ज्ञानवंता हेचि खरे सुख!

    12-May-2022
Total Views |
 
 

sukh
 
 
 
 
 
माता-पिता ज्ञानवंतांच्या जीवनरूपी वृक्षाच्या अग्रभागावर नेहमी विद्यमान असतात. ज्ञानी सत्पुरुषांना हे माता-पिता शाश्वत सुखाची सावली देतात, तसेच ते उत्तमोत्तम गोड फळे पण प्रदान करतात. आईमध्ये जे वात्सल्य असते आणि पित्यामध्ये जे पालकत्व दिसून येते, ते खरोखरच आपल्या मुला-बाळांच्या व संततीच्या पूर्ण हितासाठी असते. असे आई- वडील ज्यांच्याकडे नाहीत. त्यांच्या जीवनाचा वृक्ष हिरवागार कदापि राहणार नाही. तो काही दिवसांतच सुकून जाणार, हे निश्चित!
 
  
 उत्कृष्ट मती, मन व मुख!!
माता च पिता च ते अग्रे वृक्षस्य क्रीडत:।
विवक्षित इव ते मुखं ब्रह्मन् मा त्वं वदो बहु॥
(यजुर्वेद-२२.२५)
 
 
अन्वयार्थ
 
 
(ब्रह्मन्)हे ब्रह्मज्ञानी मानवा! (ते माता च) बुद्धिरूप तुझी आई आणि (पिता च ते) मनरुप तुझे वडील हे (वृक्षस्य अग्रे क्रीडत:) जणूकाही जीवनरुपी वृक्षाच्या अग्रभागी क्रीडा करीत आहेत. (विवक्षतः इव ते मुखम्) संदेशवहन करण्यास, बोलण्यास इच्छुक असलेल्या माणसाप्रमाणे तुझे मुख आहे. (त्वं बहु मा वद) तू जास्त बोलू नकोस.
 
 
विवेचन
 
 
झाडे ही समग्र जगाला जीवनशक्ती प्रदान करतात. सुख, आनंद आणि आरोग्य लाभते, ते झाडांमुळेच! असे हे वृक्ष जिथे जिथे वास्तव्यास असते, तिथे तिथे ते आपल्या दाट सावली, फुले व फळांनी प्राणिमात्रांचे कल्याण साधतात. त्यांचे जीवन अगदी साधु-संतांप्रमाणे असते. म्हणूनच ‘वृक्षा: सत्पुरुषा इव!’ असे सुभाषितवचन आहे. माणसाचे जीवन हेदेखील वृक्षांसारखेच असते. जशी माणसे एकसारखे नसतात, तसे वृक्षदेखील एकसारखी नसतात. सामान्यतः तीन प्रकारचे वृक्ष मानले जातात. पहिले ते जे की केवळ सावली देतात, पण फळे देत नाहीत. दुसरे ते की, जे सावली पण देतात आणि फळे पण देतात आणि तिसरे ते की, जे सावली पण देत नाहीत आणि फळे पण देत नाहीत.
 
 
ज्ञानी माणसाचे जीवन हे दुसर्‍या प्रकारच्या वृक्षांप्रमाणे असतात. जे नेहमी आपल्या ज्ञान व विचारांची सावली देतात आणि आपल्या विविध सद्गुणांची फळेदेखील बहाल करण्यात व्यस्त असतात. सामान्य लोकांचे जीवन हे इतरांना सावली पण देत नाहीत आणि फळे पण देत नाहीत. अशांचे जीवन हे तर निरर्थकच मानले जाते.
 
 
 
