मुंबई(प्रतिनिधी): रत्नागिरीतील कुर्ली गावात खाजगी मालकीच्या शेतात बिबट्या फासकीमध्ये अडकला होता.वनविभागाकडून वैद्यकीय चाचणी नंतर त्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. याबाबतची माहिती आशुतोष तोडणकर यांनी काल दि. ११ रोजी तत्काळ वनविभागाला कळवली होती.
माहिती मिळताच रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील कारवाई ला सुरुवात करण्यात आली. फासकीमध्ये अडकलेल्या बिबट्याला कटरच्या सहाय्याने सोडवण्यात आले. हा नर बिबट्या अंदाजे पाच वर्षाचा असल्याचे पशुवैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. बिबट्या सुस्थितीत असून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी तयारी करण्यात आली. आणि या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आलेले आहे.
ही कारवाई रत्नागिरीचे विभागीय वन अधिकारी, दिपक खाडे आणि रत्नागिरी सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली. रत्नागिरीच्या परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, लांजाचे वनरक्षक वि. द. कुंभार, कोर्लेचे वनरक्षक सा. रं. पताडे, वनरक्षक सा.व. गोसावी, दाभोळेचे वनरक्षक आ. तु. कडूकर, यांनी ही कारवाई पार पाडली.