून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडलेदेखील आहे. पक्ष्यांवर उपचाराखेरीच पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातून अनेक पक्ष्यांची प्रथम नोंद केली आहे. त्यामध्ये जिल्ह्यात भोकरबारी धरणावर आढळलेल्या सर्वाधिक रोहित पक्ष्यांची नोंद लक्षवेधी ठरली, तर जिल्ह्यात धाविक पक्ष्यांचा अधिवास असल्याची नोंद त्यांनी पहिल्यांदा केली. क्रौंच पक्ष्यांचा थवा पहिल्यांदाच नोंदवण्यात आला.
 
अनेकदा अमळनेर शहर व इतर परिसरात ‘वन्यजीव संरक्षण कायद्या’अंतर्गत विक्रीसाठी बंदी असलेले लाहूरी, तितर सारखे पक्ष्यांची विक्री होते. या पक्ष्यांची विक्री करणार्‍यांकडून सुटका करून स्थानिक लोकांच्या सहभागातून पुन्हा निसर्गात सोडण्याचे काम पाटील दरवेळी करत असतात. १९९९ ते २०१६ पर्यंत त्यांनी जळगाव जिल्ह्यात स्वत: निरीक्षण केलेल्या पक्ष्यांची शास्त्रीय नावांसहित जळगाव जिल्ह्याची पक्षीसूची तयार केली आहे. शिक्षकी पेशात काम करत असल्याने विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचे काम ते सातत्याने करत असतात. शिवाय वन विभागातील कर्मचार्‍यांनाही पक्ष्यांविषयी त्यांच्या निरीक्षणाविषयी मार्गदर्शन देत असतात.
 
 
आपली नोकरी सांभाळून उरलेला वेळ पाटील यांनी पर्यावरणासाठी समर्पित करण्याचे ध्येय निश्चित केलेले आहे. कुठलेही शासकीय अनुदान न घेता, मित्र परिवाराच्या सहकार्‍याने आणि स्वत:च्या वैयक्तिक-कौटुंबिक गरजांवर मर्यादा आणत पर्यावरण संरक्षण, प्रबोधन आणि संशोधनाचे कार्य त्यांनी अविरतपणे सुरू ठेवले आहे. पक्षी संरक्षण, प्रबोधन आणि संशोधन क्षेत्रात कामगिरी केल्यामुळे त्यांना किर्लोस्कर गुप्रचा ‘वसुंधरा मित्र पुरस्कार’, ‘निसर्गमित्र पुरस्कार’, ‘राज्यस्तरीय पर्यावरण रत्न पुरस्कार’, ‘स्व. डॉ. व्हि. सी. आंबेडकर स्मृती पक्षी संशोधन आणि जनजागृती पुरस्कार’ आणि ‘आंतरराष्ट्रीय दर्जाचा ग्लोबल फ्रेंड ऑफ नेचर’ हा पुरस्कारही मिळाला आहे. जिल्ह्यास्तरीय पक्ष्यांची विविधता टिपून त्यांच्याविषयी प्रबोधन करणार्‍या पाटील यांच्यासारख्या पक्षिमित्रांची आज समाजाला गरज आहे. त्यांना पुढील वाटचालीकरिता खूप शुभेच्छा!
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@