या ज्ञानवंत लोकांचे माता-पिता कोण आहेत? हे उपमा अलंकाराने इथे विशद केले आहे. ज्ञानमय बुद्धी ही ज्ञानी जनांची आई आहे. कारण, ती बुद्धी सतत विचारवंतांना मार्गदर्शन करीत असते. योग्य ती दिशा देणारी असते. तसेच अशा ज्ञानवंतांचा पिता हा मन असतो. मन हे द्वंद्वात्मक असते. पण, ज्ञानी लोकांचे मन मात्र द्वंद्वविरहित आणि शिवसंकल्पाने परिपूर्ण असते. तसेच ते सद्भावनेने युक्त असते. असे हे माता-पिता ज्ञानवंतांच्या जीवनरूपी वृक्षाच्या अग्रभागावर नेहमी विद्यमान असतात.
ज्ञानी सत्पुरुषांना हे माता-पिता शाश्वत सुखाची सावली देतात, तसेच ते उत्तमोत्तम गोड फळे पण प्रदान करतात. आईमध्ये जे वात्सल्य असते आणि पित्यामध्ये जे पालकत्व दिसून येते, ते खरोखरच आपल्या मुला-बाळांच्या व संततीच्या पूर्ण हितासाठी असते. असे आई- वडील ज्यांच्याकडे नाहीत. त्यांच्या जीवनाचा वृक्ष हिरवागार कदापि राहणार नाही. तो काही दिवसांतच सुकून जाणार, हे निश्चित! म्हणूनच जीवनात सु+बुद्धिरूप आई आणि सु+मनरुप पिता फार गरजेचे असतात.
प्रत्येक माणूस जे काही बोलतो, तो बुद्धीने विचार करून आणि मनाने संकल्प करूनच व तसेच आपल्या भावनेच्या अनुरुप! ज्यांचे विचार, संकल्प आणि भावना उत्तम असतात, त्यांच्या मुखातून तशाच प्रकारची शब्दही बाहेर पडत असतात. ज्ञानी व संत सुजनांचे वैशिष्ट्य हेच असते की, ते आपल्या वाणीने मधुर आणि सर्वांच्या हिताचेच शब्द उच्चारतात! मनसा, वाचा, कर्मणा त्यांच्या वाणीत एकरुपता आढळून येते. त्यांचे शब्द हे इतरांसाठी प्रमाण ठरतात. त्यांची वचने ही इतरांसाठी मानवतेचा संदेश देणारी ठरतात. सारे जग त्यांच्या सुवचनांची वाट पाहत असते.
 
 
 
त्यांच्या बोलण्याला फार मोठी किंमत असते. व्यक्ती, समाज, राष्ट्र व एकूणच जगाच्या कल्याणासाठी त्यांची वाणी तत्पर असते. नको ते व्यर्थ बोलून ते आपली वाक्शक्ती वाया घालवीत नसतात. निंदानालस्ती, थट्टामस्करी, आचरट विनोद यांपासून दूर असणारी त्यांची वाणी मीतुली आणि रसाळ असते. जे काही बोलायचे आहे, ते मोजके आणि चांगलेच! व्यर्थ बडबड करून आपल्या वाणीचा दुरुपयोग ते कधीही करत नाहीत. त्यांच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा ब्रह्मज्ञान, विज्ञान, सत्य आणि धर्मनिष्ठ असतो. त्यांचे शब्द हे तत्त्वबोध करून देतात. त्यांचा वाक्विलास हा शाश्वत सुख आणि विश्वशांतीचा उपाय सांगण्यात व्यग्र असतो. त्यांचे बोल सार्‍या जगाचे कल्याण इच्छिणारे असतात. जे काही बोलायचे आहे, ते विचारपूर्वकच! नंतर पश्चाताप करीत बसणे हे त्यांना मुळीच आवडत नाही. कारण, त्यांना हे ठाऊक असते की, आपल्या मुखातून उच्चारलेले शब्द कधीही परत येत नसतात. म्हणून जे काही बोलायचे ते सावधपणेच!
 
 
त्यांचे वचन म्हणजे एक प्रकारचा अनमोल संदेश. सत्यज्ञानाने परिपूर्ण असलेला त्यांचा मौलिक संदेश हा संक्षिप्त आणि साररूप असतो. नको ते शब्द उच्चारून आपली वाक्शक्ती ते व्यर्थ वाया जाऊ देत नाहीत. त्यापेक्षा ‘मौनं सर्वार्थ साधनम्!’ यानुसार ते प्रसंगी मौन बाळगून जीवन जगतात. इतकेच काय तर न बोलतादेखील त्यांच्या सदाचारपूर्ण जीवनातून लोकांना बरेच काही शिकावयास मिळते. केवळ संकेत करूनदेखील ते सामान्य लोकांना बरेच तत्त्वज्ञान सांगतात. सामान्य लोकदेखील ’समजदार को इशारा काफी होता है!’ या वचनानुसार त्यांच्याकडून जगण्याची कला शिकून जातात. आज अशा अल्पभाषी, मधुर व सत्य पण मौलिक तत्त्वज्ञान सांगणार्‍या विचारवंतांच्या परा-वैखरीची खूपच गरज भासतेय.
 
 
 
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य